माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दूरदर्शनच्या माध्यमातून हिमाचलची समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल दूरदर्शनच्या 24X7 प्रसारणसेवेचे केले उद्घाटन
Posted On:
16 FEB 2023 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2023
शिमला येथील दूरदर्शन केंद्रांच्या 24 तास प्रक्षेपण सेवेचे उद्घाटन आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झाले. याबरोबरच हिमाचल दूरदर्शन केंद्र शिमला, हिमाचल प्रदेशमध्ये 24/7 प्रसारण सेवा पुरवेल. या कार्यक्रमात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर हिमाचल प्रदेशाचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, शिमल्याचे खासदार सुरेश कश्यप आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जनतेची खूप काळापासूनची मागणी लक्षात घेऊन शिमल्याचे प्रसारण आता आजपासून प्रेक्षकांच्या सेवेत चोवीस तास सादर आहे, असे यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना अनुराग ठाकूर म्हणाले. डीडी हिमाचलच्या आजपासून प्रारंभ होणारी 24 तास प्रसारणसेवा म्हणजे फक्त राज्याच्या बातम्या नसतील तर या मार्गाने राज्याचे संस्कार आणि परंपरा यांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल, असे त्यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक परंपलरेबद्दल बोलताना ते म्हणाले की दूरदर्शनच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात हिमाचल प्रदेशची कला , संस्कृती आणि परंपरा पोचवण्याची संधी मिळत आहे. 24x7 वाहिनीची प्रसारण सेवा ही प्रमुख पर्यटन केंद्रे, धार्मिक स्थळे, क्रीडा व साहसी खेळ, स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू, कारागीरी आणि आपल्या शूर सैनिकांच्या जीवनावर आधारित कथा यांचे प्रसारण करेल. राज्यातील जनतेच्या जीवनाविषयक गोष्टींनाही प्रसारणात स्थान असेल. हे प्रसारण फक्त हिमाचलपुरतेच मर्यादित नसून विनाशुल्क DTH डीशच्या माध्यमातून ते भारतभर दिसेल म्हणजे हिमाचलच्या संस्कृतीची ओळख भारतभर पोहचू शकेल तसेच या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात असणारा हिमाचलींना आपली मूळे आणि संस्कृतीशी संलग्न राहता येईल.
हिमाचल दूरदर्शनच्या सुवर्णयुगाचा हा आरंभ आहे असे नमूद करत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आरंभ केलेल्या संपर्कसाधनाच्या विकासातील हा महत्वपूर्ण धागा असून त्यांच्या प्रेरणेनेच ही हिमाचल दूरदर्शनची 24x7 प्रसारण सेवा सुरु होत आहे असे सांगितले.
हिमाचलींनी भारताच्या संरक्षण दलात केलेल्या त्यागाची प्रशंसा करताना या देवभूमीला वीरभूमी म्हणून ओळखले जाते असे प्रतिपादन ठाकूर यांनी केले. आपल्या बालपणाची आठवण काढताना दूरदर्शनवर चित्रहार बघत असू असे सांगितले आणि चित्रहार या DD वरील प्रसिद्ध कार्यक्रमासारखाच हिंदी फिल्मी गीतांचा कार्यक्रम या नवीन वाहिनीवर सुरु व्हावा असे सांगितले. हा कार्यक्रम हिमाचली लोकसंगीताला प्रोत्साहन देणारा असावा, असे ते म्हणाले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना ठाकूर यांनी ऑल इंडिया रेडियो म्हणजेच आकाशवाणी आणि दूरदर्शनने कोविड-19 च्या कालखंडात जनजागृतीचे प्रशंसनीय कार्य केल्याचा उल्लेख केला.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी ठाकूर यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि राज्य प्रशासन हे राज्याच्या तसेच केंद्रातील सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. डीडी हिमाचलच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याच्या हेतूने प्रसारीत होतील असेही ते म्हणाले.
प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी संचालक गौरव द्विवेदी म्हणाले की राज्याच्या नागरिकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याशिवाय नवी वाहिनी नवीन निवेदक तसेच कॅमेरा ऑपरेटरांची भरती करेल. डीडी हिमाचल हे हिमाचली जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप समृद्ध हिमाचली संस्कृतीचे दर्शन घडवण्याऱ्या नृत्याविष्काराने झाला व त्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
S.Kulkarni/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899983)
Visitor Counter : 199