राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान मेळा 2023 चे उद्‌घाटन

Posted On: 16 FEB 2023 6:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी  2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (16 फेब्रुवारी 2023) नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान मेळा (IETF) 2023 चे उद्‌घाटन केले.

यावर्षी या कार्यक्रमात  केवळ भारताच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन  क्षेत्रातील यशोगाथा साजरी होत नसून प्रगत तंत्रज्ञानामध्ये  जगातील सर्वोत्तम देशांसोबत केलेल्या  सहकार्याचे ते फलित आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

पहिला आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान मेळा झाल्यानंतर गेल्या 48 वर्षात आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि या कालखंडात अभियांत्रिकी उद्योगाने  यशाची नवीन शिखरे सर केली आहेत, असे त्यांनी सांगितले.  आज हे क्षेत्र  भारताच्या उद्योग क्षेत्रातील एक गतिशील, बहुआयामी घटक असून विकासप्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका  बजावत आहे तसेच रोजगार निर्मिती आणि निर्यातीला चालना देत आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या

अलीकडच्या काळात स्वीकारलेल्या धोरणांमुळे अभूतपूर्व सर्वसमावेशक वाढीला चालना मिळाली आहे. अर्थव्यवस्थेचे झपाट्याने होणारे डिजिटलीकरण आणि सामाजिक स्तरावर त्याला मिळालेली मान्यता यामुळे एक नवीन क्षमता निर्माण झाली आहे ज्यायोगे उच्चतम वृद्धीसाठी नवे मार्ग खुले झाले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

उत्पादनातील सर्वोत्तम अनुभव, उच्च गुणवत्ता असलेले प्रतिभावान आणि अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान यांच्या बळावर भारत आपली वैश्विक प्रतिबद्धता वाढवण्याची मोहीम आखत आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानात आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर देऊन भावी पिढीसाठी हे जग अधिक समृद्ध आणि सुरक्षित करण्यात परिवर्तन घडवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण क्षेत्रांचा अंतर्भाव आहे, असे त्यांनी सांगितले.  

भारतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी संलग्न होण्याची महत्त्वपूर्ण क्षमता आहे.  शुद्ध उर्जेसाठी असलेल्या  आपल्या  वचनबद्धतेमुळे आपण हरित विकासाकडे वाटचाल करत आहेत,  2070 पर्यंत  शून्य कार्बन उत्सर्जनाचे  उद्दिष्ट गाठण्याकडे भारत दृढतेने मार्गक्रमण  करत  आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

IETF-2023 उदयोन्मुख तंत्रज्ञानातील 11 क्षेत्रात कार्यरत असून त्याचा आपल्या अर्थव्यवस्था आणि समाजावर खोल प्रभाव पडत आहे, हे ऐकून आनंद होत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. तंत्रज्ञान आपल्या जीवन पद्धतीत नक्कीच बदल घडवून आणेल यात शंकाच नाही, असे त्या म्हणाल्या. तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. जे तंत्रज्ञान केवळ समाजातील एखाद्या घटकापर्यंत मर्यादित असते ते लवकरच अस्तंगत होते, मात्र  या उलट  जे तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते ते नावारूपाला येते, भारतातील जगातील सर्वात मोठ्या डिजिटलीकरण मोहिमेची व्यापक स्वीकृती हे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानाचा सहजतेने स्वीकार करणाऱ्या समाजाचे प्रमुख उदाहरण आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. IETF-2023 मध्ये निसर्ग आणि विज्ञान यांच्यातील सुसंवाद वाढवणाऱ्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे सामर्थ्य दाखविण्याचा निर्धारपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे पाहून राष्ट्रपतींना आनंद झाला. निसर्गाचे संवर्धन आणि पोषण करण्याच्या कार्यात मानवाने आपले बुद्धिचातुर्य पणाला लावले पाहिजे, , जर विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली  तर त्यातून चमत्कार घडू शकतो, असे त्यांनी सांगितले.  

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

S.Kulkarni/B.Sontakke/P.Malandkar



(Release ID: 1899884) Visitor Counter : 171