संरक्षण मंत्रालय
भारताला केवळ जुळणी करणारा कारखाना बनून राहायचे नाही; ‘आत्मनिर्भरता’गाठण्यासाठी अत्याधुनिक उत्पादनांची निर्मिती करणे ही काळाची गरज : बंगळुरूमधल्या एअरो इंडिया 2023 च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या गोलमेज परिषदेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय आणि जागतिक उद्योग नेत्यांना आवाहन
Posted On:
13 FEB 2023 8:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
संरक्षण क्षेत्रात संपूर्ण 'आत्मनिर्भरता' प्राप्त करण्यासाठी, विशिष्ट अशा तंत्रज्ञानाचा वापर करून देशामध्येच अत्याधुनिक उत्पादनांची रचना, विकास आणि निर्मिती करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतातील आणि जागतिक उद्योगातील नेत्यांना केले आहे. जेणेकरून सामायिक जागतिक शांतता आणि समृद्धी प्राप्त करणे हा हेतू ही साध्य होऊ शकेल. बेंगळुरू येथे एअरो इंडिया 2023 चा एक भाग म्हणून 13 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत संरक्षण मंत्र्यांनी स्थानिक आणि जागतिक मूळ उपकरण उत्पादकांच्या (OEMs) 70 हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओंना) संबोधित केले.
भारताला केवळ केवळ जुळणी करणारा कारखाना बनून राहायचे नाही असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेतून कौशल्य आणि क्षमतांची देवाणघेवाण करण्याच्या आधारे संरक्षण आणि सुरक्षाक्षेत्रात मैत्रीपूर्ण देशांशी सहकार्यासाठी उत्सुक आहे. त्यांनी उद्योग जगतातल्या नेत्यांना आश्वस्त केले की, सरकारची दारे नवीन कल्पनांसाठी सदैव खुली आहेत आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात खाजगी क्षेत्रातील भागीदारांची ऊर्जा, उद्योजकतेबाबत त्यांनी बाळगलेले ध्येय आणि क्षमता यांचा पूर्णपणे उपयोग करण्यासाठी वचनबद्ध आहे. व्यवसायातले अडथळे दूर करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
जोमदार आणि जागतिक दर्जाच्या संरक्षण उत्पादन उद्योगाची जोपासना करण्याच्या सरकारच्या संकल्पाचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुचार केला आणि हा उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक असल्याचे स्पष्ट केले. देशात व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केलेल्या अनेक दूरगामी सुधारणांची त्यांनी माहिती दिली .
भूतकाळात जेव्हा आयात करणे हाच एकमेव पर्याय होता, मात्र आज स्वदेशीकरण हा भारताचा मंत्र बनला आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.
‘स्काय इज नॉट द लिमिट: ऑप्शन्स बियॉन्ड बाऊंडरीज’ अर्थात ‘आकाशापेक्षाही उत्तुंग : अमर्याद संधी’ या संकल्पनेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना देण्यासाठी या बैठकीत उद्योग भागीदार आणि सरकार यांच्यात सखोल चर्चा झाली. भारतात ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ वाढवणे अर्थात उद्योग स्नेही वातावरण निर्मितीला प्रोत्साहन देऊन देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी ओइएम (OEM) ला अनुकूल व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश होता.
N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898929)
Visitor Counter : 178