राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत लखनऊमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ संपन्न

Posted On: 13 FEB 2023 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज लखनऊमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा 10 व्या दीक्षांत समारंभ संपन्न झाला.  

भारतात आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था आहे, सर्व शैक्षणिक संस्था, मुख्यत्वे विद्यापीठे आणि तंत्र शिक्षण संस्थांनी या परिसंस्थांचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवोन्मेष यासाठी प्रोत्साहित करावे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात भारताला आघाडीचे राष्ट्र म्हणून नावारूपाला आणण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरेल, असे त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद – 2023 ने गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती केली असून या वातावरणाशी ज्ञानाची सांगड घालण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या विद्यापीठांनी अशा एका केंद्राची निर्मिती केली पाहिजे जिथे जनहिताच्या दृष्टीने नवीन संशोधन केले जाईल,  जे चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आणि  स्टार्ट-अप्ससाठी केंद्र ठरेल. आपल्या शैक्षणिक संस्था,  नव्या क्रांतीचे आणि सामाजिक समृद्धीचे आणि समतेचे दूत बनल्या तर खूप उत्साहदायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

गरीब आणि गरजू लोकाना शिक्षण देणे हे विद्यापीठांचे मुलभूत कर्तव्य आहे, असे डॉ बाबासाहेब आंबेडकर मानत असत. शैक्षणिक संस्थांनी कोणताही भेदभाव न करता सर्वाना दर्जेदार शिक्षण द्यायला हवे असे त्यांचे म्हणणे होते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, 50 टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कौतुकास्पद काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शानुसार, देशात आणि राज्यात शिक्षणाचा प्रसार करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दीक्षांत सोहळा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा क्षण असतो. या दिवशी त्यांना अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळते, असे त्या म्हणाल्या. आपल्याला या क्षणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना एक सल्ला द्यावासा वाटतो की त्यांना आयुष्यात जे कधी बनायचे आहे त्यासाठी त्यांनी आपल्या अगदी आजपासूनच कामाला लागावे आणि आपले लक्ष्य नेहमी ध्यानात ठेवावे असे राष्ट्रपतींनी सांगितले.  यापैकी काही विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षक/प्राध्यापक व्हावे अशी आपली इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या. शिक्षण आणि अध्यापन  एकमेकांशी निगडीत आहेत. उत्तम शिक्षण व्यवस्थेसाठी उत्तम शिक्षकांची गरज आहे. आपल्या होतकरू विद्यार्थ्यांनी अध्यापन हा पेशा स्वीकारून देशाचे भवितव्य उज्वल करण्यात आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आज पदवीधर झालेले विद्यार्थी शिक्षण आणि ज्ञानाच्या सामर्थ्यावर आयुष्यात खूप प्रगती करतील, असा आपल्याला विश्वास आहे, पण यासोबतच त्यांनी आपल्या मूल्यांशी आणि संस्कृतीशी नाळ कायम राखावी , तरच ते एक अर्थपूर्ण आणि समाधानी जीवन जगू शकतील, असे राष्ट्रपती म्हणाल्या. प्रत्येक कार्यात उत्कृष्टतेचा आग्रह करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जेव्हा एखादी कठीण परिस्थिती उद्भवेल तेव्हा त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आणि एक संधी म्हणून त्याकडे पहा यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होईल  असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 

 

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898812) Visitor Counter : 212