कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषीविषयक पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) आणि मध्य प्रदेश फार्म गेट यांच्याविषयी, जी-20 संकल्पनेवर आधारित कार्यशाळांचे आयोजन

Posted On: 07 FEB 2023 10:43PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी जी-20 हा अत्यंत प्रभावशाली मंच आहे. जागतिक संरचनेला आकार देऊन बळकटी आणण्यात आणि सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक समस्यांच्या संदर्भातील प्रशासनात या मंचाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. भारत दिनांक 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या काळात जी-20 मंचाचे अध्यक्षपद भूषवित आहे. जी-20 समूहामध्ये अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स,जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान,कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कस्तान,दक्षिण आफ्रिका, ब्रिटन अमेरिका हे 19 देश आणि युरोपियन महासंघ या 20 सदस्यांचा समावेश आहे. जी-20 सदस्य देश जगातील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या सुमारे 85% चे प्रतिनिधित्व करतात, जगातील एकूण व्यापाराच्या 75% व्यापार या देशांमध्ये होतो आणि जगाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश जनता या देशांमध्ये निवास करते.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी साधलेल्या समन्वयासह भोपाळची राज्य कृषी विस्तार आणि प्रशिक्षण संस्था आणि हैदराबाद येथील एमएएनएजीई संस्था यांनी मध्य प्रदेशातील कृषी उद्योजकता क्षेत्र आणि कृषीविषयक स्टार्ट अप उद्योग यांमध्ये स्त्रियांचे योगदान आणि त्यांना वित्त पुरवठा करणे या संदर्भात महिलांच्या नेतृत्वाखाली कृषी विकासया संकल्पनेवर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत, महिला शेतकरी,उद्योजक,नवीन स्टार्ट अप उद्योगांच्या संस्थापक आणि राज्याच्या विविध भागातून आलेले इतर सहभागी अशा अडीचशे जणांनी भाग घेतला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भोपाल येथील नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक निरुपम मेहरोत्रा तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातील मास मेडिया विभागाचे सह संचालक एस.के.इंगळे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. स्टार्ट अप महिला उद्योजकांना तंत्रज्ञानविषयक तसेच आर्थिक पाठबळ पुरविण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला संजीव कुमार इंगळे यांनी उपस्थितांना दिला. देशात 10,000 शेतकरी उत्पादक संस्था उभारण्याचे लक्ष्य केंद्रीय कृषी मंत्रालयाने निश्चित केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमातील संवादात्मक सत्रात, उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1897169) Visitor Counter : 253


Read this release in: English , Hindi , Urdu , Punjabi