विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते   बेंगळुरू येथे दुसऱ्या शांघाय सहकार्य संघटना युवा शास्त्रज्ञ परिषदेचे उद्घाटन


एस सी ओ च्या वाढीसाठी युवा वर्गात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात  समन्वय आवश्यक :  डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 07 FEB 2023 3:11PM by PIB Mumbai

 

शांघाय सहकार्य संघटना, एससीओची वाढ, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रातील यशस्वीतेवर अवलंबून आहे  आणि या परीदृश्यात परिवर्तन करण्याची गरज आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

बेंगळुरू येथे दुसऱ्या शांघाय सहकार्य संघटना एस सी ओ युवा शास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटन सत्रात उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस सी ओ च्या राष्ट्र  प्रमुखांच्या परिषदेच्या 19 व्या बैठकीत, HEALTH हे संक्षिप्त रूप तयार केले होते. ('H' आरोग्य-सेवा सहकार्यासाठी, ‘E’ आर्थिक सहकार्यासाठी, ‘A’  पर्यायी ऊर्जेसाठी , ‘L’ साहित्य आणि संस्कृतीसाठी, ‘T’, दहशतवादमुक्त समाजासाठी, ‘H'’ मानवतावादी सहकार्यासाठी ). एस सी ओ मुळे मध्य आणि दक्षिण आशियातील विविधरंगी आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा मिलाप होतो आणि एकमेकांमध्ये सहकार्य आणि सांघिक भावनेची जाणीव वृद्धिंगत होते, असे ते म्हणाले. 

एस सी ओ मध्ये तीन अब्ज लोकसंख्या सामावलेली असून अन्न सुरक्षा हा आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे असे सिंह म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी  उत्पादनपूर्व टप्प्यावर इनपुटसचा  वापर करण्यापासून ते उत्पादनोत्तर आणि विपणनापर्यंत कृषी मूल्य शृंखलेत गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढवण्यात तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रयत्नात एस सी ओ  च्या वैज्ञानिक प्रतिभेचा फायदा घेतल्याने निश्चितच मोलाची भर पडेल, असे ते म्हणाले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण कदाचित स्टार्ट अप मंच आणि नवोन्मेष स्पर्धा आयोजित करू, असे त्यांनी सांगितले. अभिनवता , स्वामित्व हक्क  , उत्पादन आणि  समृद्धी हे युवा वर्गाचे ध्येय असायला हवे, या चार गोष्टी आपल्या देशाचा विकास जलदगतीने करण्यात सहायभूत ठरतील, असे ते म्हणाले. उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसामग्रीच्या मदतीने आपल्याला भेडसावणाऱ्या सामायिक सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी युवा वर्गाने लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्यांनी सांगितले.   

आणखी एका समस्येकडे लक्ष वेधताना सिंह म्हणाले की एससीओ क्षेत्रात, विशेषत: मध्य आशियाई प्रदेशात दीर्घकाळापासून पर्यावरणाचा ऱ्हास हा एक चिंतेचा विषय आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठताना नैसर्गिक पर्यावरणाचे जतन, परिसंस्था आणि जैव विविधता हे अतिशय महत्वाचे आहेत, कोविड-19 साथीच्या रोगाचा सर्व देशांतील लोकांच्या जीवनावर, आरोग्यावर आणि निरामयतेवर  गंभीर नकारात्मक प्रभाव पडत आहे आणि एस सी ओ  क्षेत्रात संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी सदस्य राष्ट्रांनी आपसातले  सहकार्य मजबूत केले पाहिजे, असे  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. नाविन्यपूर्ण आणि परवडणारे उपाय शोधण्यासाठी  नवसंशोधक आणि युवा  संशोधकांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांगीण कामिगिरी आणि प्राप्त यश पाहता भारत गेल्या काही वर्षात उत्तम प्रगती करत आहे, असे ते म्हणाले. भारताने आज प्रकाशनांच्या संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसरे स्थान प्राप्त केले आहे आणि स्टार्ट-अपच्या संख्येतही जगात तृतीय क्रमांक पटकावला आहे. 2014 मध्ये फक्त 400 नोंदणीकृत स्टार्टअप्सवरून 2022 मध्ये 85 हजारांपर्यंत, भारतातील स्टार्टअप परिसंस्था झपाट्याने विकसित झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

शांघाय सहकार्य संघटनेचे  सरचिटणीस  झियांग मिंग यांनी आशा व्यक्त केली की तरुण शास्त्रज्ञांनी केलेले कार्य संशोधन, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञानाला चालना देईल. तसेच या सहयोगी संशोधनामुळे सदस्य राष्ट्रांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1897054) Visitor Counter : 164


Read this release in: English , Urdu , Hindi