ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सामायिक दृष्टीकोन आणि प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमध्ये सर्वसहमतीसह जी-20 समूहाच्या उर्जा स्थित्यंतरविषयक कृती गटाच्या चर्चेचा यशस्वी समारोप

Posted On: 06 FEB 2023 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2023

 

सामायिक दृष्टीकोन आणि प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमध्ये सर्वसहमतीसह जी-20 समूहाच्या उर्जा स्थित्यंतरविषयक कृती गटाच्या दोन दिवसीय चर्चेचा आज बेंगळूरू येथे यशस्वी समारोप झाला.

कृती गटाच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशीच्या घडामोडींविषयी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय उर्जा सचिव आलोक कुमार म्हणाले की, उर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळ्या यांच्या गरजेप्रती जी-समूहाच्या सदस्य देशांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, प्रत्येक देशाचा उर्जाविषयक पाया आणि क्षमता यांच्यानुसार, त्या देशांचा उर्जा संक्रमणाचा मार्ग वेगवेगळा असायला हवा असा दृष्टीकोन सहभागी देशांनी व्यक्त केला असे ते म्हणाले. मात्र, नवीकरणीय उर्जेचा वापर वाढवताना, येत्या 15 ते 20 वर्षांसाठी बहुतांश देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात जैविक इंधनांचा वापर सुरु ठेवावा लागेल अशी एक स्पष्ट समजूत या बैठकीतून हाती आली असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय उर्जा सचिव म्हणाले की, “एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीड” या संकल्पनेखाली भारताने राबवलेल्या ग्रीडच्या अंतर्संबंधासारख्या उपक्रमामुळे, फारशी साठवण क्षमता नसलेल्या सदस्य देशांसाठी उपलब्ध उर्जा स्त्रोतांचा वापर करता येऊ शकेल याबाबत प्रशंसा व्यक्त करण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चांमध्ये उद्योगांसाठी अधिक उर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे तसेच, वेगवान पद्धतीने कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन होईल हे सुनिश्चित करणे यावर अधिक भर देण्यात आला.

स्वच्छ उर्जा मिळवण्याच्या सार्वत्रिक प्रयत्नावरील सत्राबद्दल माहिती देताना आलोक कुमार म्हणाले या सत्रातील चर्चेत, पृथ्वीवरील प्रत्येकाला किफायतशीर दरात उर्जा मिळेल याची हमी मिळण्यासाठी इंधनाच्या दरांचे व्यवस्थापन आणि योग्य तंत्रज्ञानाची निवड यावर भर देण्यात आला. या बैठकीत, सदस्य देशांनी लोक-केंद्री उर्जा संक्रमण यंत्रणेला अधिक अनुकुलता दाखवली असे ते पुढे म्हणाले.

विद्युत पुरवठ्याची संपूर्ण व्यवस्था, स्वच्छ स्वयंपाक क्रिया आणि कार्यक्षम वीज व्यवस्था शक्य करून देणाऱ्या सौभाग्य, उजाला आणि उज्ज्वल उर्जा योजना यांची अभियान तत्वावर अंमलबजावणी केल्याबद्दल बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी भारताची प्रशंसा केली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, गुजरातमध्ये गांधीनगर येथे पुढील ईटीडब्ल्यूजी बैठक नियोजित करण्यात आली आहे अशी माहिती उर्जा सचिवांनी दिली.

या बैठकीच्या अनुषंगाने, या क्षेत्रात उर्जा कार्यक्षमता आणि शाश्वत पद्धती स्वीकारण्यासाठी भारताने मलेशियाच्या इंडोनेशिया-मलेशिया-थायलंड विकासविषयक त्रिकोणी संयुक्त व्यापार मंडळाशी (आयएमटी-जीटी जेबीसी) सामंजस्य करार केला आहे.

भारत उर्जा सप्ताह साजरा होत असताना केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रम असेलल्या उर्जा कार्यक्षमता सेवा (ईईएसएल) या कंपनीने मलेशियाच्या आयएमटी-जीटी जेबीसीशी केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या धोरणात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून, ईईएसएल ही कंपनी  तिच्या कार्यक्षेत्रातील यशस्वी अंमलबजावणीचा ट्रॅक रेकॉर्ड असलेले निवडक उर्जा कार्यक्षमता कार्यक्रम राबविण्यासाठी तंत्रज्ञानविषयक सल्ला, प्रकल्प व्यवस्थापन पाठबळ, करार आणि अंमलबजावणीविषयक पाठींबा पुरवणार आहे.

या बैठकीत उपस्थित सदस्यांना आज बेंगळूरू शहरातील इन्फोसिस हरित इमारती परिसराला भेट देण्यासाठी नेण्यात आले. हे सदस्य उद्या पावागड सौर उर्जा प्रकल्पाला भेट देणार आहेत.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896828) Visitor Counter : 259


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi