ऊर्जा मंत्रालय
जी-20 समूहाच्या ऊर्जा संक्रमण कार्य गटाची पहिली बैठक उद्या बंगळूरु येथे सुरु होणार
या तीन दिवसीय कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के.सिंह यांचे बीजभाषण होईल
जी-20 समूहातील सदस्य देशांच्या प्रतिनिधींसह दीडशेहून अधिक व्यक्तींचा या कार्यक्रमात सहभाग असेल
प्रविष्टि तिथि:
04 FEB 2023 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 04 फेब्रुवारी 2023
भारताच्या अध्यक्षपदाखाली जी-20 समूहाच्या ऊर्जा संक्रमण कार्य गटाची (ईटीडब्ल्यूजी) पहिली बैठक उद्या बंगळूरु येथे सुरु होणार आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नूतनीकरण ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांचे बीजभाषण होईल. केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री, कोळसा आणि खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांचे देखील या कार्यक्रमात विशेष भाषण होणार आहे.
जी-20 समूहातील सदस्य देशांच्या प्रतिनिधी, बांगलादेश,इजिप्त,मॉरिशस, नेदरलँड्स, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात आणि स्पेन या नऊ विशेष निमंत्रित देशांचे प्रतिनिधी यांच्यासह दीडशेहून अधिक सहभागी या बैठकीला उपस्थित असतील. सर्वांसाठी शाश्वत भविष्य उभारण्याच्या उद्देशाने जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत सर्व सदस्य देशांमध्ये विश्वस्ततेच्या भावनेचे सामायिकीकरण, सहकार्य आणि उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
ईटीडब्ल्यूजी बैठकीच्या प्राधान्यक्रम क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानविषयक तफावती दूर करण्याच्या माध्यमातून ऊर्जा स्थित्यंतर; ऊर्जा स्थित्यंतरासाठी कमी दरातील कर्जसुविधा; ऊर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळ्या; ऊर्जा कार्यक्षमता, औद्योगिक क्षेत्रातील कमी कार्बन संक्रमणे आणि जबाबदार वापर; भविष्यकाळात वापरायची इंधने (3 एफ) आणि स्वच्छ ऊर्जा मिळण्यासाठी सार्वत्रिक मार्ग तसेच ऊर्जा स्थित्यंतराचे न्याय्य,किफायतशीर आणि समावेशक मार्ग यांचा समावेश आहे.
ऊर्जा स्थित्यंतराच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करत असतानाच, हा ऊर्जा संक्रमण कार्य गट तंत्रज्ञानातील तफावतीच्या आणि वित्तपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यावर देखील अधिक भर देणार आहे. विविध समुदायांच्या ऊर्जाविषयक गरजांशी तडजोड न करावी लागता, कालबद्ध आणि किफायतशीर पद्धतीने सर्व देशांमध्ये या गोष्टींचे वितरण होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी हा गट प्रयत्न करेल.
या बैठकीत होणाऱ्या चर्चांतून, महत्त्वाच्या तंत्रज्ञानांच्या वापराच्या दृष्टीने पुरेशा प्रमाणातील कमी खर्चाचा आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा योग्य मार्गाने वळवण्यासाठी संशोधन आणि विकास-20 मार्गदर्शक आराखड्याच्या अंतर्गत आधुनिक सहकार्य उपक्रमविषयक करार, ऊर्जा सुरक्षेच्या सुनिश्चितीसाठी सामुदायिक प्रयत्नांची घोषणा तसेच नव्या ऊर्जा स्रोतांच्या वैविध्यपूर्ण पुरवठा साखळ्या, वर्ष 2030 पर्यंत ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्याचा जागतिक पातळीवरील दर दुप्पट करण्यासाठीचा आराखडा, जैविक ऊर्जा सहकार्यात सुधारणा आणि प्रोत्साहन यासाठी कृती योजना आणि न्याय्य, किफायतशीर आणि समावेशक ऊर्जा स्थित्यंतराला पाठींबा देण्यासाठी जागतिक पातळीवर उत्तम पद्धतींची शिफारस यासंदर्भातील ठोस परिणाम हाती येतील अशी अपेक्षा आहे.
या बैठकीच्या निमित्ताने, ‘कार्बन कॅप्चर, वापर आणि साठवण (सीसीयुएस)’ या विषयावरील उच्च-स्तरीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे कार्बन कॅप्चर, त्याचा वापर आणि साठवण यांचे महत्त्व ठळकपणे मांडण्यावर या चर्चासत्रात लक्ष केंद्रित करण्यात येईल.
बंगळूरू येथे आलेले प्रतिनिधी, पहिल्या ईटीडब्ल्यूजी बैठकीच्या आयोजनाचा भाग म्हणून, इन्फोसिस हरित इमारती परिसर तसेच पावागड सौर पार्क येथे देखील भेट देणार आहेत. या भेटीत त्यांना नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या दिशेने भारताने मारलेली मुसंडी आणि हवामान बदलाचे परिमाण कमी करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे दर्शन होईल.
*****
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1896380)
आगंतुक पटल : 216