विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पारंपरिक भरड धान्याचा आहार मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर विकारांमध्ये फायदेशीर- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2023 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2023
पारंपरिक भरड धान्याचा आहार मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर विकारांमध्ये फायदेशीर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. डॉ. जितेंद्र सिंह हे प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिक देखील आहेत. भरड धान्यांमध्ये अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ विपुल प्रमाणात असतात असे सांगून तांदूळ आणि गव्हापासून बनवले जाणारे सर्व पदार्थ भरड धान्यापासून देखील बनवता येतात, हे फारच कमी जणांना माहित आहे असे सिंह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग जागतिक स्तरावर लोकप्रिय केल्यानंतर आता भरड धान्याला लोकप्रिय बनवण्यासाठी कृती करण्याची वेळ आली आहे, असे सिंह यांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने आयोजित “वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर): भरड धान्य संदर्भात नवोन्मेष” या विशेष कार्यक्रमात मुख्य भाषण देताना सांगितले.

भारतात भरड धान्याच्या 12 ज्ञात प्रकारांपैकी 10 प्रकारांचे धान्य भारतात पिकवले जाते. भरड धान्यात जटिल कार्बोदके असतात जी अतिशय मंद गतीने पचतात त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी राहतो. ही बाब रक्तातील साखरेच्या पातळीसाठी फायदेशीर ठरते, असे सिंह यांनी सांगितले.
डॉ जितेंद्र सिंग यांनी यावेळी एका प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा येथे, "आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष-2023" महोत्सवाचा भाग म्हणून, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद प्रयोगशाळेने तयार केलेली, भरड धान्यावर आधारित असलेली डेस्कटॉप दिनदर्शिका- 2023 माननीय मंत्र्यांनी जारी केली.

सरकारच्या उपक्रमांमुळे केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील भरड धान्याचा वापर पुन्हा एकदा वाढेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल, अशी माहिती सिंह यांनी दिली.
सर्व भरड धान्ये ही दुष्काळाची प्रतिरोधक आहेत, या पिकांसाठी जास्त पाण्याची गरज नसते तसेच या पिकाची निकृष्ट जमिनीत किंवा डोंगराळ प्रदेशातही लागवड करता येते. यामुळे जगातील जवळजवळ सर्वच भौगोलिक विभाग आणि प्रदेशांमध्ये यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाऊ शकते, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. भरड धान्य कार्बोदके, प्रथिने तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मॅंगनीज आणि जस्त यांसारखी खनिजे यांनी देखील परिपूर्ण असतात, असे त्यांनी सांगितले.

भारत 170 लाख टन पेक्षा जास्त भरड धान्यांचे उत्पादन करतो. हे उत्पादन आशिया खंडातील एकूण उत्पादनाच्या 80 टक्के तर जागतिक उत्पादनाच्या 20 टक्के इतके आहे, याकडे सिंह यांनी लक्ष वेधले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1894829)
आगंतुक पटल : 451