पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
माहितीच्या प्रसाराकडून जनजागृतीकडे रोख वळवण्याच्या गरजेवर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिला भर
Posted On:
30 JAN 2023 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2023
माहितीच्या प्रसाराकडून जनजागृतीकडे रोख वळवण्याची गरज आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. 'लाईफ (Life) अभियानावरील राष्ट्रीय कार्यशाळेला' संबोधित करताना ते बोलत होते. प्रत्येकाने आपली कृती लाईफ (Life ) म्हणजेच पर्यावरणस्नेही जीवनशैलीशी सुसंगत आहे का यावर आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.
नागरी कर्तव्याच्या जाणीवा आणि नैतिक जाणीवा यांच्याप्रमाणेच पर्यावरण विषयक जाणीवेची गरज त्यांनी अधोरेखित केली.लाईफ (Life ) म्हणजेच पर्यावरणस्नेही जीवनशैलीशी सुसंगत कृतींसाठी सामाजिक जाणीवेची नितांत गरज आहे, असे यादव म्हणाले.
या कार्यशाळेत देशभरातील सुमारे 60 ‘पर्यावरण माहिती, जागरूकता, क्षमता बांधणी आणि उपजीविका कार्यक्रम (ईआयएसीपी) केंद्रांचा सहभाग होता. लाइफ अभियानाच्या प्रचारासाठी केंद्रांनी केलेली कार्य मंत्र्यांनी अधोरेखित केली.
ईआयएसीपीचे नवे बोधचिन्ह तसेच 'लेक्झीकॉन ऑफ लाईफ (LiFE:): ए -झेड सस्टेनेबल लाइफस्टाईल' या इन्फोग्राफिक पुस्तिकेचे प्रकाशनही यादव यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या पुस्तिकेत शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेले एखाद्या व्यक्तीने अवलंबण्याचे साधे बदल रंजक मार्गाने अधोरेखित करण्यात आले आहेत.
ईआयएसीपीच्या आदेशानुसार, ग्लासगो येथे आयोजित कॉप 26 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या ‘पर्यावरणस्नेही जीवनशैली (LiFE) सह या कार्यक्रम केंद्रांचे उपक्रम संरेखित केले जाणार आहेत .
ईआयएसीपीच्या हरित कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसह प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्र्यांनी केले. त्यांनी स्टॉलवर जाऊन केंद्रांशी संवाद साधला आणि केंद्रांनी तयार केलेल्या विविध उत्पादने, प्रकाशने आणि अनुप्रयोगांची प्रशंसा केली.
या कार्यशाळेच्या उत्तरार्धात तांत्रिक सत्र झाले, या सत्रात ईआयएसीपी केंद्रांना परिचय करून देण्यात आला.आणि त्यांना लाईफ अभियानाच्या सात संकल्पनांवर आधारित सात समूहात विभागण्यात आले. प्रत्येक समूहाचे नंतर एक स्वतंत्र सत्र घेण्यात आले यामध्ये त्यांनी विचारमंथन केले आणि संबंधित संकल्पनेनुसार हाती घेतलेल्या कल्पना मांडल्या. त्या सर्जनशीलता, नवोन्मेष , संवर्धन आणि जागरूकता यावर आधारित होत्या. ईआयएसीपीच्या उपक्रमांच्या दिनदर्शिकेमध्ये त्या पद्धतशीरपणे समाविष्ट केल्या जातील.
त्याचबरोबर 150 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी मंत्रालयाला भेट दिली. त्यांना संपूर्ण प्रदर्शन आणि मंत्रालयाची मार्गदर्शनपर सफर घडवण्यात आली. पर्यावरणस्नेही जीवनशैली आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरोच्या (आयबीपी ) रचनेमध्ये ग्रीन बिल्डिंग म्हणून कशाप्रकारे समाविष्ट केले आहे, याबाबत विद्यार्थ्यांना जागरुक करण्यात आले. त्यांना लाइफ चिन्ह असलेला बिल्ला आणि त्यांच्या छायाचित्रासह ए -झेड पुस्तिकेची प्रत देण्यात आली.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894777)
Visitor Counter : 177