माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारताला चित्रीकरणासाठीचे पसंतीचे स्थळ बनवण्याकरता भारतातील आकर्षक स्थळांचा प्रचार, सुलभीकरण, सवलती देणे यावर एससीओ चित्रपट महोत्सवात परिसंवाद


चित्रपट सुविधा कार्यालय, भारतात चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये सवलती प्रदान करते: प्रितुल कुमार

चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी दक्षिण भारतीय निर्मात्यांना उत्तर भारतात नेण्याने हा उद्योग खऱ्या अर्थाने भारतव्यापी उद्योग होईल : अविनाश ढाकणे

Posted On: 30 JAN 2023 3:05PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जानेवारी 2023

 

मुंबईतील शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) चित्रपट महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात भारतातील चित्रपट निर्मिती आणि सुविधा या विषयावरील महत्त्वाच्या परिसंवादाने झाली. आशिष सिंग आणि अर्फी लांबा (बॉम्बे बर्लिन फिल्म प्रॉडक्शन), सहसचिव (चित्रपट), आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रितुल कुमार तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, डॉ.अविनाश ढाकणे या परिसंवादात सहभागी झाले होते.

भारतात चित्रपटांच्या चित्रीकरणाला प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी विविध राज्यात सवलती देणाऱ्या तसेच चित्रीकरणाच्या ठिकाणांची माहिती उपलब्ध करणाऱ्या चित्रपट सुविधा कार्यालयाची (एफएफओ) भूमिका सहसचिव प्रितुल कुमार यांनी अधोरेखित केली. महाराष्ट्रासारख्या  चित्रपट उद्योगाभिमुख राज्यात असूनही अपरिचित आणि नव्या राहिलेल्या अमरावती, मेळघाटासारख्या ठिकाणांचा चित्रीकरणासाठी प्रचार करण्यावर अविनाश ढाकणे यांनी भर दिला. गावांमध्ये चित्रीकरण वाढवून त्याद्वारे ग्रामीण पर्यटन पुनरुज्जीवित करण्याच्या कल्पनेलाही त्यांनी स्पर्श केला. आपला उद्योग खऱ्या अर्थाने भारतव्यापी उद्योग बनवण्यासाठी प्रोत्साहनरुपात रोख रक्कम देण्याची आणि दक्षिण भारतीय निर्मात्यांना चित्रीकरणासाठी उत्तर भारतातील राज्यांमध्ये आकर्षित करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

   

चित्रीकरण सुलभतेव्यतिरिक्त सवलती आणि चित्रीकरण ठिकाणांची माहिती एफएफओ कार्यालय प्रदान करते, चित्रपट निर्मात्यांना नेमके हेच हवे असते असे निर्माते आशिष सिंग यांनी सांगितले. चित्रीकरण प्रक्रियेत, अभिनेते/दिग्दर्शक शुल्कात सवलत, कर्मचारी खर्चात सवलत आदींच्या माध्यमातून ऑस्ट्रीया आणि इंग्लंड परदेशातील चित्रीकरण ठिकाणांपैकी सर्वात आकर्षक ठिकाणे कसे बनले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. उभय देशांमधील सहनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटिश सरकारसोबतच्या करविषयक करारांचा वापर करण्याचेही त्यांनी सुचवले. भारतात चित्रीकरणाची सर्व प्रकारची ठिकाणे असूनही, ईशान्य भारतासारख्या दुर्गम ठिकाणी मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव आहे याकडे अर्फी लांबा यांनी लक्ष वेधले. दळणवळणात सुधारणा, कर्मचारी सुविधा आदींच्या माध्यमातून चित्रीकरण सुलभता उत्तम करण्यावर त्यांनी भर दिला. 

   

भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये व्हीएफएक्सच्या उदयोन्मुख भूमिकेवर प्रकाश टाकून प्रितुल कुमार यांनी सत्राचा समारोप केला. इन्व्हेस्ट इंडिया पोर्टलला चालना देणे, परदेशी दूतावासांशी त्यांचा समन्वय घडवून आणणे,  आणि भारताला चित्रीकरणाचे पसंतीचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय एक खिडकी सुविधा प्रदान करणे यासारख्या सरकारी प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

 

* * *

PIB Mumbai | R.Aghor/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894683) Visitor Counter : 191


Read this release in: English , Hindi , Tamil , Kannada