माहिती आणि प्रसारण मंत्रालय

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात, ‘भारत आणि परदेशात चित्रपट वितरण क्षेत्राचे भवितव्य’ या विषयावर चर्चासत्र


जागतिक सिनेमाच्या वितरणात येणाऱ्या अनेक आव्हानांवर या परिसंवादात सखोल चर्चा

Posted On: 29 JAN 2023 6:51PM by PIB Mumbai

 

मुंबईत सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भारत आणि जगभरातील चित्रपट वितरण क्षेत्राचे भवितव्य या विषयावर एक चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात, चित्रपट वितरणाशी संबंधित सर्व पैलूंवर विस्तृत चर्चा झाली. ज्यात, ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रभाव तसेच महामारीमुळे सिनेमा बघण्याच्या सवयीमध्ये झालेला बदल, अशा विषयांवर चर्चा झाली. एससीओ चित्रपट महोत्सवाच्या चीनमधील ज्युरी सदस्य निंग यिंग, 91 फिल्म स्टुडिओचे संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन चंद्र, चित्रपट निर्माते  सुनीर खेत्रपाल आणि प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशिष सरकार हे पॅनेलचे सदस्य, या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

आज ग्राहकांच्या क्रयशक्तीवर चलनवाढ आणि जागतिक मंदीचा कसा परिणाम झाला, याविषयी शिबाशिष सरकार यांनी माहिती दिली. यामुळेच, महामारीनंतर, फार कमी लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे पसंत करत आहेत. डिजिटायझेशनची एक नवी लाट निर्माण झाली असून, त्यामुळे घराघरात प्रत्येक व्यक्ती, चित्रपट समीक्षक झाली आहे, असे नवीन चंद्रा यांनी सांगितले. सिनेमावरचा अभिप्राय  अगदी काही क्षणात सोशल मिडियावर पोस्ट केला जातो  आणि त्यामुळे, त्या सिनेमासमोरच काही आव्हाने ठाकतात.

जागतिक सिनेमाच्या प्रादेशिकीकरणामुळे लोकांच्या आवडीनिवडी कशा बदलत आहेत असे सांगत, त्यांनी 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट ऑस्कर सिनेमा ठरलेल्या कोरियन चित्रपटाचे उदाहरण दिले.

कोणताही सिनेमा मोठा किंवा छोटा नसतो, तर फक्त चांगला आणि वाईट चित्रपट असतो, असे सांगत, सुनीर खेत्रपाल म्हणाले की चांगला चित्रपट बनवणे हेच सिनेमाचे सार आहे. जागतिक चित्रपटसृष्टीसमोर बड्या स्टार्सनी नवे आव्हान उभे केले आहे, असे मत निंग यिंग यांनी नोंदवले. "मोठे, सुप्रसिद्ध कलाकार निर्मात्यांसाठी एक निश्चित असा डाव खेळत असतात. मात्र जेव्हा त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खराब प्रदर्शन करतो, तेव्हा त्यांनाही त्रास सहन करावा लागतो" असे त्या म्हणाल्या.  चीनच्या प्रचंड लोकसंख्येमुळे देशातच सिनेमांसाठी मोठा प्रेक्षकवर्ग आणि बाजारपेठ आहे, मात्र महामारीनंतर, ह्या प्रेक्षकांना पुन्हा सिनेमाकडे वळवण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले.

हिंदी सिनेमाने डब्ड म्हणजे दुसऱ्या भाषेत संवाद म्हटलेल्या चित्रपट बाजारात पाय रोवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते इतर लोकांशी संबंधित कथा समोर आणून त्या प्रेक्षकांनाही चित्रपट बघण्यासाठी आकर्षित करू शकतील, असे शिबाशिष सरकार यांनी चर्चासत्राचा समारोप करतांना सांगितले. ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी सकारात्मक आणि आशावादी भूमिका घेत, यामुळे, चित्रपटांचा आशय अधिक समृद्ध झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894513) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil