माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात एससीओ क्षेत्रातील  भारतीय चित्रपटांची वाढती लोकप्रियता या विषयावर चर्चासत्र आयोजित


भारतीय सिनेमाच्या ताजेपणामुळेच प्रेक्षक त्याकडे आकर्षित होतात: चित्रपट निर्माते राहुल रवैल

भावना नेहमीच वैश्विक असतात: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख  

जगभरातील चित्रपट महोत्सवांचे वेगळेपण हे आहे की ते प्रवाहापेक्षा वेगळ्या चित्रपटांना व्यासपीठ देतात असे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे मत

Posted On: 28 JAN 2023 8:58PM by PIB Mumbai

 

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या इन कॉन्वर्सेशन  सत्राला आज प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. एससीओ प्रदेशातील भारतीय चित्रपटांची वाढती लोकप्रियता, या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या पॅनेलचे सदस्य म्हणून चित्रपटकर्मी आणि लेखक राहुल रवैल, चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अशा पारेख यांचा सहभाग होता. व्हिस्लिंग वूड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकर यांनी या चर्चासत्राचे संचालन केले.  भारतीय सिनेमाला लोकप्रिय बनवणारे घटक आणि त्यावर असलेल्या विविध संस्कृतींचा प्रभाव यावर पॅनेलच्या सदस्यांनी आपले विचार मांडले.

चर्चासत्रादरम्यान, भारतीय सिनेमाचे इथल्या जनतेशी असलेले घट्ट नाते यावर सदस्यांनी चर्चा केली. राज कपूर हे केवळ यूएसएसआरमध्येच नव्हे तर इराण आणि तुर्कीमध्येही कसे लोकप्रिय होते, हे राहुल रवैल यांनी सांगितले. सिनेमामधील पात्रांच्या साधेपणामुळेच या सीमा अस्पष्ट होत असल्याचं रमेश सिप्पी म्हणाले. तर संगीतामुळेच हे नातं जोडलं जात असल्याचं आशा पारेख यांनी सांगितलं.

रमेश सिप्पी यांनी 'चांदनी चौक टू चायना' चित्रपट बनवतानाचे आपले अनुभवही सांगितले. चीनी जनतेचा कष्टाळूपणा आणि सहकार्य याचे कौतुक  त्यांनी केले. यासारखे गुण एससीओ क्षेत्राला चित्रपट निर्मितीसाठी अधिक अनुकूल बनवते. चीनी सिनेमामधील कुंग-फू आणि अॅक्शन सीक्वेन्सची पण त्यांनी प्रशंसा केली.

भारतीय सिनेमाच्या ताजेपणामुळेच लोक त्याकडे आकर्षित होतात असे राहुल रवैल म्हणाले. भावना या नेहमीच वैश्विक असतात असं मत आशा पारेख आणि रमेश सिप्पी यांनी मांडलं. सीक्रेट सुपरस्टार सारख्या चित्रपटाला चीनमध्ये मिळालेली लोकप्रियता म्हणजे, समाजामधील एखादी लांच्छनास्पद बाब संपूर्ण क्षेत्रातील  लोकांसाठीच  किती तापदायक असू शकते, याचा पुरावा आहे.

  

आशा पारेख यांनी भारतीय सिनेमाला पाश्चिमात्त्य होण्यापासून रोखून त्याचं भारतीयत्व जीवंत ठेवण्याचा आग्रह धरला. रमेश सिप्पी यांनी भारतीयत्व जपताना जगभरातील शक्यतांचा शोध घेण्याची तितकीच उत्सुकताही दाखवायला हवी, असा आग्रह धरला.

एससीओ चित्रपट महोत्सवात आणखी काय भर घालायला हवी, यावर बोलताना पॅनेलच्या सदस्यांचे एकमत होते की, चित्रपट निर्मितीमधील अधिक सहकार्याद्वारे, या प्रदेशातील लोकांनी भू-सामाजिक ज्ञान जोपासायला हवे. रमेश सिप्पी यांनी असेही निदर्शनास आणून दिले की जगभरातील चित्रपट महोत्सवांचे वेगळेपण यात आहे की ते ऑफबीट (प्रवाहापेक्षा वेगळ्या) चित्रपटांना व्यासपीठ देतात, ज्याची अन्यथा नोंद घेतली जात नाही.

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1894371) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Hindi