माहिती आणि प्रसारण मंत्रालय

27 ते 31 जानेवारी 2023 दरम्यान मुंबईत एससीओ (शांघाय सहकार्य संघटना) चित्रपट महोत्सवाचं आयोजन


भारतातर्फे स्पर्धा विभागात मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि गुजराती चित्रपट ‘द लास्ट फिल्म शो’ यांचं नामांकन

‘अप्पथा’ या भारतीय चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने या महोत्सवाचा होणार प्रारंभ

स्पर्धा आणि स्पर्धेतर विभागां अंतर्गत मिळून 57 चित्रपट प्रदर्शित केले जातील

Posted On: 24 JAN 2023 7:42PM by PIB Mumbai

मुंबई, 24 जानेवारी 2023

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालय 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत एससीओ (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचं, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या माध्यमातून आयोजन करत आहे. एससीओ चं भारताकडे असलेलं अध्यक्षपद सुचित करण्यासाठी, या एससीओ चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे.

एससीओ चित्रपट महोत्सवाचं आयोजन, SCO च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात केलं जात असल्यानं, या महोत्सवाची सुरुवात भारतीय चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरनं (पहिलं सार्वजनिक प्रदर्शन) होईल. उद्घाटन समारंभ 27 जानेवारी 2023 रोजी,मुंबईत NCPA (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात राष्ट्रीय कलाविष्कार केंद्र) च्या जमशेद भाभा प्रेक्षागृहात होणार आहे.

चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचे खेळ, मुंबईत दोन ठिकाणी होतील. पेडर रोड येथील फिल्म्स डिव्हिजन संकुलातील 4 प्रेक्षागारं आणि वरळीच्या नेहरू तारांगण इमारतीमधील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDC (National films development corporation) चं एक प्रेक्षागृह,अशी ही दोन ठिकाणं आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट विभागाचे संयुक्त सचिव, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि महोत्सव संचालक प्रीथूल कुमार यांनी आज मुंबईत एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचा डिजिटल कॅटलॉग आणि चित्रपटांच्या प्रदर्शनाचे तपशीलवार वेळापत्रक जाहोर केले. महोत्सवाची माहिती देण्यासाठी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, एससीओ या आठ सदस्य देशांच्या बहुस्तरीय संघटनेच्या भारताला मिळालेल्या अध्यक्षपदानिमित्त हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटांना एससीओ सदस्य देशांमध्ये दीर्घ काळापासून असलेल्या लोकप्रियतेचे हे विस्तारित रूप आहे असे त्यांनी सांगितले.

महोत्सव संचालक पुढे म्हणाले की चित्रपटीय भागीदारी उभारणे आणि एससीओमधील विविध सदस्य देशांच्या संस्कृतींना जोडणारा सेतू म्हणून कार्य करणे हे या एससीओ चित्रपट महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. सामूहिक चित्रपटीय अनुभवांच्या माध्यमातून एससीओ सदस्य देशांमधील चित्रपट समुदायांमध्ये समन्वय निर्माण करण्याचे कार्य देखील हा महोत्सव करेल. एससीओ सदस्य देशांमध्ये तयार झालेले आणि या महोत्सवात सादर होणारे चित्रपट प्रेक्षकांना विविध संस्कृतींचा अनुभव देतील तसेच हे चित्रपट एससीओ मधील सदस्य देशांतील जनतेला एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठीची खिडकी म्हणून काम करतील.

पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांच्या अप्पथाया भारतीय चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने या महोत्सवाला सुरुवात होईल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या  अभिनेत्री उर्वशी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असून या चित्रपटाद्वारे त्यांची भूमिका असलेला  700 वा चित्रपट आणि त्यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील कारकीर्दीची 51 वर्षे पूर्ण होण्याचा महत्त्वाचा टप्पा नोंदला जाईल.

स्पर्धा विभाग हा फक्त एससीओ सदस्य राष्ट्रांसाठी आहे आणि त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपट), स्पेशल ज्युरी अवॉर्ड (विशेष परीक्षक पुरस्कार) अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.

स्पर्धेतर विभाग सर्व एससीओ देशांसाठी, म्हणजे संघटनेचे सदस्य देश, निरीक्षक देश आणि सदस्य देशांशी संवाद साधणारे भागीदार देश यांच्यासाठी, खालील श्रेणींमध्ये आहे:-

 • एससीओ फोकस फिल्म्स म्हणजे एससीओ देशांशी मुख्यत्वाने संबंधित असलेले चित्रपट, या चित्रपट महोत्सवात संबंधित एससीओ देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले आहेत. अशा प्रकारे, विविध देशांमधील देवाणघेवाण प्रबळ करता येते आणि सदस्य देशांमधील सांस्कृतिक बंध दृढ करता येतात. एससीओ फोकस फिल्म्स श्रेणीत 17 चित्रपट दाखविले जातील.
 • एससीओ देशांच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांनी बनवलेले दिग्दर्शक केंद्रीत चित्रपट (डायरेक्टर फोकस फिल्म). देशाच्या वारशात योगदान देणारे, आपलं कसब आणि चित्रपटाची जातकुळी उत्तम जाणण्याबद्दल, देशात ख्यातनाम असलेले दिग्गज दिग्दर्शक, अशा दिग्दर्शकांनी बनवलेले चित्रपट. दिग्दर्शक- केंद्रीत श्रेणीत 8 चित्रपट सादर होतील.
 • लहान मुलांसाठी तयार केलेल्या चित्रपटांमुळे मुलांना ज्ञान मिळते आणि त्यांचे मनोरंजन होते त्याचसोबत हे चित्रपट आकलन सुलभ असतात. अशाप्रकारे लहान मुलांमध्ये आवड निर्माण होऊन त्यांच्या मनावर संस्कार होतात. लहान मुलांच्या विषयांशी संबधित श्रेणीत 7 चित्रपट दाखविले जातील.
 • 20 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी नसलेले कलात्मक आणि सिनेमॅटिकदृष्ट्या दर्जेदार लघु चित्रपट आपल्या मूळ ताज्या संकल्पनेद्व्वारे प्रेक्षकांच्या कल्पनेचा वेध घेतात. लघुपट श्रेणीत 6 चित्रपट सादर होतील.
 • भारतीय पुनर्संचयित उत्कृष्ट - 5 चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

एससीओ चित्रपट महोत्सवात एससीओ देशांमधून एकूण 57 चित्रपट प्रदर्शित केले जातील. स्पर्धा विभागात 14 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहेत आणि ते प्रदर्शित केले जातील  तर स्पर्धेतर विभागात 43 चित्रपट प्रदर्शित केले जातील.

स्पर्धा विभागासाठी एकूण 14 चित्रपटांना नामांकन देण्यात आले आहे.

 • निखिल महाजन दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि पान नलिन दिग्दर्शित गुजराती चित्रपट ‘द लास्ट फिल्म शो’ यांना भारताच्या सदस्य राज्यातून नामांकन मिळाले आहे.
 • ए. झैरोव दिग्दर्शित रशियन चित्रपट "मॉम, आय एम अलाईव्ह !", एम मामीरबेकोव्ह आणि बैराकिमोव्ह अल्दियार दिग्दर्शित पॅरालिम्पियन हे चित्रपट कझाकस्तानच्या सदस्य राज्यातून नामांकित आहेत.
 • बाकित मुकुल, दास्तान झापर उलू आणि उई सत्यलाट यांनी दिग्दर्शित केलेला अकिर्की कोच (द रोड टू ईडन) आणि तालाईबेक कुलमेंदीव दिग्दर्शित (होम फॉर सेल) या किर्गिझ चित्रपटांना किर्गिस्तानच्या सदस्य राज्यातून नामांकन मिळाले आहे.
 • यिहुई शाओ यांनी दिग्दर्शित केलेला इटालियन आणि चिनी चित्रपट बी फॉर बिझी आणि शिओझी राव दिग्दर्शित होम कमिंग हे चीनी चित्रपट चीनच्या सदस्य राज्यातून नामांकित आहेत.
 • लिउबोव्ह बोरिसोवा सखा दिग्दर्शित रशियन चित्रपट डोन्ट बरी मी विदाऊट इव्हान आणि एव्हगेनी ग्रिगोरेव्ह दिग्दर्शित पोडेलनिकी (द रॉयट) या रशियन चित्रपटांना रशियाच्या सदस्य राज्याने नामांकन दिले आहे.
 • डी.मासायदोव्ह आणि मेरास यांनी दिग्दर्शित केलेला एएल किस्मती (द फेट ऑफ अ वूमन) आणि हिलोल नसिमोव दिग्दर्शित (लीगसी) या उझबेक चित्रपटांना उझबेकिस्तानच्या सदस्य राज्यातून नामांकन मिळाले आहे.
 • मुहिद्दीन मुझफ्फर आणि ओखिरिन सयदी सयोद दिग्दर्शित ताजिक चित्रपट डोव (फॉर्च्युन) आणि महमद्राबी इस्मोइलोव्ह दिग्दर्शित (हंटर्स फायनल प्ले) यांना ताजिकस्तानच्या सदस्य राज्यातून नामांकन मिळाले आहे.

SCO चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट:

निखिल महाजन दिग्दर्शित सर्वाधिक प्रशंसित मराठी चित्रपट गोदावरी आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा श्रेणीतील ऑस्करसाठी भारताचा अधिकृत प्रवेश मिळालेला लास्ट फिल्म शो म्हणून ओळखला जाणारा गुजराती चित्रपट छेल्लो शो स्पर्धा विभागात दाखवला जाईल.

यासोबतच शूजित सरकारचा सरदार उधम, एस.एस. राजामौलीचा कालातीत चित्रपट आरआरआर, एससीओ चित्रपट महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. डायरेक्टर फोकसमधील संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी, चिल्ड्रन फोकसमधील मृदुल टूल्सीदासचा टूलसीदास ज्युनिअर आणि चेतन भाकुनी यांचा जुगलबंदी हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. शिवाय पाच पुनर्संचयित क्लासिक चित्रपट देखील महोत्सवात प्रदर्शित केले जातील. शतरंज के खिलाडी; (1977, हिंदी), सुबर्णरेखा (1965, बंगाली), चंद्रलेखा (1948, तमिळ), इरु कोडगुल (1969, तमिळ) आणि चिदंबरम (1985, मल्याळम) यांचा त्यात समावेश आहे.

भारतीय चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसह या महोत्सवात सहभागी होणारे शांघाय सहकार्य संघटनेच्या देशातील नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन ('मास्टरक्लासेस') आणि संवादात्मक ('इन कॉन्व्हर्सेशन') सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. अॅनिमेशनच्या इतिहासाचा मागोवा घेणारे आणि अॅनिमेशन तसेच दृश्य परिणामांच्या (व्हिज्युअल इफेक्ट्सच्या) मदतीने 'दृश्यचित्र तयार करण्याच्या' अमर्याद संधींचे सादरीकरण करणाऱ्या सत्रांचे आयोजन उद्योग तज्ञांसोबत करण्यात आले आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रपट वितरण आणि चित्रपटाच्या भाषेच्या अनुवादांचे परिदृश्य बदलण्यासंदर्भातही काही सत्रे ठेवण्यात आली आहेत.

 • या महोत्सवात “एससीओ प्रदेशात भारतीय चित्रपटांची लोकप्रियता वाढवणे” या विषयावर चर्चासत्र होणार असून त्यात चित्रपट निर्माते राहुल रवैल, रमेश सिप्पी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता चैतन्य चिंचलीकर हे सहभागी होणार आहेत.
 • सुप्रसिद्ध गायक आणि एससीओ चित्रपट महोत्सवासाठीचे परीक्षक दिमाश कुदैबरगेन यांचे “संगीताचे संयोजन करताना- अडथळ्यांची श्रुंखला तोडताना” या विषयावरील सत्र होणार आहे. दिमाश हे कझाकस्तान देशातील कलाकार असून 13 पेक्षा जास्त भाषांमध्ये विविध संगीत प्रकारांतील गाणी ते गाऊ शकतात.
 • महोत्सवामध्ये “दिग्दर्शकांतील एकतानता – विविध संस्कृती, पात्रे आणि देश यांच्यातील सहकारी संबंध” तसेच “महोत्सवातील चित्रपट एससीओ देशांमध्ये सादर करण्यातील आव्हाने आणि वाव” या विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. एससीओ देशांतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते यात सहभागी होतील.
 • उपरोल्लेखित चर्चासत्रांसह – सध्याच्या काळात फिचर फिल्मला असलेला नाट्यविषयक वाव तसेच महोत्सवात जर विहित चित्रपटांच्या बाहेरील चित्रपट सादर करता येत असतील तर त्याला असलेला वाव आणि आव्हाने- या विषयावर भारत आणि एससीओ प्रदेशातील देशांच्या तज्ञांचे सखोल विचारमंथन होईल.
 • भारतीय अॅनिमेशन क्षेत्राच्या दृष्टीकोनातून प्रथमच या क्षेत्राचा उदय झाल्यापासून आतापर्यंतची प्रगती यावर एक मास्टरक्लास देखील घेतला जाईल.

ऑनलाइन प्रतिनिधी नोंदणी,  https://sco.nfdcindia.com/  या शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव पोर्टलवर करता येईल तसेच मुंबईतील पेडर रोड येथील चित्रपट प्रभागाच्या (फिल्म्स डिव्हिजन) संकुलात मुख्य महोत्सवाच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी कक्ष उपलब्ध असतील. या महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी शुल्क रु. 300 किंवा रु.100 प्रतिदिन ठेवण्यात आले आहे. ही नोंदणी विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ठेवण्यात आली आहे.

रशियन आणि चीनी या एससीओच्या अधिकृत भाषा चित्रपट महोत्सवाच्या देखील अधिकृत भाषा असतील. मात्र, हा महोत्सव भारतात होणार असल्याने, इंग्रजी भाषा देखील व्यवहाराची भाषा म्हणून समाविष्ट करण्यात आलेली आहे. परीक्षक आणि स्थानिक प्रेक्षक यांच्या सोयीसाठी महोत्सवात सादर होणारे चित्रपट इंग्रजी भाषेतील सबटायटल्ससह प्रदर्शित केले जातील.

एससीओ बद्दल

शांघाय सहकार्य संघटना ही बहुपक्षीय संघटना 15 जून 2001 रोजी स्थापन  झाली. या संघटनेत सध्या आठ सदस्य देश (चीन, भारत, कझाकस्तान, किर्गिजस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान), तीन निरीक्षक देश (बेलारूस, इराण आणि मंगोलिया) आणि चौदा संवाद भागीदार (आर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, इजिप्त, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवेत, मालदीव, म्यानमार, यूएई आणि तुर्की) यांचा समावेश आहे.

 

Source: PIB New Delhi/ MM/SC/S.Tupe/S.Chitnis/PM

 

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव 2023 साठी ज्युरींमध्ये खालील परीक्षकांचा समावेश आहे:

 

भारत

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001UJ8I.jpg

राहुल रवैल, चित्रपट दिग्दर्शक

राहुल रवैल हे एक नामांकित  भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि संकलक आहेत जे त्यांच्या लव्ह स्टोरी, बेताब, अर्जुन, अंजाम आणि इतर अनेक चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी सनी देओल, अमृता सिंग, परेश रावल, काजोल, ऐश्वर्या राय बच्चन आणि जॉन अब्राहम यांसारख्या अनेक यशस्वी कलाकारांना पहिल्यांदा संधी दिली. त्यांनी 2017 आणि 2018 च्या  इफ्फी मध्ये इंडियन पॅनोरमा आणि 2019 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी ज्युरीचे अध्यक्षपद भूषवले आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे नेतृत्व केले. त्यांचे ‘राज कपूर - द मास्टर अॅट वर्क’ हे पुस्तक चित्रपटसृष्टीच्या भावी  विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक मानले जाते.

 

चीन

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002AT3Q.png

निंग यिंग, चित्रपट दिग्दर्शक

निंग यिंग हे जागतिक स्तरावरील नामांकित आणि पुरस्कार विजेते चीनी चित्रपट दिग्दर्शक आहेत, त्या अनेकदा  चीनच्या सहाव्या पिढीतील चित्रपट निर्माता समूहाचे सदस्य राहिल्या आहेत. अलीकडच्या दशकात बीजिंगमध्ये झालेल्या मोठ्या बदलांचे ज्यात विश्लेषण केले आहे त्या बीजिंग ट्रायलॉजी - फॉर फन, ऑन द बीट आणि आय लव्ह बीजिंग यांसारख्या  चित्रपटांसाठी त्या ओळखल्या  जातात. त्यांच्या रेलरोड ऑफ होप  (2002) या चित्रपटाने संपूर्ण चीनमध्ये सामान्य मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि ग्रँड प्रिक्स डू सिनेमा डू रील जिंकले आणि परपेच्युअल मोशनचा (2005) प्रीमियर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये झाला.

 

कझाकिस्तान

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003GHKV.png

दिमाश कुडैबर्गेन, संगीतकार

दिमाश कुडैबर्गेन हे पॉप, शास्त्रीय युगूल(जोडीनं) लोकनृत्य, ऑपेरा प्रकारातील पॉप संगीत शैलीतील जगप्रसिद्ध आणि प्रतिभावान संगीतकार आहेत. दिमाश आणि त्यांचे संगीत संपूर्ण पूर्व युरोप आणि आशियामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण पाहण्यास उत्सुक असलेले चाहते विशेषत: कझाकिस्तान (त्यांची जन्मभूमी), चीन आणि रशियासह 120 हून अधिक देशांमध्ये आहेत. गायन कौशल्याचे श्रेय त्यांच्या सहा स्वराष्टकात सहज फिरू शकणाऱ्या त्यांच्या गळ्याला आणि प्रेक्षकांशी जुळलेल्या सांगितीक तारांना जातं.

 

किर्गिझस्तान

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004P746.png

गुलबरा तोलोमुशोवा, चित्रपट निर्माती आणि चित्रपट समीक्षक

गुलबरा तोलोमुशोवा या एक पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्माती आणि चित्रपट समीक्षक असून त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ज्युरी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्या एफआयपीआरईएससीआय (द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स) आणि एनईटीपीएसी  (नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा) च्या सदस्य आहेत. किर्गिझस्तानच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयातील सिनेमॅटोग्राफी विभागातल्या त्या एक आघाडीच्या  तज्ञ आहेत आणि चित्रपट क्षेत्रातल्या  प्रभावी कामाबद्दल त्यांना त्यांच्या देशात आणि परदेशात गौरवण्यात आले आहे.

 

रशिया

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005PGIA.png

इव्हान कुद्रियावत्सेव, चित्रपट निर्माता आणि पत्रकार

इव्हान कुद्रियावत्सेव हे प्रसिद्ध पत्रकार आणि चित्रपट निर्माता, तसेच मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि नॅशनल अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्य आहेत. सिनेमा टीव्ही चॅनेलचे मुख्य संपादक म्हणून ते काम पाहतात आणि रशियाच्या चित्रपट क्षेत्रातील तज्ञ तसेच रशियाच्या चित्रपट उद्योग व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या गोल्डन ईगल पुरस्काराच्या तज्ञ परिषदेचे प्रमुख आहेत. 2009 पासून, इव्हान रशिया 24 या रशियाच्या प्रमुख वृत्तवाहिनीवर इंडस्ट्रिया किनोहा चित्रपट विषयक साप्ताहिक कार्यक्रम सादर करतात.

 

ताजिकिस्तान

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006U5X6.png

मेहमेदसैद शोहियोन, चित्रपट निर्माता, अभिनेता, लेखक

मेहमेदसैद शोहियोन एक आघाडीचे अभिनेता, निर्माता आणि लेखक असून गेल्या 30  वर्षांपासून सांस्कृतिक आणि रंगभूमी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि वॉटर बॉय (2021), फॉर्च्युन (2022), आणि बचाई होबी (2020) यांसारख्या चित्रपटांसह चित्रपट, नाटक आणि निर्मितीच्या क्षेत्रात 25 हून अधिक चित्रपट तसेच चित्रपट विषयक  लिखाण केले आहे. ते ताजिकिस्तानच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे पहिले उपमंत्री आणि दूरदर्शन आणि रेडिओ प्रसारण समितीचे अध्यक्ष होते. सध्या ते  तोजिकफिल्मचे संचालक आहेत.

 

उझबेकिस्तान

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007SUFY.png

मत्याकुब सादुल्लायेविच मॅकनोव्ह, अभिनेता

मात्याकुब सादुल्लायेविच मॅकनोव्ह हे एक प्रसिद्ध अभिनेते असून त्यांना  ‘ऑनर्ड आर्टिस्ट ऑफ द रिपब्लिक ऑफ उझबेकिस्तान’ (2001), ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप (डस्टलिक) (2012) या मानद पुरस्काराने तसेच ‘फॉर डिस्टिंगविषद लेबर’ (2021) ने सन्मानित करण्यात आले आहे.  त्यांनी 1977 मध्ये उझबेकिस्तानच्या कला आणि संस्कृती संस्थेतून पदवी प्राप्त केली आणि डॅडीज डॉटर, होली सिनर, नाईट व्हिजिटर, डेलेनी मायसारा, सतन्स एंजल्स सारख्या नाटकांच्या  निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका बजावत रंगभूमीवरील अभिनेता म्हणून सुरुवात केली आणि द अवेकनिंग आणि द युथ ऑफ जिनियस सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1893374) Visitor Counter : 417


Read this release in: English , Urdu , Hindi