पंतप्रधान कार्यालय

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांतील 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांचे नाव देण्याच्या समारोहातील पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 23 JAN 2023 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2023

 

नमस्कार,

कार्यक्रमाला उपस्थित देशाचे गृहमंत्री अमित शाह, अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल, संरक्षण दल प्रमुख, आपल्या तीनही सेनांचे प्रमुख, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक, कमांडर इन चीफ, अंदमान आणि निकोबार कमांड, सर्व अधिकारीगण, परमवीर चक्र विजेते आणि वीर जवानांचे कुटुंबीय, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो.

आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे, देशात हा दिवस पराक्रम दिवस म्हणून, प्रेरणा दिवस म्हणून, साजरा केला जातो. सर्व देशबांधवांना पराक्रम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज पराक्रम दिनाच्या प्रसंगी अंदमान निकोबार द्वीपसमूहात सूर्याची प्रभात किरणे नवा इतिहास लिहित आहेत. आणि जेव्हा इतिहास बनत असतो तेव्हा येणाऱ्या शतकांत त्याचे स्मरण ठेवले जाते, तो समजून घेतला जातो, त्याचे मूल्यमापन केले जाते आणि सदैव प्रेरणा देत राहते. आज अंदमान निकोबारच्या 21 बेटांचे नामकरण झाले आहे. ही 21 बेटे आता परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जातील. ज्या बेटावर नेताजी सुभाषचंद्र बोस राहिले होते, तिथे त्यांचे आयुष्य आणि योगदान यावर आधारीत प्रेरणा स्थळ स्मारकाचे भूमिपूजन देखील आज करण्यात आले आहे. आजचा दिवस स्वातंत्र्याच्या अमृत काळातील एक महत्वाचा अध्याय म्हणून येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील. नेताजींचं हे स्मारक, हुतात्मा आणि वीर जवानांच्या नावावर ही बेटं, आपल्या तरुणांना, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक शाश्वत  प्रेरणास्थळ बनेल. मी अंदमान निकोबार बेटांवर राहणाऱ्या लोकांना आणि सर्व देशवासियांना यासाठी अनेक अनेक शुभेच्छा देतो. मी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि परमवीर चक्र विजेता योद्ध्यांना श्रद्धापूर्वक नमन करतो.

बंधू आणि भगिनींनो,

अंदमानची ही भूमी ही अशी भूमी आहे, जिच्या आसमंतात सर्वप्रथम मुक्त तिरंगा फडकला होता. या धरतीवर पहिल्यांदा भारत सरकार बनले होते. या सर्वांसोबतच अंदमानच्या या भूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सारख्या अनेक वीरांनी देशासाठी तप, सहनशीलता आणि बलिदानाची पराकाष्ठा केली होती. सेल्युलर जेलच्या कोठड्या, त्यांच्या भिंतींवर लावलेल्या प्रत्येक वस्तू आज देखील त्यांची पीडा, त्यांचा त्रास इथे येणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांना ते स्वर ऐकू येतात. पण दुर्दैवाने स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या स्मृतीं ऐवजी, अंदमानची ओळख गुलामीच्या खुणांमध्ये अडकवून ठेवली गेली. आपली बेटांच्या नावांत देखील गुलामगिरीची छाप होती, ओळख होती. माझं सौभाग्य असं, की चार – पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी पोर्ट ब्लेयरला गेलो होतो, तेव्हा मला तीन मुख्य बेटांना भारतीय नावं देण्याची संधी मिळाली. आज रॉस आयलंड नेताजी सुभाषचंद्र बोस बेट बनले आहे. हेवलॉक आणि नील आयलंड स्वराज आणि शहीद आयलंड बनले आहेत. आणि यात सर्वात विशेष गोष्ट ही आहे, की ‘स्वराज’ आणि ‘शहीद’ ही नावं, तर स्वतः नेताजींनी दिली होती. या नावांना देखील स्वातंत्र्यानंतर महत्व दिले गेले नाही. जेव्हा आझाद हिंद सेनेच्या सरकारला 75 वर्ष पूर्ण झाले, तेव्हा आमच्या सरकारने ही नावे पुन्हा वापरात आणली.

मित्रांनो,

आज 21व्या शतकात आपण हे बघितलं आहे, की कशाप्रकारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यानंतर अडगळीत टाकण्याचे प्रयत्न झाले. आज त्याच नेताजींची देश क्षणोक्षणी आठवण ठेवत आहे. अंदमानात ज्या ठिकाणी नेताजींनी सर्वात प्रथम तिरंगा फडकवला होता, तिथे आज गगनचुंबी तिरंगा आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगत आहे. संपूर्ण देशातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा लोक इथे येतात, तेव्हा समुद्रकिनारी फडकणारा तिरंगा बघून त्यांच्या मनात देशभक्तीचे रोमांच उभे राहतात. आता अंदमानात यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जे संग्रहालय आणि स्मारक बनविण्यात येणार आहे, ते लोकांची अंदमान यात्रा अधिकच संस्मरणीय करतील.

2019 साली नेताजी यांच्या संबंधित एका वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण दिल्लीच्या लाल किल्ल्यात देखील झाले होते. आज लाल किल्ल्यावर जाणाऱ्या लोकांसाठी ते वस्तू संग्रहालय एक प्रकारे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.त्याचप्रमाणे, बंगालमध्ये त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशभरात हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला होता.त्यांचा वाढदिवस ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. म्हणजे, बंगालपासून ते दिल्लीपर्यंत आणि अंदमानपर्यंत देशातल्या सर्व भागात नेताजींना वंदन केले जात आहे, त्यांचा वारसा जतन केला जात आहे.

मित्रांनो,

गेल्या आठ-नऊ वर्षात, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित कित्येक कामे देशात करण्यात आली आहेत, खरे तर ही कामे स्वातंत्र्यानंतर लगेचच करायला हवी होती. मात्र, त्यावेळी ती झाली नाहीत. देशातील एका भागात, आझाद हिंद सेनेचे पहिले सरकार 1943 साली तयार झाले होते. आता देश, त्याचा गौरवाने स्वीकार करत आहे. जेव्हा आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली तेव्हा लाल किल्ल्यावर देशाने झेंडा फडकवून, नेताजींना वंदन केले होते. नेताजींशी संबंधित सर्व तपास फाइल्स सार्वजनिक करण्याची मागणी कित्येक दशकांपासून प्रलंबित होती. हे काम देखील देशाने संपूर्ण निष्ठेने पुढे नेले. आज आपल्या लोकशाही संस्थांसमोर, कर्तव्यपथावर देखील नेताजी बोस यांची भव्य प्रतिमा आपल्याला आपल्या कर्तव्याचे स्मरण करुन देते. मला असं वाटते, की देशहित लक्षात घेऊन, हे काम खूप आधीच करायला हवे होते. कारण, ज्या देशांनी आपले नायक-नायिका यांना योग्य वेळी जनमानसाशी जोडले, उत्तम आणि समर्थ आदर्श आदर्श प्रस्थापित केले, ते देश विकास आणि राष्ट्रनिर्मितीच्या स्पर्धेत खूप पुढे निघून गेले. आणि म्हणूनच, हेच काम स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारत करत आहे. संपूर्ण ताकद लावून करत आहे.

मित्रांनो,

ज्या 21 बेटांना, आज नवे नाव मिळाले आहे, त्यांच्या नामकरणाच्या मागेही अत्यंत गंभीर संदेश आहे. हा संदेश आहे- ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’या भावनेचा संदेश. हा संदेश आहे, देशासाठी दिलेल्या बलिदानाला अजरामर करण्याचा संदेश. वयम् अमृतस्य पुत्रा। (आम्ही अमृताचे पुत्र आहोत) आणि हा संदेश आहे -भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्य आणि पराक्रमाचा संदेश.

ज्या 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ही बेटे ओळखली जाणार आहेत, त्यांनी मातृभूमीच्या कणाकणाला आपल्या सर्वस्व मानलं होतं. भारत मातेच्या रक्षणासाठी त्यांनी आपलं सर्वस्व वाहून घेतले होते.   भारतीय लष्करातील ते वीर शिपाई देशातील वेगवेगळ्या राज्यांचे होते. त्यांची भाषा   आणि  जीवनशैली वेगवेगळी होती. परंतु भारतमातेची सेवा आणि मातृभूमीप्रति असलेली अतूट भक्ती त्यांना एकत्र ठेवत होती, जोडत होती. लक्ष्य एक, एक मार्ग, एकच उद्दिष्ट आणि संपूर्ण समर्पण.

मित्रहो,

ज्याप्रकारे समुद्र वेगवेगळ्या बेटांना जोडतो, त्याच प्रकारे एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना भारत मातेच्या प्रत्येक संतानात एकत्व जागवते, एकत्र आणते. मेजर सोमनाथ शर्मा, मेजर शैतान सिंह ते कॅप्टन मनोज पांडे सुभेदार जोगिंदर सिंग आणि लान्स नायक अल्बर्ट एक्का इथपर्यंत वीर अब्दुल हमीद आणि मेजर रामास्वामी परमेश्वरन यांच्यासह सर्व 21 परमवीर, सर्वांचा एकच संकल्प होता तो म्हणजे राष्ट्र सर्वप्रथम! इंडिया फर्स्ट!  हा त्यांचा संकल्प आता बेटांच्या नामांनी  अमर झाला आहे. कारगिल युद्धात  'ये दिल मांगे मोअर' चा विजय घोष करणारे कॅप्टन विक्रम, त्यांच्या नावे अंदमानातील एक पहाड समर्पित केला जात आहे.

बंधू भगिनींनो,

अंदमान निकोबारच्या या द्वीपांचे नामकरण त्या परमवीर चक्र विजेत्यांचा सन्मान तर आहेच त्याचबरोबर भारतीय सेनांचा सुद्धा सन्मान आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतदूर समुद्र असो की पहाड डोंगर निरीक्षण प्रदेश असो किंवा दुर्गम देशाच्या सेना देशातील कणाकणाच्या संरक्षणासाठी सिद्ध असतात. स्वातंत्र्यानंतर अगदी लगेचच आपल्या सेनेला युद्धाला सामोरे जावे लागले. प्रत्येक क्षणी, प्रत्येक आघाडीवर आमच्या सेनांनी आपले शौर्य सिद्ध केले आहे. राष्ट्र संरक्षणाच्या या मोहिमांना स्वतःला समर्पित करणाऱ्या या जवानांची, सेनेच्या योगदानाची व्यापक स्तरावर ओळख करुन देणे हे देशाचे कर्तव्यच होते. आज देश  ते कर्तव्य पूर्ण जबाबदारीने निभावण्याचा हरेक तऱ्हेने प्रयत्न करत आहे.  आज सैनिक आणि सेनांच्या नावाने पहिल्यांदाच देशाला ओळख मिळवून दिली जात आहे.

मित्रहो,

अंदमान ही अशी भूमी आहे जिथे जल ,निसर्ग, पर्यावरण, पुरुषार्थ, पराक्रम, परंपरा, पर्यटन, प्रबोधन, आणि प्रेरणा सर्व काही आहे.   जो मनापासून अंदमानला जाऊ इच्छित नाही  असा देशात कोण असेल? अंदमानचे सामर्थ्य फार मोठे आहे येथे अमाप संधी आहेत. या संधी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. हे सामर्थ्य समजून घेता आले पाहिजे.  गेल्या आठ वर्षांत देशाने या दिशेने सातत्याने प्रयत्न केले पर्यटन क्षेत्रात करोनाच्या फटक्यानंतर आता या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आहे. 2014 मध्ये देशभरातील जेवढे पर्यटक अंदमानत येत होते त्याच्या. जवळ जवळ दुप्पट  2022 मध्ये   इथे आले . म्हणजेच पर्यटकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्राशी सुसंगत रोजगार आणि उत्पन्न  वाढले आहे याशिवाय केल्या काही वर्षात एक अजून मोठा बदल झाला आहे. आधी लोक केवळ येथील निसर्ग सौंदर्य , येथील सागर किनाऱे या गोष्टींचा विचार करून अंदमानला येत असत, परंतु आता ही ओळख विस्तारत आहे. आता अंदमानाशी जोडल्या गेलेल्या स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दलही उत्सुकता वाढत आहे.

आता  इतिहास समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी येथे येत आहेत. त्याचबरोबर अंदमान निकोबारची बेटे म्हणजे आमच्या समृद्ध आदिवासी परंपरांची धरती आहे. आपल्या परंपरेबद्दलच्या अभिमानाची भावना या परंपरेप्रति आकर्षण वाढवते. आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित स्मारक आणि सेनेच्या शौर्याचा सन्मान यामुळे देशवासियांमध्ये येथे येण्यासंबंधी उत्सुकता निर्माण होईल. भविष्यात इथे पर्यटनाशी निगडित अगणित संधी निर्माण होतील.

मित्रहो,

आपल्या देशातील आधीच्या सरकारांमध्ये विशेषतः विकृत वैचारिक राजकारणामुळे दशकांपासून  जो न्यूनगंड आणि आत्मविश्वासाची कमतरता आहे, त्यामुळे देशाच्या सामर्थ्याला नेहमीच कमी लेखले गेले. मग ते आपले हिमालयीन राज्य असो , खास ईशान्येकडील राज्य असो वा अंदमान निकोबार सारखी समुद्री बेटे. यांच्या बाबतीत असा विचार असे की ही तर दूरवरची दुर्गम आणि वेगळे प्रदेश आहेत. या विचारांमुळे अशा भागांची कित्येक दशकांत पर्यंत उपेक्षा झाली, त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेले. अंदमान निकोबार द्वीपसमूह याचाही साक्षी आहे . जगात असे अनेक देश आहेत जेथे कित्येक विकसित बेटे आहेत त्यांचा आकार आमच्या अंदमान निकोबारपेक्षाही कमी आहे. परंतु सिंगापूर असो, मालदीव वा सेशैल्स असो हे देश आपल्या संसाधनांच्या योग्य वापरामुळे पर्यटनाचे एक मोठे आकर्षण केंद्र बनले आहेत.  संपूर्ण जगातून लोक या देशांमध्ये पर्यटन आणि व्यापार यांच्याशी संबंधित शक्यता आजमावण्यासाठी येतात. हेच सामर्थ्य भारतातील बेटांकडेही आहे, आपणही जगाला खूप काही देऊ शकतो परंतु याकडे त्यावर लक्ष दिले गेले नाही. वास्तव हे आहे की आपल्याकडे किती द्वीप आहेत किती प्रदेश आहे याचा हिशोबही ठेवला गेला नव्हता. आता देश या दिशेने पुढे जात आहे. आता देशातील नैसर्गिक संतुलन आणि आधुनिक संसाधनांसोबतच पुढे जात आहे. आम्ही 'सबमरीन ऑप्टिकल फायबर'च्या माध्यमातून वेगवान इंटरनेट जोडण्याचे काम सुरू केले. आता अंदमानमध्येही बाकीच्या देशांप्रमाणे वेगवान इंटरनेट पोहोचत आहे. डिजिटल पेमेंट आणि इतर डिजिटल सेवांचाही येथे वेगाने विस्तार होत आहे. याचा जास्त फायदा अंदमानमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांनाच होत आहे.

मित्रहो,

भूतकाळात अंदमान निकोबारने स्वातंत्र्याच्या लढाईला नवीन दिशा दिली होती त्याच प्रकारे भविष्यात हे क्षेत्र देशाच्या विकासाला  नवी गती देईल. आपण एक असा भारत निर्माण करू जो सक्षम असेल समर्थ असेल आणि आधुनिक विकासाचे शिखरे गाठील. याच सदिच्छांसोबंत मी एक वेळ नेताजी सुभाष आणि आमच्या सर्व वीर जवानांच्या चरणी नमन करतो आपल्या सर्वांना पराक्रम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 खूप खूप धन्यवाद.

 

 

G.Chippalkatti/Radhika/Vijaya/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893170) Visitor Counter : 379