संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कलवरी वर्गातील ‘वागीर’ ही पाचवी पाणबुडी मुंबईत नौदल गोदी येथे झालेल्या समारंभात भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल

Posted On: 23 JAN 2023 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2023

 

  • भारतीय नौदलाचा प्रकल्प-75 आणि मेक इन इंडिया उपक्रमामध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश
  • आयएनएस वागीर ही पाणबुडी पश्चिमी नौदल कमांडचा भाग असेल
  • या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत तसेच त्यात लांब पल्ल्याच्या गाईडेड टोर्पेडोज आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रे बसविलेली आहेत.

भारतीय नौदलाची पाचवी आयएनएस वागीर ही रडारला चकवा देणारी स्कॉर्पिन प्रकारची पाणबुडी आज, 23 जानेवारी 2023 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईत नौदल गोदी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरि कुमार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुंबईच्या माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनीतर्फे स्कॉर्पिन रचना प्रकारातील एकूण सहा पाणबुड्यांची स्वदेशी निर्मिती करण्यात येणार असून या कामी कंपनीला फ्रान्सच्या नेवल उद्योग समूहाचे सहकार्य लाभले आहे. आयएनएस वागीर ही पाणबुडी पश्चिमी नौदल कमांडमधील पाणबुड्यांच्या ताफ्यात समाविष्ट होणार असून कमांडच्या शस्त्रास्त्र क्षमतेचा आणखी एक अत्यंत शक्तीशाली भाग असेल.

नौदलाच्या प्रकल्प 75 (पी75) अंतर्गत 12 नोव्हेंबर 2020 रोजी वागीर पाणबुडीचे अनावरण झाले आणि सागरी चाचण्या पूर्ण करून ती 20 डिसेंबर 2022 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. आतापर्यंत स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेल्या सर्व पाणबुड्यांमध्ये अत्यंत कमी वेळात बांधण्यात आलेली पाणबुडी असा मान वागीर पाणबुडीला मिळाला आहे.

स्कॉर्पिन प्रकारच्या पाणबुड्या अत्यंत शक्तिशाली आहेत, त्यांच्यामधली रडार यंत्रणा ही सर्वात अत्याधुनिक  यंत्रणापैकी  एक आहे. तसेच ही पाणबुडी लांब पल्ल्याच्या गाईडेड टोर्पेडोज आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रे यांनी सुसज्ज आहे. या श्रेणीतील पाणबुड्यांवर आधुनिक सोनार यंत्रणा तसेच संवेदक यंत्रणा बसविलेली असून त्यामुळे या पाणबुडीला अत्यंत उत्कृष्ट परिचालन क्षमता लाभली आहे.

 

नौदल प्रमुखांचे भाषण

आजच्या कार्यक्रमात. उपस्थितांना संबोधित करताना सीएनएस अर्थात नौदल प्रमुख म्हणाले की आयएनएस वागीर या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या परिचालन क्षमतेला लक्षणीय प्रोत्साहन मिळेल आणि ही पाणबुडी कोणत्याही संकटात शक्तिशाली रक्षक  म्हणून सिद्ध होईल.  

24 महिन्यांइतक्या कमी कालावधीत भारतीय नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आलेली ही तिसरी पाणबुडी आहे ही बाब त्यांनी अधिक ठळकपणे नमूद केली. “यातून आगामी काळ भारताच्या जहाजबांधणी उद्योगाचा आणि आपल्या संरक्षण परिसंस्थेच्या परिपक्वतेचा काळ असेल हे अधोरेखित होते. ही पाणबुडी म्हणजे आपल्या जहाजबांधणी गोदींची मिश्र आणि गुंतागुंतीच्या यंत्रणा उभारण्याची क्षमता आणि अनुभव याचे देखील झळाळते उदाहरण आहे. वर्ष 2047 पर्यंत संपूर्णपणे आत्मनिर्भर सैन्य दल होण्याच्या भारतीय नौदलाच्या सुस्पष्ट कटिबद्धतेला आणि दृढ संकल्पाला अधिक मजबुती देण्याचे काम या पाणबुडीच्या समावेशाने केले आहे.

वागीर पाणबुडीचा नौदलात समावेश होण्यासाठी अत्यंत उल्लेखनीय प्रयत्न करणारे माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनीचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक आणि कर्मचारीवर्ग यांचे अभिनंदन करून सीएनएस म्हणाले की माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनी हा भारतीय नौदलाचा अत्यंत जवळचा आणि अनमोल सहकारी आहे. भारतीय नौदलाचे ‘खरेदीदारांचे नौदल’ पासून ‘नवी उभारणी करणारे नौदल’ असे स्थित्यंतर घडविण्यात ही कंपनी आघाडीवर असते अशा शब्दात त्यांनी कंपनीची प्रशंसा केली.

 

वागीर  - सँड शार्क

समुद्रातील वाळूत वावरणारा शार्क ‘छुप्या कामगिऱ्या आणि निर्भयता’ यांचे प्रतिक आहे आणि याच दोन वैशिष्ट्यांचे पाणबुड्यांच्या कामगिरीशी साधर्म्य आहे. साहस, शौर्य, समर्पण’ हे पाणबुडीचे ध्येयवाक्य धैर्य, शौर्य आणि समर्पणाच्या महत्त्वाच्या मूल्यांचे प्रतिक आहे.

वागीर पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल होणे हे भारतीय नौदलाला ‘नवी उभारणी करणारे नौदल’ हे स्थान प्राप्त करून देण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे; तसेच हे जगातील प्रमुख जहाज आणि पाणबुडी उभारणारी कंपनी म्हणून असलेल्या माझगाव डॉक कंपनीच्या स्थानाचे प्रतिबिंब देखील आहे. प्रकल्प-75 देखील देशाच्या संरक्षण क्षेत्रातील सामग्रीच्या उत्पादन क्षेत्रात या कंपनीला असलेल्या महत्वाच्या बाबतीत लक्षणीय टप्पा आहे.

भारतीय नौदलात वागीर पाणबुडीचा समावेश ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या उत्सवी काळात होत आहे. या स्वदेशी बांधणीच्या पाणबुडीचा नौदलाच्या सेवेत समावेश पुन्हा एकदा ‘आत्मनिर्भर भारत’साकारण्याच्या दिशेने केलेले जोरकस प्रयत्न आणि एकाग्रता दर्शविते.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893125) Visitor Counter : 421


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi