संरक्षण मंत्रालय
कलवरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी वागीर, 23 जानेवारी 2023 रोजी नौदलाच्या सेवेत दाखल होणार
Posted On:
19 JAN 2023 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2023
भारतीय नौदलाच्या वागीर या कलवरी वर्गातील पाचव्या पाणबुडीचा, येत्या 23 जानेवारी 2023 रोजी नौदलाच्या ताफ्यात समावेश होणार आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या पाणबुड्या भारतात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मुंबई द्वारे मेसर्स नेव्हल ग्रुप, फ्रान्सच्या सहकार्याने तयार केल्या जात आहेत. कलवरी वर्गाच्या चार पाणबुड्या यापूर्वीच भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत.
गौरवशाली भूतकाळ आणि नवी सुरुवात
यापूर्वीची वागीर पाणबुडी 01 नोव्हेंबर 1973 रोजी कार्यान्वित झाली आणि तिने प्रतिबंधात्मक गस्तीसह अनेक मोहिमा हाती घेतल्या. सुमारे तीन दशके देशाची सेवा केल्यावर 07 जानेवारी 2001 रोजी ही पाणबुडी नौदलाच्या सेवेतून निवृत्त करण्यात आली.
12 नोव्हेंबर 20 रोजी नव्या रुपात सादर झालेल्या ‘वागीर’ या पाणबुडीचं वैशिष्ट्य म्हणजे, आतापर्यंतच्या सर्व स्वदेशी पाणबुड्यांच्या तुलनेत, या पाणबुडीच्या उभारणीला सर्वात कमी वेळ लागला आहे. या पाणबुडीने 22 फेब्रुवारी रोजी आपल्या सागरी चाचण्यांसाठी समुद्रात पहिल्यांदाच प्रवेश केला, आणि नौदलाच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी ती सर्वसमावेशक स्वीकृती तपासण्यांची मालिका आणि कठोर, आव्हानात्मक सागरी चाचण्यांमधून पार पडली. ही पाणबुडी 20 डिसेंबर 22 रोजी मेसर्स एमडीएलने भारतीय नौदलाच्या स्वाधीन केली.
वागीर - पाचवी रुद्र पाणबुडी
वागीर भारताच्या सागरी हितसंबंधांना पुढे नेण्याच्या दिशेने भारतीय नौदलाच्या क्षमतेला चालना देईल, आणि ती भूपृष्ठविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, दारुगोळा पेरणे आणि पाळत ठेवण्याच्या मोहिमांसह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी सक्षम आहे.
वागीर-सँड शार्क
सँड शार्क हे 'गुप्तता आणि निर्भयपणा' चे प्रतिनिधित्व करते, हे दोन गुण, जे पाणबुडीची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करणारे समानार्थी शब्द आहेत.
वागीर चा समावेश, हे भारतीय नौदलाचे, जहाजबांधणी करणारे नौदल म्हणून स्थान निश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे, तसेच यामधून दर्जेदार जहाज आणि पाणबुडी बनवणारी गोदी (यार्ड) म्हणून एमडीएल ची क्षमताही प्रतिबिंबित होते.
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892280)
Visitor Counter : 500