आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आरोग्य आणि आरोग्य सेवा समुदायासाठी जागतिक आर्थिक परिषदेने आयोजित केलेल्या स्नेह-भोजन कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी संबोधित केले
सेवा हे भारताचे आरोग्यविषयक तत्त्वज्ञान असल्याचा केला पुनरुच्चार; सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अंत्योदय संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कटिबद्ध
संधींचा लाभ घेण्यासाठी आणि सर्वांसाठी एका निरोगी जगाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासाठी सर्व भागधारकांना भारतासोबत भागीदारी करण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2023 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2023
"आम्ही आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढवण्याच्या दिशेने काम करत असून आरोग्य सेवांचा दर्जा, सुगम्यता आणि किफायतशीर दर यावर लक्ष केंद्रित करून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी तसेच आरोग्य सेवा वितरण सुधारण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत." स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेने (WEF) आरोग्य आणि आरोग्य सेवा समुदायासाठी आयोजित केलेल्या स्नेह- भोजन प्रसंगी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया बोलत होते.
आरोग्यसेवेला सेवा म्हणून सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या भारताच्या तत्वज्ञानाचा डॉ. मांडविया यांनी पुनरुच्चार केला. “ सुमारे 50 कोटी लोकांना आरोग्य विमा पुरवणारी पंतप्रधान जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना असो किंवा 150,000 आरोग्य आणि निरामयता केंद्रांची स्थापना असो, आम्ही 'अंत्योदय', म्हणजेच 'शेवटच्या व्यक्तीचा उदय' हा दृष्टिकोन आरोग्यसेवेमध्ये अवलंबला असून सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती सुनिश्चित करण्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे" असे ते म्हणाले.
औषध निर्मिती क्षेत्रातील भारताच्या योगदानाचे कौतुक करताना डॉ. मांडविया म्हणाले की, “ जेनेरिक औषधांमध्ये भारत जागतिक स्तरावर अग्रेसर आहेच, त्याचबरोबर अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे अमेरिकेबाहेर भारतात सर्वाधिक कारखाने आहेत. ते संशोधन आणि विकास केंद्र म्हणून उदयाला आले आहे आणि उच्च-दर्जाच्या नैदानिक सेवांसाठी आघाडीच्या ठिकाणांपैकी एक आहे. संपूर्ण जगाला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सक्षम व्यवस्था उभारण्यासाठी, सरकार लवकरच सुरु होणाऱ्या 'हील इन इंडिया' या उपक्रमाद्वारे वैद्यकीय पर्यटनाला चालना देत आहे.”
डॉ. मांडविया यांनी भाषणाचा समारोप करताना सर्व भागधारकांना भारताकडे संधींची भूमी म्हणून पाहण्याचे आणि भारतासोबत भागीदारी करून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रयत्नांमुळे भारत आणि संपूर्ण जग निरोगी बनेल.
डॉ. मनसुख मांडविया हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथील काँग्रेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीमध्ये अनेक प्रमुख सत्रांना उपस्थित आहेत. याच सत्रांपैकी एका सत्रात ते जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल विल्हेल्म लॉटरबॅच यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी झाले. त्यांनी जर्मनीच्या आरोग्य मंत्र्यांच्या सहकार्याची प्रशंसा केली आणि भविष्यात हे सहकार्य असेच सुरु राहण्याची आणि अधिक मजबूत करण्याची आशा व्यक्त केली.
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1891820)
आगंतुक पटल : 262