संरक्षण मंत्रालय

75व्या लष्कर दिनानिमित्त बेंगळुरू येथे आयोजित 'शौर्य संध्या' या विशेष कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह झाले सहभागी, देशाची प्रादेशिक अखंडता सुनिश्चित केल्याबद्दल तसेच आपल्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाने देशाची समृद्ध परंपरा टिकवून ठेवल्याबद्दल केली सशस्त्र दलांची प्रशंसा


शौर्य, निष्ठा, शिस्त मानवी दृष्टीकोनातून मदत तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन विषयक मोहिमा यासाठी जगात परिचित असलेले भारतीय लष्कर आपल्या बलवान आणि विश्वासार्ह स्तंभांपैकी एक असल्याचे संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 15 JAN 2023 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जानेवारी 2023

 

आजच्या 75 व्या लष्कर दिनानिमित्त बेंगळुरू येथे भारतीय लष्कराच्या शौर्य आणि साहसाचं दर्शविणारे 'शौर्य संध्या' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्यासह संरक्षण यंत्रणेच्या बेंगळुरू येथील इतर आस्थापनांचे अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना संबोधीत केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी लष्कर दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या. 1949 साली याच दिवशी जनरल (नंतरचे फील्ड मार्शल) के एम करिअप्पा यांनी शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून औपचारिकरित्या भारतीय सैन्याची कमान स्वीकारली होती आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर-इन-चीफ बनले होते. या घटनेला राजनाथ सिंह यांनी उजाळा दिला. यावेळी त्यांनी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांना श्रद्धांजली अर्पण केली. मूळचे कर्नाटकचे असलेल्या आणि स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून  फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय सैन्याला बळकट करण्यात महत्त्वाचे योगदान दिले असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. परकीय राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य क्रांतिकारकांनाही राजनाथ सिंह यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.

स्वातंत्र्यानंतर देशाची प्रादेशिक अखंडता कायम राखल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांची प्रशंसा केली. भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला दृढ निर्धाराने सामोरं जाते असं ते म्हणाले.  देशाची पश्चिम वा उत्तर सीमा असो, भारताच्या लष्करानं वरील सर्व आव्हानांना यशस्वीपणे तोंड दिले, त्यांनी अतुलनीय शौर्य, निष्ठा तसेच प्रसंगी बलिदान देत देशाची समृद्ध परंपरा जपली असं ते म्हणाले. 

भारतीय लष्कराची दृढ भावना आणि शौर्यामुळे जगभरात भारताचा सन्मान वाढला त्यासोबतच सर्व भारतीयांचा आत्मविश्वासही वाढला असं ते म्हणाले. भारतीय लष्कराच्या तीन्ही दलांनी वेळोवेळी आपले कर्तव्य कार्यक्षमतेने बजावले आहे, यासोबतच आपत्तीकाळातील मानवतावादी सहकार्य तसेच आपत्ती निवारण  व्यवस्थापनातही भारताचे सशस्त्र दल देशासह इतर मित्रदेशांसाठीही विश्वासार्ह भागीदार म्हणून कामी आले असल्याचे त्यांनी नमूद केले. 

जगातले एक मजबूत लष्कर अशी भारतीय लष्कराची जगभरातली ओळख आहे. शौर्य, निष्ठा आणि शिस्त असो वा मानवी दृष्टीकोनातून मदत  तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनातील त्यांची भूमिका जगाला परिचित असून आपले लष्कर हे नेहमीच देशाच्या सर्वात मजबूत आणि विश्वासार्ह स्तंभापैकी एक राहिले आहे असे त्यांनी अधोरेखीत केले.

गेल्या काही वर्षांत समाज, राजकारण ते अर्थव्यवस्था अशा प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. अशाच तऱ्हेने सुरक्षाविषयक आव्हानेही बदलली आहेत. ही आव्हाने केवळ काळानुरूप बदललेली नाहीत, तर त्यांच्यातील बदलाचा वेगही झपाट्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. ड्रोन, पाण्यात वापरता येणारे  ड्रोन आणि कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारलेल्या शस्त्रे आता वापरात आली आहेत. आजचं युग हे तंत्रज्ञानाधारीत झालं असून, सध्याच्या अद्ययावत तंत्रज्ञानविषयक प्रगतीमुळे ही आव्हाने अधिकच वाढली असल्यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.

देशासाठी एक मजबूत आणि सक्षम सुरक्षा व्यवस्था विकसित करण्यावरच सरकारने कायम भर दिला आहे, आणि सरकारचे हे धोरण देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

हा कार्यक्रम बेंगळुरू इथे झालेल्या 75 व्या लष्कर दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजीत केला गेला होता. विशेष म्हणजे पहिल्यांदाच राष्ट्रीय राजधानी क्षेत्राबाहेर लष्कर दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या लष्कराविषयी नागरीकांना, विशेषतः युवा वर्गाला अधिक जवळून जाणून घेता यावं, यादृष्टीनं त्यांचा सहभाग वाढावा या हेतूनं या कार्यक्रमाचं राष्ट्रीय राजधानी क्षेत्राबाहेर आयोजन केलं गेलं होतं.

 

* * *

N.Chitale/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1891454) Visitor Counter : 140


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil