विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि धोरण संशोधन संस्थेने साजरा केला आपला दुसरा स्थापना दिवस

Posted On: 14 JAN 2023 9:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीच्या सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च (सीएसआयआर-एनआयएससीपीआर), अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि धोरण संशोधन संस्थेने 13 जानेवारी 2023 रोजी आपला दुसरा स्थापन दिवस साजरा केला. एनआयएससीपीआर ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत एक घटक आहे. सीएसआयआर-एनआयएससीपीआर, 14 जानेवारी 2021 रोजी, सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन रिसोर्सेस (CSIR-NISCAIR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज (CSIR-NISTADS), या दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सीएसआयआर संस्थांच्या विलीनीकरणा द्वारे अस्तित्वात आली. तेव्हापासून, सीएसआयआर-एनआयएससीपीआर, आपला सुमारे 100 वर्षांचा समृद्ध वारसा आणि पूर्वीच्या संस्थांच्या मजबूत अंगभूत  क्षमतांचा वापर करून, विज्ञान धोरण संशोधन आणि विज्ञान दूरसंवाद  क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रतिष्ठित संस्था बनण्याच्या दिशेने आपल्या उपक्रमांना दिशा देत आहे. आपल्या प्रयत्नांद्वारे नवीन संस्थेने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (ST&I) धोरण अभ्यास आणि विविध भागधारकांमध्ये विज्ञान संवादाला प्रोत्साहन देण्याच्या, आणि विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि समाज यांना जोडणारा सेतू बनण्याच्या दिशेने मोठी प्रगती केली आहे.

स्थापना दिनाच्या कार्यक्रमात, सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या संचालक, प्रा. रंजना अग्रवाल यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात एनआयएससीपीआर ची ताकद आणि समृद्ध वारसा याविषयी माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या की, समाजासाठी मूर्त, दृश्यमान आणि फलदायी ठरावेत, यासाठी आपल्या उपक्रमांना सातत्याने गती द्यायला हवी.

आयआयटी मुंबई, भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक आणि सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रा. बी. एन. जगताप, यांनी स्थापना दिनानिमित्त व्याख्यान दिले. त्यांनी इंग्रजी शिक्षण कायदा 1835 पासून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पर्यंत भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये झालेले परिवर्तन स्पष्ट केले. त्यांचे व्याख्यान विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी होते.

 

एनआयएससीपीआरच्या स्थापना दिनाच्या समारंभात विविध प्रकारचे वैज्ञानिक साहित्य प्रकाशित करण्यात आले.

या विशेष प्रसंगी, अनेक वैज्ञानिक प्रकाशने प्रसिद्ध करण्यात आली. इंडस्ट्री 4.0: अ वे फॉरवर्ड फॉर सेल्फ-रिलायन्स अँड सस्टेनेबिलिटीया विषयावरील, जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (जेएसआयआर) चा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला. टीआरएल असेसमेंट बुलेटिन, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रश्नमंजुषा: सेलिब्रेटिंग आझादी का अमृत महोत्सवनावाचे पुस्तक, ‘ट्रेजर ऑफ इंडियन ट्रेडिशनया फ्लिप-बुकचे प्रकाशनही कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्वस्तिक (SVASTIK) छायाचित्रण स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. ही स्पर्धा 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

स्थापना दिन सोहळ्यादरम्यान सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशनद्वारे त्यांचे संशोधन आणि निष्कर्ष प्रदर्शित केले. सीएसआयआर-एनआयएससीपीआरचे वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश सुमन यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1891300) Visitor Counter : 173


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi