संरक्षण मंत्रालय
देशभरात 7 वा सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला; संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डेहराडून येथे मुख्य कार्यक्रम
माजी सैनिकांचे कल्याण सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे, ते देशाचा ठेवा आहेत: माजी सैनिकांच्या मेळाव्यात राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
डेहराडून छावणी क्षेत्रात (कॅन्टोनमेंट) शौर्य स्थळ सशस्त्र दलांना केले समर्पित
सीमावर्ती भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी ‘सोल ऑफ स्टील’ अल्पाइन चॅलेंजचा केला प्रारंभ
Posted On:
14 JAN 2023 5:04PM by PIB Mumbai
माजी सैनिकांची निःस्वार्थ सेवा आणि राष्ट्राप्रति त्यांनी दिलेले बलिदान तसेच शूरवीरांच्या कुटूंबियांप्रति एकजुटीचा आदर म्हणून, 14 जानेवारी 2023 रोजी देशभरात सातवा सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला. डेहराडूनमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रम झाला, याशिवाय देशभरात नऊ ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. डेहराडून इथे कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित माजी सैनिकांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना, संरक्षण मंत्र्यांनी अतुलनीय धैर्याने आणि बलिदानाने देशाच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे आणि अखंडतेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि कर्तव्य बजावताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. देशाची राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या सशस्त्र दलातील सेवारत तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडचे स्वातंत्र्यसैनिक, जवान आणि माजी सैनिकांचा विशेष उल्लेख केला, ज्यांनी राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी अतुलनीय शौर्य आणि समर्पणाचे दर्शन घडवले. स्वातंत्र्यसैनिकांना मदत करणारे वीर चंद्र सिंह गढवाली यांच्यासारखे शूर वीर उत्तराखंडचे होते. कारगिल युद्धादरम्यान या राज्यातील सैनिकांनी शत्रूच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून दृढ निर्धाराने देशाचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली,”असे ते म्हणाले.
सशस्त्र दलातील सैनिकांची निःस्वार्थ एकनिष्ठा आणि त्यागामुळे आपल्या नागरिकांना सुरक्षित वाटते आणि ते ताठ मानेने जगतात. “जगभरात भारताची प्रतिमा एक शक्तिशाली आणि आदरणीय राष्ट्र अशी बदलण्यात आपल्या शूर सैनिकांनी मोठे योगदान दिले आहे असे संरक्षण मंत्री म्हणाले. तुम्ही सर्व आपल्या एकतेचे आणि अखंडतेचे रक्षक आहात. तुम्ही राष्ट्राची संपत्ती आहात. आम्ही शांतपणे झोपू शकतो कारण तुम्ही सीमेवर जागे असता,” असे ते म्हणाले.
माजी सैनिकांना दिले जाणारे निवृत्तीवेतन, वैद्यकीय आणि इतर सुविधा हे त्यांचा त्याग आणि वचनबद्धतेप्रति देशाच्या आदराचे एक छोटे प्रतीक आहे असे मत व्यक्त करत राजनाथ सिंह यांनी त्यांच्या कल्याणासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. “आजचा प्रत्येक सैनिक हा उद्याचा आदरणीय माजी सैनिक आहे. त्यांचे कल्याण आणि आनंद सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
माजी सैनिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना, संरक्षण मंत्र्यांनी माजी सैनिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी संरक्षण निवृत्तीवेतन तक्रार निवारण पोर्टल सुरू केल्याचा उल्लेख केला. युद्धात जखमी अथवा शहीद झालेल्या सशस्त्र दलातील सैनिकांच्या कल्याण निधीमध्ये पोर्टलच्या माध्यमातून नागरिक योगदान देऊ शकतात, असे सांगून त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केलेल्या ‘मा भारती के सपूत’ संकेतस्थळाचा उल्लेख केला..माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी हे एक महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. भाषणाच्या अखेरीस त्यांनी समर्पण आणि शौर्याबद्दल सशस्त्र दलातील सर्व आजी आणि माजी सैनिकांचे आभार मानले.
या मेळाव्यादरम्यान जसवंत मैदानावर अनेक स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉल्सना भेट देऊन राजनाथ सिंह यांनी माजी सैनिक आणि वीर नारी यांच्याशी संवाद साधला. शहीद झालेल्या सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या शौर्याची आणि समर्पणाची प्रशंसा केली. शूर सैनिकांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना मदत करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यापूर्वी, शहीदांना पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आयोजित समारंभात, संरक्षण मंत्र्यांनी डेहराडून कॅन्टोन्मेंटमधील शौर्य स्थळ सशस्त्र दलांना समर्पित केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी नागरी आणि लष्करामधील मान्यवर तसेच माजी सैनिकांसह, उत्तराखंडमधील सशस्त्र दलाच्या शूर जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी पुष्पचक्र अर्पण केले. उत्तराखंडमधील 2,300 पेक्षा जास्त जवानांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. शौर्य स्थळाचे संपूर्ण व्यवस्थापन आणि देखभाल तसेच या ठिकाणी होणारे सर्व उपक्रम आणि समारंभांच्या आयोजनाची जबाबदारी भारतीय लष्कर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डकडे असेल.
संरक्षण मंत्र्यांनी ‘सोल ऑफ स्टील’ अल्पाइन चॅलेंज या उपक्रमाचा शुभारंभ देखील केला, जो सीमावर्ती भागातल्या पर्यटनाला चालना देईल. भारतीय लष्कर आणि क्लॉ (CLAW) ग्लोबल या माजी सैनिकांच्या संस्थेच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत विविध साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या स्वयंसेवकांसाठी त्यांनी एक संकेतस्थळ सुरु केले. भारतीय लष्कर आणि क्लॉ (CLAW) यांच्या संयुक्त मोहिमेचा भाग म्हणून ‘रोड टू द एंड’ या 460 किमी लांबीच्या कार रॅलीलाही राजनाथ सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला. येत्या तीन दिवसांत ही रॅली हिमालयातील गढवालमध्ये चमोली जिल्ह्यातील नीती गावाजवळ आपल्या गंतव्य स्थानी पोहोचेल.
चेन्नई इथल्या माजी सैनिक दिवस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी भूषविले. यावेळी उपस्थित अनेक माजी सैनिकांशी त्यांनी संवाद साधला.
नवी दिल्लीत झालेल्या या सोहळ्याला हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी. कुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, सचिव (माजी सैनिक कल्याण) विजय कुमार सिंह आणि अध्यक्षांच्या एकात्मिक संरक्षण कर्मचाऱ्यांचे प्रमुख, चीफ ऑफ स्टाफ कमिटी (CISC) एअर मार्शल बी. आर. कृष्णा, सशस्त्र दलातील वरिष्ठ अधिकारी, यांच्यासह माजी सैनिकांचे कुटुंबीय आणि विविध माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.
तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी, सशस्त्र दलाच्या माजी सैनिकांच्या संस्थां अंतर्गत विविध कल्याण विभागांनी केलेल्या महत्त्वाच्या कल्याणकारी उपाययोजनांची माहिती दिली. राष्ट्र उभारणीमध्ये माजी सैनिकांनी केलेल्या निःस्वार्थ सेवेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमात लष्कराच्या माजी सैनिक संचालनालया (DIAV) द्वारे प्रकाशित होणार्या सम्मान (SAMMAAN) या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन झाले. यामध्ये माजी सैनिकांसाठी उपयुक्त महत्वाच्या विषयांवर माहिती आणि लेख प्रकाशित केले जातात. भारतीय वायुदलाने देखील वायु संवेदना (VAYU SEMVEDNA) या नियतकालिकाचे प्रकाशन केले.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सकाळी, संरक्षण दल प्रमुख, तिन्ही सेना दलांचे प्रमुख, सीआयएससी आणि काही माजी सैनिकांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद झालेल्या वीरांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
झुंझुनू, जालंधर, चंदीगड, पनागढ, भुवनेश्वर आणि मुंबई या ठिकाणी देखील, तीन सेना मुख्यालयांद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये माजी सैनिकांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्र उभारणीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करणारे ‘आम्ही माजी सैनिकांसाठी (We for Veterans)’ हे गीतही कार्यक्रमादरम्यान वाजवण्यात आले.
सशस्त्र सेना माजी सैनिक दिन दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी 1953 मध्ये, भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा, ज्यांनी 1947 च्या युद्धात भारतीय सैन्याला विजय मिळवून दिला होता, ते औपचारिकपणे आपल्या सेवेतून निवृत्त झाले होते. हा दिवस देशाच्या माजी सैनिकांना समर्पित आहे. सेवानिवृत्त सैनिक, सेवेमधील सैनिक आणि देश यांच्यातील सौहार्दाचा पुनरुच्चार करण्यासाठी, तसेच देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि निःस्वार्थ सेवा करणाऱ्या वीरांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी 2017 पासून माजी सैनिक दिवस साजरा केला जातो.
***
S.Patil/S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891234)
Visitor Counter : 480