युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज आगरतळा येथे आयोजित युवा संवाद: इंडिया @ 2047 कार्यक्रमाला संबोधित केले
त्रिपुरातील आठही जिल्ह्यांमध्ये इनडोअर स्टेडियम बांधले जातील; सर्व स्टेडियममध्ये 15-20 क्रीडा प्रकारांची सुविधा असेल: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री
बुलेटपेक्षा बॅलेटची ताकद सदैव लक्षात ठेवण्याचे अनुराग ठाकूर यांचे युवकांना आवाहन
Posted On:
13 JAN 2023 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आज त्रिपुरातील आगरतळा येथे आयोजित "युवा संवाद, भारत @ 2047 कार्यक्रम" मध्ये सहभागी झाले . यावेळी त्यांनी उपस्थित युवकांशी थेट संवाद साधला. युवकांना संबोधित करताना ते म्हणाले, "जेव्हा राष्ट्र उभारणीचा विषय येतो, तेव्हा देशातील आणि जगातील प्रत्येकाचे लक्ष युवकांकडे जाते. तरुणाई म्हणजे वेग, तरुणाई म्हणजे स्वप्ने, तरुणाई म्हणजे नवी ऊर्जा, तरुणाई म्हणजे नवीन विचार, तरुणाई म्हणजे नवीन ध्येये, तरुणाई म्हणजे भविष्य, तरुणाई म्हणजे आशेचा किरण, तरुणाई म्हणजे सूर्य. सर्वांना प्रकाश देण्यासाठी सूर्य स्वतः आग ओकतो. आपले युवक देखील राष्ट्र उभारणीसाठी काम करत आहेत असे ते म्हणाले.
जी-20 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या युथ -20 बद्दल माहिती देताना क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री म्हणाले, "21 व्या शतकात भारताला विश्वगुरु बनवण्याचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न केवळ आपले युवकच पूर्ण करू शकतात. एक नरेंद्र दुसऱ्या नरेंद्रची (स्वामी विवेकानंद ) स्वप्ने पूर्ण करत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे आणि जी 20 चे अध्यक्षपद हे त्याचेच प्रतिबिंब आहे. जी 20 हे एक व्यासपीठ आहे , जिथून भारत आपला गौरवशाली इतिहास आणि आपली कला-संस्कृती आणि साहित्य मांडू शकतो.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, जी-20 अंतर्गत Y20 म्हणजेच युथ 20 गट देशभरात बैठका आयोजित करेल आणि त्याद्वारे सर्व विद्यापीठे, शाळा, नेहरू युवा केंद्र संघटना , एनएसएस, स्काउट्स आणि गाईड्स मध्ये Y20 चर्चा आयोजित केली जाईल. सप्टेंबरमध्ये जगातील सर्व नेते आपल्या युवकांचे विचार ऐकतील. आपले युवक देशाला आणि जगाला कसे पुढे नेतील याविषयी सप्टेंबरमध्ये आम्ही जगातील 20 सर्वोत्कृष्ट नेत्यांना एक दस्तावेज सादर करू, असे ते म्हणाले.
युवक हेच भविष्यातील भारताचे शिल्पकार आहेत असे वर्णन करत अनुराग ठाकूर म्हणाले, "भविष्यातील भारत कसा असेल हे आपल्या युवकांनी ठरवायचे आहे. हवामान बदलाचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांवर आणि प्रत्येकावर होतो. वितळणारे ग्लेशियर आणि हवामान बदल रोखण्यासाठी काय करावे लागेल हे सर्व आपल्या युवकांनी ठरवायचे आहे.”
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, “आपल्याला प्रत्येक क्षेत्रात भारताला पुढे न्यायचे आहे. 2014 पासून, गेल्या 8 वर्षांत, केंद्र सरकारने गेल्या 70 वर्षांच्या तुलनेत संपूर्ण भारतात मोठ्या संख्येने आयआयटी, आयआयएम , वैद्यकीय महाविद्यालये, एम्स उभारली आहेत. केंद्र सरकारने त्रिपुराला मोठा विमानतळ, राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठ, हॉकीसाठी सिंथेटिक मैदान दिले. आम्ही त्रिपुरातील आठही जिल्ह्यांमध्ये इनडोअर स्टेडियम बांधणार आहोत. सर्व स्टेडियममध्ये 15-20 क्रीडा प्रकार खेळण्याची सुविधा असेल. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक शहरातून जिम्नॅस्ट आणि खेळाडू घडवण्याची गरज आहे. "
स्वातंत्र्याच्या 100 वर्षांनंतरच्या भारताची कल्पना करताना ते पुढे म्हणाले, "मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि पुढील 25 वर्षांनंतर जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा आपण खर्या अर्थाने सुवर्णयुगात प्रवेश करायचा आहे.आपला योगाभ्यास , संगीत, सिनेमा, अध्यात्म ही आपली सुप्त शक्ती आहे आणि आपल्याला भारताची हीच सुप्त शक्ती पुढे न्यायची आहे. “आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत" असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
दहशतवादाच्या निपटाऱ्यासाठी केंद्र सरकारची धोरणे निर्णायक असल्याचे सांगून अनुराग ठाकूर म्हणाले, गेल्या आठ वर्षांत आम्ही दहशतवादाविरोधात निर्णायक धोरण अवलंबून ठोस कारवाई केली. फुटीरतावादाचाही पराभव झाला आहे. ईशान्येतील बंडखोरीमध्ये 89 % घट झाली आहे. आज बहुतांश भागातून सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम-AFSPA मागे घेण्यात आला आहे. विक्रमी संख्येने शांतता करार झाले आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्यात आले. एक भारत श्रेष्ठ भारताचे स्वप्न आता वास्तवात साकारत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी ठाकूर यांनी सर्व तरुणांना परिवर्तनाचे माध्यम बनण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "बुलेटपेक्षा बॅलेट (मतदान) अधिक शक्तिशाली आहे' हे सदैव लक्षात ठेवा. आपण सर्वांनी मिळून देश पुढे नेऊया. जीवनात नेहमी पुढे मार्गक्रमण करा. निराश होऊ नका. एक संघ (टीम) म्हणून एकत्र काम करूया.”
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891117)
Visitor Counter : 305