वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वॉशिंग्टन, डीसी येथे भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचांची (टीपीएफ) 13 वी मंत्रीस्तरीय बैठक
मजबूत द्विपक्षीय व्यापार संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि द्विपक्षीय आर्थिक संबंध वाढवण्यासाठी टीपीएफ रचणार पाया
Posted On:
12 JAN 2023 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 10-11 जानेवारी 2023 दरम्यान भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाच्या 13व्या मंत्रीस्तरीय बैठकीत भाग घेण्यासाठी वॉशिंग्टन डीसीला भेट दिली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी, युएसटीआरच्या राजदूत कॅथरीन ताय यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. मजबूत द्विपक्षीय व्यापार संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि द्विपक्षीय आर्थिक संबंध वाढवण्यामध्ये टीपीएफचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यामुळे दोन्ही देशांतील नोकरदारांना फायदा होणार आहे. बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.
13 व्या भारत – अमेरिका टीपीएफ 2023 चर्चेचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापार झपाट्याने वाढून 2021 मध्ये सुमारे $160 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याबद्दल मंत्र्यांनी कौतुक केले. अजूनही पूर्ण क्षमता वापरली गेली नसल्याचे लक्षात घेऊन द्विपक्षीय व्यापार वाढवणे आणि वैविध्य आणणे सुरू ठेवण्याच्या उद्दिष्टासह प्रतिबद्धता आणखी वाढवण्याची परस्पर इच्छा त्यांनी व्यक्त केली.
गेल्या टीपीएफ बैठकीपासून कार्यान्वित विविध कार्यगटांनी केलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. मंत्री तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्य चालू ठेवण्याचे निर्देशही दिले.
भारताच्या जी20 अध्यक्षपदाचे राजदूत ताय यांनी स्वागत केले. व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटात एकत्र काम करण्यास अमेरिका उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या वेगवान वाटाघाटींचे मंत्र्यांनी स्वागत केले आणि येत्या काही महिन्यांत समाधानकारक परिणाम साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमधील डब्लूटीओ विवादांवर तोडगा काढण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी पुन्हा सुरु केल्याबद्दल भारताने कौतुक केले आणि नवीन सुविधा तसेच प्राथमिकता नसलेल्या क्षेत्रातही तपासणी पुन्हा सुरु करण्यास सांगितले.
कासवांना जाळ्यातून सुटका करुन घेता येण्याजोग्या उपकरणाच्या, टर्टल एक्सक्लुडर डिव्हाईसच्या (टीईडी) प्रारुपाला अंतिम रूप दिल्याबद्दल मंत्र्यांनी स्वागत केले. टीईडी चाचण्यांना गती देण्यासाठीचे भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य समुद्र-कासवांच्या संख्येवर मासेमारीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि भारताच्या नैसर्गिक अधिवासातील कोळंबीच्या निर्यातीसाठी बाजारपेठेतील प्रवेश पुन्हा स्थापित करण्यासाठी टिईडी प्रभावी असल्याची खातरजमा करेल.
अमेरिकेच्या सामान्यीकृत प्राधान्य प्रणाली कार्यक्रमा अंतर्गत आपली लाभार्थी स्थिति प्राप्त व्हावी यासाठी इच्छुक असल्यावर भारताने भर दिला. अमेरीकी कांग्रेसद्वारे निर्धारित पात्रता मापदंडांच्या अनुषंगाने यास हमीयोग्य मानले जाऊ शकते असे अमेरिकेने म्हटले आहे.
व्यापार धोरण मंचांतर्गत सेवा कार्यगटाच्या रचनात्मक सहभागाची त्यांनी दखल घेतली. व्यावसायिक आणि कुशल कामगार, विद्यार्थी, गुंतवणूकदार आणि व्यावसायिक प्रवासी या देशांमधील स्थलांतर द्विपक्षीय आर्थिक आणि तांत्रिक भागीदारी वाढवण्यात मोठा हातभार लावतात असे नमूद केले.
सामाजिक सुरक्षा समग्रीकरण करारावर सुरु असलेल्या चर्चेची नोंद घेत, या प्रकरणी लवकर परिणाम साध्य करण्यासाठी काम तीव्र करण्यास त्यांनी समर्थन दिले.
त्यांनी नियामक संस्थांना ज्ञानाची देवाणघेवाण, क्षमता वाढवणे आणि व्यावसायिक सेवांमधील व्यापार आणखी वाढवण्यासाठी पात्रतेस मान्यता देणे यावर चर्चा करण्यास प्रोत्साहित केले. फिनटेक क्षेत्रात अधिक सहकार्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी आरोग्य विषयक आपत्कालीन स्थितीत सातत्याने काळजी घेण्यासाठी महत्वाचे ठरणारे घटक अर्थात डिजिटल आरोग्य, विशेषतः टेलिमेडिसिन सेवांबाबत चर्चा केली.
व्यापार सुलभीकरण, कामगारांचा फायदा, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणे तसेच सामायिक शाश्वततेची आव्हाने यासह व्यापार संबंधांची प्रतिरोधक्षमता आणि टिकाऊपणा वाढवणाऱ्या अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय संवाद वाढवण्यासाठी मंत्र्यांनी “प्रतिरोधक्षम व्यापार” यावर एक नवीन कार्य गट सुरू केला. शाश्वत वित्तसंस्थेला चालना, नाविन्यपूर्ण स्वच्छ तंत्रज्ञानाचा विस्तार, चक्राकार अर्थव्यवस्था दृष्टिकोन आणि शाश्वत जीवनशैली निवडींचा प्रचार यांचा यात समावेश आहे.
जागतिक पुरवठा साखळीतील लवचिकता बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्याकरता, विशेषत: दोन्ही अर्थव्यवस्थांना आधार देणार्या अतिशय महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आणि नवीन कार्यगटाच्या माध्यमातून आपल्या विश्वासू भागीदारांसोबत समन्वयाने आणि सहकार्याने या मुद्द्यांवर काम करण्यास उत्सुक असल्याचेही उभय मंत्र्यांनी सांगितले.
केन्द्रीय वाणिज्य मंत्र्यांनी आपल्या वॉशिंग्टन डी.सी. दौऱ्यात अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. याव्यतिरिक्त, अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन बोर्डाचे अध्यक्ष, कोर्टेवा आणि लॉकहीड मार्टिनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अनेक आघाडीच्या उद्योगातील व्यक्तींशी वैयक्तिक भेटून संवाद साधला. अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाद्वारे (USISPF) आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले. यात अमेरिकी उद्योगातील अनेक प्रमुख व्यक्तींचा सहभाग होता. अमेरिकेतील भारताच्या राजदूतांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही गोयल उपस्थित राहिले. यात अमेरीकी प्रशासनातील वरिष्ठ प्रतिनिधी आणि अमेरीकी उद्योगातील प्रमुख देखील सहभागी झाले होते.
महान लोकशाही म्हणून, भारत आणि अमेरिका हे दोन्ही नैसर्गिक भागीदार आहेत. ते परस्परांसाठी व्यापार पूरक आहेत, त्यांच्यात दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक संबंध आहेत तसेच थेट लोकांशी संपर्क आहे. दोन्ही देश क्वाड, आय2यु2 (भारत-इस्रायल/युएई-अमेरिका) आणि आयपीईएफ (भारत-प्रशांत महासागर क्षेत्रीय आर्थिक रचना) अंतर्गत देखील सहकार्य करत आहेत. नेतृत्व-स्तरावरील नियमित देवाणघेवाण हा विस्तारत असलेल्या द्विपक्षीय सहभागाचा अविभाज्य घटक आहे. या भेटींमधून निघणारे परिणाम दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. केन्द्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील विद्यमान प्रगाढ संबंध अधिक दृढ झाले.
S.Patil/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1890851)
Visitor Counter : 205