वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

14 वी जागतिक मसाले परिषद, येत्या 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणार


ही परिषद, भारतीय मसाले उद्योगांना जी20 सदस्य देशांबरोबर नवनवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उपयुक्त ठरेल

Posted On: 10 JAN 2023 5:27PM by PIB Mumbai

मुंबई, 10 जानेवारी 2023

 

भारत हा प्राचीन काळापासून मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो, आपल्या देशात अनेक दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचे उत्पादन केले जाते. मसाले व्यवसायाला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यातीची संधी मिळवून देण्यासाठी दरवर्षी, जागतिक मसाले परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा, 14 वी जागतिक मसाले परिषद-वर्ल्ड स्पाईस काँग्रेस (डब्ल्यूएससी) येत्या, 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान, महाराष्ट्रात, नवी मुंबईत आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, भारतीय मसाले बोर्डाचे सचिव डी. सत्येन यांनी दिली. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही परिषद विशेष महत्वाची आहे, कारण ती भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या परिषदेमुळे, जी-20 सदस्य देशात भारतीय मसाल्यांचा व्यावसायिक प्रसार करण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निमित्त होणाऱ्या विविध उपक्रमात,जी 20 देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांसह धोरणकर्ते, नियामक अधिकारी, मसाले व्यापार संघटना, आणि सरकारी अधिकारी सहभागी होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, यांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती सत्येन यांनी दिली. याच कार्यक्रमात मसाले उत्पादन क्षेत्रातील यशस्वी उयोजकांचा आणि मसाल्यांची सर्वाधिक निर्यात करणार्‍या संस्थांचा सन्मानचिन्ह आणि पुरस्कार देऊन गौरवही करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यंदाच्या परिषदेची संकल्पना, " व्हीजन-2030 : स्पाईसेस (सस्टेनेबिलिटी, प्रॉडक्टिव्हिटी, इन्नोव्हेशन, कोलॅबरेशन, एक्सेलन्स ॲन्ड सेफ्टी)" म्हणजेच मसाले व्यवसाय: शाश्वतता, उत्पादकता, नवोन्मेष, सहकारी, उत्कृष्टता आणि सुरक्षितता अशी आहे, असं ते म्हणाले.

यंदाच्या परिषदेसाठी, महाराष्ट्राची यजमान राज्य म्हणून निवड करण्यामागची भूमिका स्पष्ट करतांना ते म्हणाले, "महाराष्ट्र देशातील सर्वाधिक मसाले उत्पादक देशांपैकी एक आहे. विशेषतः राज्यात हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. वायगांव हळदीसह हळदीचे दोन उत्तम वाण, मिरची आणि इतर जीआय टॅग असलेल्या मसाल्यांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. त्याशिवाय कोकण किनारपट्टीच्या प्रदेशातही जीआय टॅग असलेल्या कोकमासह विविध मसाल्यांचे उत्पादन होते. देशातील मसाल्यांची निर्यात करणाऱ्या राज्यात, महाराष्ट्र आघाडीवर आहे".

कोविड महामारीच्या मंदीनंतर आयोजित होणारी ही परिषद, मसाले उद्योगांना विशेष उभारी देणारी ठरेल, असं त्यांनी सांगितलं. मसाल्यांच्या बाजारपेठेची सद्यस्थिती आणि असलेली आव्हाने, यातून मार्ग काढण्यासाठी ही परिषद एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात जी20 देशात मसाल्यांच्या व्यापाराच्या प्रसारासाठी विशेष व्यावसायिक सत्रेही आयोजित केली जाणार आहेत. कोविड काळात  अनेक मसाल्यांचे औषधी गुणधर्म आणि रोगप्रतिकारक शक्तीबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली आहे.  त्यामुळे, भारतीय मसाल्यांची विशेषत: हळद, आले, मिरे आणि बियाणे वर्गातील मसाल्यांची जसे जीरे, मेथी इत्यादींची मागणी वाढली आहे.  भारतीय मसाल्यांच्या बाजारपेठेत गेल्या सलग दोन वर्षांत 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल नोंदवली आहे. याच कालावधीत स्थानिक बाजारपेठे सुध्दा मसाल्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

डब्ल्यूएससी 2023 मुळे या क्षेत्रातील नवीन मार्ग शोधण्यासाठी मंच उपलब्ध होऊ शकेल, असे सांगत, मसाले उद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असं आवाहन सत्येन यांनी केलं.

डब्ल्यूएससी 2023 मध्ये खालील व्यावसायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • इंडिया- दि स्पाईस बाऊल ऑफ ग्लोबल मार्केट
  • परस्पेक्टिव्ह्ज ऑन ॲड्रेसिंग फूड सेफ्टी ॲन्ड क्वालिटी रिक्वायरमेंट्स फॉर स्पायसेस (नियामक अधिकार्‍यां सह चर्चासत्र/सादरीकरण )
  • स्ट्रेंग्थनिंग ग्लोबल स्पाईस ट्रेड- कंट्री प्रस्पेक्टिव्ह ॲन्ड ऑपॉर्च्युनिटीज
  • क्रॉप्स ॲन्ड मार्केट्स- फोरकास्ट ॲन्ड ट्रेन्ड्स
  • स्पाईस मार्केट आऊटलुक बाय इंटरनॅशनल स्पाईस ट्रेड असोसिएशन्स

या कार्यक्रमात खालील उपक्रमांचा सहभाग:

  • ॲवॉर्ड्स नाईट्स- सर्वोत्कृष्ट मसाला निर्यातदारांचा सन्मान
  • अनोखा भारतीय अनुभव- सांस्कृतिक आणि खाद्यपदार्थ
  • टेक टॉक सेशन्स आणि नवीन उत्पादनांची सुरुवात

डब्ल्यूएससीचे आयोजन स्पाईस बोर्डाकडून इंडियन स्पाईस ॲन्ड फूडस्टफ एक्स्पोर्टर्स असोसिएशन, मुंबई सारख्या भारतातील स्पाईस ट्रेड असोसिएशन्स, इंडियन पेपर ॲन्ड स्पाईस ट्रेड असोसिएशन, कोची, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, कोलकाता आणि फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डर्स, उंझा, गुजरात यांचा समावेश आहे.
डब्ल्यूएससी 2023 मध्ये केवळ नोंदणीकृत प्रतिनिधींनाच सहभागी होता येईल, ज्यांना नोंदणी करायची आहे ते www.worldspicecongress.com  या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करु शकतील.

 

* * *

PIB Mumbai | N.Joshi/S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1890041) Visitor Counter : 263


Read this release in: English , Urdu , Hindi