आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. मनसुख मांडविया यांनी भुवनेश्वर येथील एम्सच्या चौथ्या दीक्षांत समारंभात केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना केले संबोधित
"देशातील एम्सची संख्या 2014 मधील 8 वरून आता 23 झाली आहे"
Posted On:
07 JAN 2023 9:26PM by PIB Mumbai
“एम्स भुवनेश्वरने एका दशकात केवळ ओडिशातीलच नव्हे तर लगतच्या राज्यांमध्येही दर्जेदार आरोग्य सेवेच्या वितरणातील प्रादेशिक असमतोल कमी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करून लोकांचा विश्वास जिंकला आहे, असे उद्गार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी काढले. ते आज भुवनेश्वर येथे एम्सच्या चौथ्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
एम्सची ही कामगिरी माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या वचनबद्धतेचे प्रकटीकरण आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दर्जेदार आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे.” असे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार उपस्थित होते. खासदार अपराजिता सारंगीही यावेळी उपस्थित होत्या. या वेळी माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करून त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली . अटलबिहारी वाजपेयी यांनी 2003 मध्ये या संस्थेची पायाभरणी केली होती.
“शिक्षण असो, संशोधन किंवा आरोग्य सेवा , एम्स भुवनेश्वरने प्रत्येक क्षेत्रात नाव कमावले आहे”, अशा शब्दात डॉ. मांडविया यांनी संस्थेचा गौरव केला.
"देशातील एम्सची संख्या 2014 पूर्वी 8 वरून आता 23 झाली आहे". असे डॉ. मांडविया यांनी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना सांगितले. “आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य (PMJAY) योजनेअंतर्गत 50 कोटी कुटुंबांना आरोग्य सुरक्षा देण्यात आली आहे, तर देशभरातील 9000 हून अधिक जनऔषधी केंद्रांद्वारे स्वस्त आणि दर्जेदार औषधे दिली जात आहेत”, असेही त्यांनी सांगितले. ओडिशातील पात्र लाभार्थी केवळ राज्यातच नाही तर इतर राज्यांमध्येही या योजनेचा लाभ घेऊ शकतील यासाठी ओडिशा राज्य सरकारने आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य (PMJAY) योजना लागू करावी असे आवाहन त्यांनी केले.
डॉ मनसुख मांडविया यांनी धर्मेंद्र प्रधान आणि डॉ भारती प्रवीण पवार यांच्यासह बहुप्रतिक्षित असलेल्या अत्याधुनिक NTPC बर्न सेंटरचे उद्घाटन केले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या इमारतीचे भूमिपूजनही झाले. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IOYM) 2023 च्या निमित्ताने भरड धान्याच्या हँडबुकचेही मान्यवरांनी प्रकाशन केले.
धर्मेंद्र प्रधान यांनी एम्स भुवनेश्वरच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि भविष्यात अधिक जबाबदारी उचलण्यासाठी प्रेरित केले. संस्थेने केलेल्या जलद प्रगतीचे प्रधान यांनी कौतुक केले. दहा वर्षांत एम्स भुवनेश्वर राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन रचनेनुसार (NIRF)
देशातील दुसरी सर्वोत्कृष्ट एम्स आणि देशातील २६ वी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय संस्था म्हणून उदयास आली, ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी म्हटले.
“भारताने 140 देशांना मेड-इन-इंडिया लस पुरवल्या आहेत” असे प्रधान यांनी कोविड महामारीच्या व्यवस्थापनात भारताचे योगदान अधोरेखित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांची समज वाढवण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये वैद्यकीय पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना विद्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि माननीय पंतप्रधानांच्या “स्वच्छ भारत” अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन प्रधान यांनी केले.
एम्स भुवनेश्वरने मुत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये आपला ठसा उमटवला असून इतर शस्त्रक्रियांमध्येही संस्था वेगाने प्रगती करत आहे, असे डॉ भारती प्रवीण पवार यांनी नमूद केले. "आज देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थांचा विचार करताना एम्स भुवनेश्वर नेहमी लक्षात येते", असे त्या म्हणाल्या. आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे देशाची प्रगती जलद गतीने होते यावर त्यांनी भर दिला.
****
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889468)
Visitor Counter : 161