विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
10 व्या महिला विज्ञान काँग्रेसमध्ये स्टेम आणि जैवविविधता संवर्धनामध्ये महिलांचे योगदान अधोरेखित
Posted On:
07 JAN 2023 9:19AM by PIB Mumbai
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 5-6 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा एक भाग म्हणून आयोजित 10 व्या महिला विज्ञान काँग्रेसमध्ये स्टेम तसेच जैवविविधतेच्या संवर्धनासह जीवनाच्या सर्व क्षेत्रातले महिलांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. .
शेतकरी आणि शेती संवर्धक पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी जैवविविधता संवर्धनात महिलांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. तसेच शेतकर्यांना मूळ वाणांच्या पिकांकडे जाण्यासाठी राबवित असलेल्या मोहिमेबद्दलही विस्तृत माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून सेवा सदन संस्थेच्या प्रमुख कांचन गडकरी यांनी महिलांमधील आत्मनिर्भरता याबाबत आपले मत मांडले. यावेळी अनेक नामवंत महिला शास्त्रज्ञांनी त्यांचे संशोधन आणि व्यावसायिक अनुभवाबाबत आपले मत मांडले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या WISE-KIRAN विभागाच्या सल्लागार आणि प्रमुख डॉ. निशा मेंदिरट्टा यांनी स्टेम मध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांबाबत माहिती दिली. व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींची टक्केवारी 55 पेक्षा जास्त आहे, मात्र त्यानंतर, गळतीचे प्रमाण अधिक आहे, या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ. मेंदिरट्टा यांनी ही तफावत भरून काढण्यासाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून केले जात असलेले प्रयत्न अधोरेखित केले. गेल्या 8 वर्षांत विविध महिला-केंद्रित कार्यक्रमांतर्गत 35000 हून अधिक मुली आणि महिलांना याचा लाभ मिळाला आहे.
महिला सक्षमीकरणातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल तज्ञांनी चर्चा केली. यात अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संधी; शाश्वत विकास उद्दिष्टे; विज्ञान संप्रेषण, डिजिटलायझेशनची भूमिका इ. चा समावेश होता.
यावेळी एक पॅनल चर्चा देखील आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वैज्ञानिक इंदू बाळा पुरी यांनी ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रणित विकासाच्या महत्वाकडे लक्ष वेधले. बनस्थली विदयापीठाच्या डॉ. सुफिया खान म्हणाल्या की, नाविन्यपूर्ण संशोधनामुळे उत्पादनाचा दर्जा उंचावू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान माहिती आणि मूल्यमापन परिषदेच्या डॉ. संगीता नगर यांनी बौद्धिक संपदा हक्क क्षेत्रात महिलांसाठी असलेल्या संधींची माहिती दिली.
जेएनव्ही नागपूरच्या प्राचार्य डॉ. जरीना कुरेशी यांनी स्टेम क्षेत्रात करिअर करण्यासाठी शालेय मुलींसाठी विज्ञान ज्योती कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. डब्ल्यूओएस-बी कार्यक्रमाच्या लाभार्थी डॉ. सोनल धाबेकर यांनी दीर्ध कालखंडानंतर त्यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीला आकार देण्यात या कार्यक्रमाची कशी मदत झाली, याबद्दल माहिती दिली.
आयएससीएच्या सरचिटणीस डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. डब्ल्यूएससीच्या संयोजक डॉ. कल्पना पांडे यांनी प्राचीन काळापासून महिलांमध्ये असलेल्या वैज्ञानिक आवडी विषयी सांगितले. 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सुमारे 5000 जणांची उपस्थिती होती.
***
HansrajR/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889330)
Visitor Counter : 258