आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. मनसुख मांडवीय यांचा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 150 प्रतिनिधींशी संवाद, डॉ. भारती प्रवीण पवारही उपस्थित
वैद्यकीय शिक्षणातील सुधारणांविषयीच्या केंद्र सरकारच्या आकांक्षा आणि दूरदृष्टी तेव्हाच साध्य होऊ शकतील, जेव्हा, वैद्यकीय महाविद्यालये त्यात सक्रिय सहभाग घेतील- डॉ. मांडवीय
गुणवत्ता आणि विश्वासार्हता यांचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षणाच्या ‘इंडिया ब्रॅंड’ साठी दमदारपणे पुढे जायला हवे- डॉ. भारती प्रवीण पवार
Posted On:
05 JAN 2023 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज, नवी दिल्लीत विज्ञान भवन परिसरात खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे 150 प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार देखील उपस्थित होत्या.
“केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण सुधारणांविषयीच्या आकांक्षा आणि दूरदृष्टी तेव्हाच पूर्ण होऊ शकेल, जेव्हा वैद्यकीय महाविद्यालये त्यात सक्रिय सहभाग घेतील. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सल्लामसलत आणि संवाद अतिशय आवश्यक आहे.”असे मनसुख मांडवीय यावेळी म्हणाले. आपण अशी व्यवस्था आणि परिसंस्था निर्माण करण्याची गरज आहे जिथे एनएमसी आणि वैद्यकीय महाविद्यालये दोघे मिळून उच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाचे ध्येय निश्चित करतील, असेही ते पुढे म्हणाले.
केंद्र सरकार देशात उत्तम आणि दर्जेदार वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असा संदेश त्यांनी या कार्यक्रमात दिला.
भारतीय डॉक्टरांविषयी परदेशात असलेल्या चांगल्या प्रतिमेमुळे, भारतीय वैद्यकीय शिक्षणाची ओळख अधिक ठसठशीत झाली आहे, असे डॉ भारती पवार यावेळी म्हणाल्या. “ भारताच्या विकासाची यशोगाथा, भारताविषयी विविध क्षेत्रात लोकांच्या अपेक्षा अधिकच वाढवणारी ठरली आहे. आणि त्यात, आरोग्यक्षेत्र हा एक महत्वाचा घटक आहे.” असे त्या पुढे म्हणाल्या. आपले पंतप्रधान नेहमीच असे सांगत असतात, की ‘सबका प्रयास’ या मार्गाने आपण अधिक उत्तम प्रगती करू शकतो. त्यामुळे, देशातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची भूमिका, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी महत्वाची ठरेल. आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण दर्जा आणि विश्वासार्हता यांचे मूर्तिमंत स्वरूप असून आपण हा ‘इंडिया ब्रॅंड’ घेऊन दमदारपणे पुढे जायला हवे”, असे भारती पवार पुढे म्हणाल्या.
डॉ मांडवीय यांनी, अकादमी आणि संशोधकांना संशोधन आणि नवोन्मषात खाजगी क्षेत्रासोबत सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले. भारतातील आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी उपस्थित प्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांचे त्यांनी स्वागत केले.
सुमारे दोन तास चाललेल्या या 'संवादा' दरम्यान, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनी नीट पदव्युत्तर परीक्षा, एनईएक्सटीटी, प्रवेश, प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय, जर्नल प्रकाशन, ग्रामीण भागात सेवेसाठीचे करार इत्यादींशी संबंधित समस्या मांडल्या आणि सूचना केल्या.
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889017)
Visitor Counter : 223