विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये आदिवासींकडे असणारे परंपरागत ज्ञान आणि त्यांच्या प्रश्नांवर विशेष भर
प्रविष्टि तिथि:
04 JAN 2023 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023
डिंक वृक्ष, तेलबिया, फुले, औषधी वनस्पती यासारख्या बिगर-लाकूड वनोपज आणि महुआ, जांभूळ, आंबा, चिंच आणि आवळा यासारखे खाद्यपदार्थ आदिवासी कुटुंबांच्या उत्पन्नात सर्वाधिक भर घालत असल्याचे आढळून आले आहे.
या साधनसंपत्तीच्या उपलब्धतेमुळे महाराष्ट्रातील माओवादग्रस्त मागास गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठा आधार मिळाला आहे. कुपोषण, माता आणि बालमृत्यू आणि गरीबीसारख्या आदिवासी भागातील समस्यांवर मात करण्यासाठी, या महिलांना त्यांच्या जीवनातील निर्णय आणि कौटुंबिक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम करणे हीच गुरुकिल्ली असल्याचे गडचिरोली इथल्या शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हेमलता जे. वानखेडे चौधरी यांनी सांगितले. ‘गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या संदर्भात आदिवासी लोकसंख्येचे उत्थान’ या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या.
108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेस दरम्यान आदिवासी विज्ञान काँग्रेसमध्ये त्या बोलत होत्या. मलेरिया आणि हत्तीरोग यासारखे आजार भारताच्या शहरी भागातून जवळजवळ हद्दपार झाले आहेत, मात्र अजूनही जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या आरोग्याला या रोगाचा प्रमुख धोका आहे. दोन्ही जगांमध्ये असलेल्या मोठ्या फरकाचे हे केवळ एक उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी आदिवासींमधील शिक्षणाची गरज, आदिवासी महिलांचे सक्षमीकरण यावर भर दिला.
आयएससीए च्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते या आदिवासी मेळाव्याचे उद्घाटन झाले. आपल्या भाषणात डॉ. सक्सेना म्हणाल्या की, ‘सेवा जोहर’ म्हणजे निसर्ग मातेची सेवा, हे आदिवासी जीवनाचे सार आहे. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच आदिवासी संमेलन आयोजित केल्याबद्दल त्यांनी आरटीएम नागपूर विद्यापीठाचे अभिनंदन केले. आदिवासी हे जैवविविधतेचे सर्वोत्तम संवर्धन करणारे आहेत. जंगलाची काळजी आदिवासींशिवाय आणखी कोणीही घेऊ शकत नाही, आणि शाश्वततेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आदिवासींच्या पारंपरिक ज्ञान, चातुर्याचा आधुनिक ज्ञानाबरोबर मिलाफ व्हायला हवा असे त्या म्हणाल्या.
नागालँड विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. परदेशी लाल, आदिवासी संमेलनाच्या पहिल्या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था हा पर्यावरणाचे रक्षण आणि आदिवासींचा विकास याचा समतोल साधण्यासाठीचा उपाय असल्याचे ते म्हणाले. नागालँडमधील आदिवासींचे उत्थान आणि महिला सक्षमीकरणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाने बजावलेली भूमिका त्यांनी विशद केली.
सीएसआयआर-सीएफटीआरआय चे मुख्य वैज्ञानिक प्राध्यापक प्रकाश हलामी यांनी आदिवासी खाद्यपदार्थांचे उल्लेखनीय फायदे उलगडून सांगितले. प्रा.विनोद बाळा तक्षक, डॉ.आरती प्रसाद आणि प्रा.गीतांजली दास यांनीही तांत्रिक विषयांवर व्याख्याने दिली.
आदिवासी युवा वर्गासाठी स्टार्ट-अप आणि करिअर मार्गदर्शन आणि यशोगाथा
आदिवासी मेळाव्याचा एक भाग म्हणून, आदिवासी युवांसाठी स्टार्टअप आणि करिअर मार्गदर्शन या विषयावर एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयएएस रवींद्र ठाकरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, रोजगार नोकरी संदर्भचे संजय नाथे आणि काही करियर तज्ञांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात, आदिवासी उत्थान आणि आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांमधील सामाजिक नेत्यांनी आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठीच्या त्यांच्या कल्पना आणि दृष्टीकोन सादर करण्यासाठी परिसंवादाला संबोधित केले.
तत्पूर्वी उद्घाटन समारंभात आरटीएमएनयूचे कुलगुरू डॉ.संजय दुधे म्हणाले की, शाश्वत विकास हे मानवतेचे भविष्य आहे. “आदिवासी जीवनपद्धती नेहमीच शाश्वत राहिली आहे आणि त्याशिवाय, आदिवासींनी आतापर्यंत त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे जतन केले आहे. आपले जे मूळ आहे, त्याचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे,” मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना ते म्हणाले. आदिवासी हे दायित्व नसून, संपत्ती आहे; असा विचार मांडून, संयोजक डॉ. शामराव कोरेटी यांनी परिसंवादाचा कल कसा असणार आहे, हे स्पष्ट केले.
नागपूर शहराचे संस्थापक गोंड राजा बख्त बुलंद शाह यांचे 14 वे वंशज आदित्य शाह यांनी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद भूषविले. आयएससीए च्या सदस्य- व्यवहार विभागाचे सरचिटणीस डॉ. एस. रामकृष्ण, आरटीएमएनयुचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, यावेळी उपस्थित होते. प्रा. हिना नागभिरे आणि डॉ. संतोष गिर्हे यांनी मेळाव्याचे संचालन केले, कार्यक्रमाचा प्रारंभ माया कोरेटी यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागत गीताने झाली.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1888848)
आगंतुक पटल : 301