नागरी उड्डाण मंत्रालय

माजी संरक्षणमंत्री तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषविणारे मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली म्हणून गोव्यातील मोपा येथे उभारण्यात आलेल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ- मोपा गोवा’ असे नामकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची कार्योत्तर मंजुरी

Posted On: 04 JAN 2023 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

माजी संरक्षणमंत्री तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद चार वेळा भूषविणारे मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली म्हणून गोव्यातील मोपा येथे उभारण्यात आलेल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ – मोपा, गोवा’ असे नामकरण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

गोवा राज्यातील लोकांच्या मनात अनेक दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोपा येथे असलेल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ – मोपा, गोवा’ असे नामकरण करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने एकमताने घेतलेला निर्णय केंद्र सरकारला कळवला होता.

गोव्यातील मोपा येथे उभारण्यात आलेल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आले. या विमानतळाला आता, आधुनिक गोव्याची उभारणी करण्यात पर्रिकर यांनी त्यांच्या हयातीत दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ.मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888638) Visitor Counter : 120