संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालय- वर्ष अखेरीचा आढावा 2022

Posted On: 17 DEC 2022 10:51AM by PIB Mumbai

संरक्षण मंत्रालयासाठी 2022 हे वर्ष पथदर्शी सुधारणांचे वर्ष राहिले. सशस्त्र दलांकडे स्वयंपूर्ण स्वदेशी उद्योगांनी उत्पादन केलेली वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रे/ साधने/तंत्रज्ञान सोपविण्यात आली असतानाच‌ भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सैन्य उभारण्यासाठी व्यापक सुधारणा करण्यात आल्या. जागतिक शांतता आणि समृद्धीचे सामायिक स्वप्न साकार करण्याच्या हेतूने 'मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड' संकल्पनेनुसार संरक्षण सामुग्रीची निर्यात वाढविण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून अनेक देशांनी भारतीय मंचावर स्वारस्य दाखवल्याने विक्रमी संरक्षण निर्यात घडून आली. सीमा प्रदेश विकास, नारी शक्ती, राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) विस्तार आणि युवावर्गात देशभक्ती रुजविण्यासाठी नवीन सैनिकी शाळांची स्थापना या बाबी जोमाने पुढे गेल्या.  

 ठळक वैशिष्ट्ये :

अग्निपथ

  • सशस्त्र दलांमध्ये‌ तरुणांची भरती करणारी, देशभक्त युवकांना ( अग्निवीर ) पवित्र गणवेश परिधान करून चार वर्षांच्या कालावधीसाठी देशसेवा करण्याची संधी देणारी अग्निपथ योजना जून महिन्यात जाहीर झाली. 

  • सशस्त्र दलांना युवा रूप देण्यासाठी तसेच सैन्याला अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही बनविण्याच्या हेतूने परिवर्तनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी या योजनेची आखणी केली आहे

 

  • या भरतीमध्ये तीन दलांमधील संबंधित जोखीम आणि मेहनत भत्त्यासह आकर्षक मासिक पॅकेज आणि एकदा 'सेवा निधी ' पॅकेज या अग्निवीरांना त्यांचा प्रतिबद्धता कालावधी संपल्यानंतर दिला जाईल. 

आय एन एस विक्रांत - आत्मनिर्भर भारतासाठी अविस्मरणीय दिवस 

  • आय एन एस विक्रांत या भारताच्या स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे सप्टेंबर महिन्यात कोचीन शिपयार्ड येथे पंतप्रधानांच्या हस्ते जलावतरण झाले. 

  • स्वदेशी बनावटीच्या 76% सामग्रीसह, 262.5 मीटर लांब आणि 61.6 मीटर रुंदीच्या या युद्धनौकेवर अनेक अत्याधुनिक उपकरणे/यंत्रणा तसेच सुमारे 1,600 अधिकारी आणि खलाशी असा चालकवर्ग आहे. 

  • या जहाजाच्या बांधणीत अतिशय उच्च दर्जाची स्वयंचलित यंत्रसामग्री, जहाज संचारण आणि जीवनक्षमतेचा समावेश आहे. 

अन्य प्रमुख 'मेड इन इंडिया ' समावेश/आरंभ

: एलसीएच ' प्रचंड ' : हिंदुस्थान एअरोनॉटीक्सने एच ए एल आरेखित आणि विकसित केलेले 'प्रचंड ' हे हलके लढाऊ हेलिकॉप्टर ऑक्टोबर 2022 मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत जोधपूर येथे भारतीय हवाई दलात दाखल झाले. हे स्वदेशी बनावटीचे पहिले बहुभूमिका लढाऊ हेलिकॉप्टर असून यामध्ये भेदक भूमी हल्ला आणि हवाई लढाऊ क्षमता आहे.  

  • भारतीय नौदल हवाई स्क्वाड्रन :  स्वदेशी बांधणीच्या अत्याधुनिक हलक्या हेलिकॉप्टर (एएल एच ) एम के -III चा वापर करणाऱ्या भारतीय नौदल हवाई स्क्वाड्रन ( आय एन ए एस ) 325 चा मे 2022 मध्ये आय एन एस उत्कर्ष, पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार कमांड येथे झालेल्या समारंभात भारतीय नौदलात समावेश झाला. भारतीय नौदल सामील होणारे  एएल एच एम के III प्रकारचे हे दुसरे स्क्वाड्रन आहे. अत्याधुनिक बहुभूमिका हेलिकॉप्टर एच ए एल ने विकसित आणि निर्माण  केले आहे.  

  • आयसीजी- किनारपट्टीवरील गस्ती नौका:  भारतीय तटरक्षक दलात सक्षम ही स्वदेशी बांधणीची किनारपट्टीवरील गस्ती नौका फेब्रुवारी महिन्यात दाखल झाली. या नौकेचे आरेखन आणि बांधणी गोवा शिपयार्ड लिमिटेडने केले असून हिच्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त संचारण आणि दूरसंचार उपकरणे, सेन्सर्स आणि यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे.  

 

सी-295 वाहतूक विमान निर्माण सुविधा :

  • पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात गुजरातेतील बडोदा येथे सी-295 या देशातील खासगी क्षेत्रातील पहिल्या वाहतूक विमान निर्माण सुविधेचा पायाभरणी समारंभ झाला. येथे भारतीय हवाई दलासाठी सी-295 विमानांचे उत्पादन टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आणि एअरबस डिफेन्स आणि स्पेस एस ए, स्पेन यांच्या सहकार्याने होणार आहे.  

  • खासगी कंपनीकडून सैनिकी विमानाचे उत्पादन होणारा हा अशा प्रकारचा पहिलाच भारतीय प्रकल्प आहे. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 21,935 कोटी रुपये हे विमान नागरी सेवांसाठीही वापरता येऊ शकेल. 

  • या सुविधेमध्ये 40 विमानांचे  उत्पादन होणार असून ‌संरक्षण मंत्रालय आणि मेसर्स एअरबस डिफेन्स व स्पेस एस ए यांच्यात झालेल्या करारानुसार 16 विमाने उड्डाणयोग्य स्थितीमध्ये सुपूर्द करण्यात येतील ‌.

 

स्वावलंबनाचा सतत ध्यास - अन्य प्रमुख घोषणा 

 

  • सकारात्मक स्वदेशीकरण सूची संरक्षण मंत्रालयाने चार सूची - प्रत्येकी 101 वस्तूंच्या दोन आणि संरक्षण पी एस युजसाठी अनुक्रमे 780 आणि 107 वस्तूंच्या अन्य दोन  सूची जारी केल्या आहेत. 

  • केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23

2022-23 च्या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी भांडवली खर्चापोटी एकूण निधी 1.52 लाख कोटी रुपयांवर नेण्यात आला. भांडवली खरेदी कोट्यापैकी 68% रक्कम देशांतर्गत उद्योगांना आत्मनिर्भर बनण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आयात अवलंब कमी करण्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे.  

 

 संरक्षण निर्यात: सरकारच्या सतत प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये संरक्षण निर्यातीत 334% वाढ झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात तिने 13,000कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला. भारत आता सुमारे 75 देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करतो. 

 

  संरक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता: नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या ' संरक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता ' या परिसंवाद आणि प्रदर्शनात संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नव्याने विकसित केलेली 75 कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादनांचा /तंत्रज्ञानांचा  संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते आरंभ झाला. 

 

 डेफ एक्स्पो 2022:

  • डेफ एक्स्पो 2022 - बाराव्या आणि आजवरच्या सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनाने भारताच्या संरक्षण क्षेत्राची 'अभिमानाचा मार्ग 'या संकल्पनेनुसार, जागतिक स्तरावरील गुंतवणुकीसाठी उमलते क्षेत्र अशी ओळख करून दिली. 

  • विशेषत: भारतीय कंपन्यांसाठी आयोजित केलेल्या या पाच दिवसीय कार्यक्रमात  1,340 हून अधिक प्रदर्शक, उद्योग, गुंतवणूकदार, स्टार्ट अप्स, एम एस एम ई, सशस्त्र दले आणि अनेक देशांची शिष्टमंडळे चार वेगवेगळ्या कार्यक्रम स्थानी अभूतपूर्वरीत्या  सहभागी झाली होती.  

  • 451 सामंजस्य करार, तंत्रज्ञान हस्तांतरण करार, उत्पादन उद्घाटने, आणि देशांतर्गत उद्योगांसाठी सुमारे 1.5 लाख कोटी रुपये किंमतीची मागणी यामुळे  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवण्याकडे वाटचाल तसेच सशस्त्र दलांच्या गरजा, संशोधन व विकास आणि सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांकडून संरक्षण उत्पादन यातील सुसूत्रीकरण या दिशेने होत असलेली भारताची प्रगती प्रतिबिंबित झाली.

 प्रमुख यशस्वी क्षेपणास्त्र चाचण्या:

  • ब्राह्मोस विस्तारित पल्ला आवृत्ती: मे महिन्यात भारताने विस्तारित पल्ला आवृत्तीचे ब्राह्मोस एअर लाॅंच क्षेपणास्त्र एस यु- 30 एम के आय या लढाऊ विमानावरून यशस्वीरीत्या डागले.   क्षेपणास्त्राचे उड्डाण नियोजन केल्यानुसार झाले आणि त्याने बंगालच्या उपसागरातील विशिष्ट लक्ष्याचा थेट वेध घेतला.  

  • नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्र Naval Anti-Ship Missile: डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने हे महिन्यात ओडिशा किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी पल्ला येथील हेलिकॉप्टरमधून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली. 

  • ऑटोनॉमस फ्लाईंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर : डीआरडीओने जुलै महिन्यात कर्नाटकाच्या चित्रदुर्ग येथील एअरोनॉटिकल टेस्ट रेंजवर ऑटोनॉमस फ्लाईंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. 

 

आय ए एफ शस्त्र प्रणाली शाखा:

  • सरकारने भारतीय हवाई दलासाठी 'शस्त्र प्रणाली शाखा' या नवीन शाखेच्या निर्मितीसाठी मंजुरी देऊन एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. यामुळे सर्व शस्त्रप्रणाली ऑपरेटर्सचे  एकत्रीकरण होऊन भूमीवरील तसेच खास करून हवाई माऱ्यासाठी असणाऱ्या सर्व शस्त्रप्रणालींच्या कामगिरीला वाहून घेतलेल्या एकाच घटकाची निर्मिती होईल.   

 

आंतरराष्ट्रीय सहकार्य:

  • आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस : संरक्षण मंत्र्यांनी नोव्हेंबरमध्ये कंबोडियातील सिएम लीप येथील भेटीदरम्यान आसियान संरक्षण मंत्र्यांच्या मीटिंग प्लस ( एडीएम एम प्लस) या बैठकीत सहभाग नोंदवला आणि पहिल्या इंडिया -आसियान संरक्षणमंत्री बैठकीचे सह अध्यक्षपद भूषविले. या एडीएम एम मध्ये राजनाथ सिंह यांनी राष्ट्राराष्ट्रांमधील आणि सीमेपलीकडील दहशतवाद रोखण्यासाठी जागतिक प्रयत्नांच्या  संकल्पाची आवश्यकता प्रतिपादन केली. इंडो-पॅसिफिक प्रदेश मुक्त, खुला आणि सर्वसमावेशक होण्याबाबतची भारताची भूमिका त्यांनी मांडली आणि सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मता यांचा आदर राखून संघर्षाच्या मुद्द्यांचे शांततापूर्ण निराकरण करण्याची गरज अधोरेखित केली.  

 

  • भारत - अमेरिका 2+2 संवाद: संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर एप्रिल महिन्यात वाॅशिंग्टन डीसी इथल्या चौथ्या भारत-अमेरिका 2+2 मंत्री स्तरीय संवादात सहभागी झाले होते. या संवादात कार्यक्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्यात आला तसेच संबंध अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. अमेरिकन कंपन्यांसोबत सहविकास आणि सह उत्पादन करण्यासाठी सहकार्य करण्याबाबतची भारताची आकांक्षा संरक्षणमंत्र्यांनी विशद केली.  

 

  • भारत-जपान‌ 2+2 मंत्रीस्तरीय संवाद : सप्टेंबर महिन्यात टोकियो येथील दुसऱ्या भारत-जपान 2+2 मंत्रीस्तरीय संवादात संरक्षणमंत्री परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांसोबत सहभागी झाले होते. सार्वभौमत्व आणि देशांची प्रादेशिक एकात्मता यावर आधारित मुक्त, खुल्या, नियमाधारित आणि सर्वसमावेशक इंडो पॅसिफिकसाठी भारत आणि जपान यांच्यातील सक्षम नातेसंबंध महत्त्वपूर्ण आहे, यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले.  

 

  • भारत-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद: राजनाथ सिंह यांनी नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे फ्रेंच प्रजासत्ताकाचे सशस्त्र दले मंत्री सेबॅस्टियन लेकाॅर्नू यांच्यासोबत चौथा भारत-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद साधला. नौवहन सहकार्य दृढ करण्यासाठी तसेच द्विपक्षीय सरावाची शक्यता आणि काठिण्य वाढविण्यासाठी कोणते उपाय करता येतील, यावर त्यांनी चर्चा केली. 

 

संरक्षण मंत्रालयाचे विविध विभाग तसेच सशस्त्र दले यांच्या अन्य कामगिरीचे तपशील पुढीलप्रमाणे:

 

भारतीय लष्कर 

  • भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि नियंत्रण रेषेवर स्थैर्य आणि दबदबा कायम ठेवण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेनुसार आपली युद्धसज्जता ठेवण्यावर विशेषत्वाने भर दिला, घुसखोरीविरोधात / दहशतवादाविरोधात सतत कारवाई केली आणि राष्ट्रीय सुरक्षेला वर्तमान आणि भविष्यातील धोक्यांचा सतत वेध आणि आढावा घेत असताना प्रशिक्षणाचा उच्च दर्जा कायम राखला.  देशाच्या शत्रूकडून काही आक्रमक कृती किंवा सैनिकी कृत्य झाल्यास त्यापासून उत्पन्न होणाऱ्या एकत्रित धोक्याचा सामना करण्यासाठी, कोणत्याही आकस्मिक प्रसंगी भारतीय लष्कर सज्ज आहे. भौतिक सीमा धूसर करणाऱ्या सायबर, अवकाश आणि माहितीच्या कार्यक्षेत्रातील‌ नवनवीन धोक्यांचा वेध घेण्यासाठी क्षमता बांधणी करत आहे. इनफ्युजन तंत्रज्ञान, फोर्स मल्टिप्लायर्सचा समावेश, आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा यातून क्षमता वाढविण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम चांगली प्रगती करत आहे. 

 

  • भारतीय लष्कर स्वावलंबी संरक्षण वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने 'मेक इन इंडिया ' मोहिमेअंतर्गत खासगी उद्योग, एम एस एम ई, विद्यापीठे आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळा यांच्यासोबत संयुक्तपणे मार्गक्रमण करीत आहे. नवनवीन उपकरणांच्या तंत्रज्ञानात  झपाट्याने होणारा  बदल पाहता, हा मेक इन इंडियाला यश मिळवून देणारा महत्त्वाचा घटक ठरू शकतो.  आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 338 उद्योगांचा समावेश असणारे 1.12 लाख कोटी रुपयांचे 202 प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांच्या सुसूत्रीकरणासाठी पुणे आणि बंगळुरू येथे प्रादेशिक तंत्रज्ञानविषयक केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पूर्णत्वाकडे जाणाऱ्या अनेक कंत्राटांमुळे देशांतर्गत विक्रेत्यांचा लाभ झाला आहे. 

 

  • गेल्या काही वर्षांमधील भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा लक्षात घेऊन भारतीय लष्कराने संरक्षण सहकार्य कार्यक्रमाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. वाढत्या संख्येने अनेक मित्र देश भारतीय लष्करासोबत काम करण्यास उत्सुकता दर्शवित आहेत. आतापर्यंत आपण 110 देशांबरोबर संयुक्त सराव, प्रशिक्षण, दौरे, नियोजित प्रतिबद्धता, व्यावसायिक स्पर्धा आणि वैद्यकीय सहाय्य यासारखे संरक्षण सहकार्य कार्यक्रम राबवीत आहोत.   

  • नागरी प्रशासनाने विनंती केल्यानुसार, भारतीय लष्कराने यावर्षी 58 काॅलम्स ( 15 अभियांत्रिकी कार्य गटांसह ) देशातील 11 राज्यांमध्ये मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणासाठी उपलब्ध करून दिले. या कामगिरीत सुमारे 31,000 नागरिकांची सुटका करण्यात आली.

 

भारतीय नौदल 

 

कामगिरीसाठी उपस्थिती

मिशन आधारित उपस्थिती : राष्ट्रीय सागरी स्वारस्याचे रक्षण करण्यासाठी तसेच हिंदी महासागर प्रदेशातील‌ नौवहनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रात सतत/ बहुतांश वेळ उपस्थित राहण्यासाठी भारतीय नौदलाने मिशन आधारित उपस्थिती दर्शविली. ही उपस्थिती सागर म्हणजेच प्रदेशात सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास या माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार होती. भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने ओमानचे आखात/ पर्शियन आखात, एडनचे आखात/ लाल समुद्र, दक्षिण व मध्य हिंदी महासागर प्रदेश, सुंदा सामुद्रधुनी, अंदमानचा समुद्र, मलाक्का सामुद्रधुनीचा मार्ग आणि उत्तर बंगालचा उपसागर येथे तैनात करण्यात आली होती. या तैनातीमुळे  कार्यक्षेत्रातील सागरी जागरूकता, सुरळीत मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सहाय्य,भारतीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची नौवहन सुरक्षा आणि मैत्रीपूर्ण नौदलांबरोबर क्षमता विकास आणि क्षमता बांधणी सारख्या कार्यक्रमांद्वारे सामूहिक कामगिरी शक्य होऊ शकली.  तसेच यामुळे भारतीय नौदलाला प्रथम प्रतिसाद देता आला आणि हिंदी महासागर क्षेत्रातील प्रधान सुरक्षा सहकारी बनता आले.  

 मिशन सागर: मित्र देशांच्या आणि सागरी शेजाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन भारतीय नौदलाने सागर मिशन अंतर्गत मानवतावादी आणि आपत्ती निवारण सामग्री आणि वैद्यकीय उपकरणे नौदलाच्या जहाजांमधून हिंदी महासागर क्षेत्रातील पाच देशांना पोहोचविली.   

 पश्चिम लहर सराव (एक्स पी एल) – 22: XPL एक्स पी एल – 22 हा कमांड पातळीवरील‌ रंगमंच सराव पश्चिम सीबोर्ड येथे 12-29 जानेवारी 2022 दरम्यान झाला. रंगमंच स्वरूपाचा हा मोठा सराव विविध प्रकारच्या संघर्ष परिस्थितीत नौदलाच्या कामगिरी संकल्पनांची चाचणी घेण्यासाठी आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी, युद्ध सज्जतेची चाचपणी करण्यासाठी तसेच पश्चिम सीबोर्ड येथे सागरी सुरक्षेतील भूमिका बळकट करण्यासाठी आणि युद्धसज्ज, विश्वासू, एकजीव दल ही प्रतिमा सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला. 

 

परदेशी नौदलांसोबत सराव

  • मिलन– 22: मिलन हा द्वैवार्षिक बहुउद्देशीय सराव  विशाखापट्टणम इथे/जवळ 24फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आला. 39 देशांच्या प्रतिनिधीमंडळांनी 13 परदेशी जहाजांसह 23 नौदल जहाजे आणि अमेरिकेच्या पी 8अ सह सात विमाने यांनी यात सहभाग नोंदवला.

  • सराव वरुण 2022: परदेशी नौदलांबरोबरचा भारतीय नौदलाच्या हा द्विपक्षीय सराव दोन टप्प्यांमध्ये ( पहिला टप्पा 30 मार्च ते 3 एप्रिल ,2022  आणि दुसरा टप्पा 12 ते 14 मे, 2022 ) गोव्याजवळ पार पडला. भारतीय नौदलाचे चेन्नई हे जहाज पी 8 आय, मिग 29 के, आओडार्नियर विमाने तसेच मिस्त्राल, कॉर्बेट, लुईरे आणि पाणबुडी अमेथिस्ट यांच्यासह या सरावात सहभागी झाले होते.

परदेशी सरकारांना सहाय्य

· श्रीलंकेत डॉर्नियर विमानाची तैनात:

श्रीलंकेला एक आयएन डॉर्नियर 15 ऑगस्ट 22 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहे. श्रीलंकेच्या वायुदलाने (एसएलएएफ) 15 ऑगस्ट 22 रोजी कोलंबो येथे श्रीलंकेचे राष्ट्रपती, श्रीलंकेतील भारताचे राजदूत आणि नौदल उपप्रमुख यांच्या उपस्थितीत या विमानाचा एसएलएएफ च्या ताफ्यात औपचारिक समावेश केला.

· श्रीलंकेच्या नौदलाचे डायव्हिंग (पाणबुडे) प्रशिक्षण:

श्रीलंकेच्या नौदल कर्मचार्‍यांना मिक्स गॅस डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएन (IN) निरीक्षक हे जहाज 28 फेब्रुवारी ते 08 मार्च 2022 या कालावधीत श्रीलंकेतील त्रिकोनमाली येथे तैनात करण्यात आले होते.

एचएडीआर आणि एसएआर मोहिमा

· विशाखापट्टनम जवळच्या समुद्रामधील एसएआर:

जानेवारी 02 आणि 03, 2022 रोजी विशाखापट्टनमच्या रामकृष्ण चौपाटीजवळच्या समुद्रात  बुडत असलेल्या तीन जणांच्या एसआरए साठी आयएन आयएसव्ही (टी-39) बरोबर, एएलएच आणि चेतक हेलिकॉप्टर एक्स-देगा, विशाखापट्टणम तैनात करण्यात आले होते.

· मुंबई जवळील समुद्रातील शोध आणि बचाव मोहिमा:

28 जून 2022 रोजी, भारतीय नौदलाचे जहाज आयएन तेग आणि दोन हेलिकॉप्टर माजी आयएनएस  शिक्रा, मुंबई (एक सीकिंग 42सी आणि एक एएलएच), मुंबईच्या पश्चिमेला 70 एनएम वर समुद्रात अपघातग्रस्त झालेल्या पवन हंस हेलिकॉप्टरला (दोन क्रू मेंबर्स आणि सात प्रवासी) एसएआर  सहाय्य प्रदान करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर मधील सर्व, नऊ जणांना बाहेर काढण्यात आले. 

कमिशनिंग/लाँचिंग

· आयएनएस विक्रांतचे कमिशनिंग (नौदलाच्या ताफ्यात औपचारिक समावेश):

 भारताची पहिली स्वदेशी विमान वाहक युद्धनौका, आयएनएस विक्रांत कार्यान्वित झाली. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले, हा ध्वज वसाहतवादाचा भूतकाळ दूर करत भारतीय नौदलाचा समृद्ध वारसा सांगतो.

·  आयएनएस मुरगाव:

प्रकल्प 15बी चे आयएनएस मुरगाव हे दुसरे जहाज 18 डिसेंबर 22 रोजी मुंबईमध्ये भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झाले. 

· वागीरच्या सागरी चाचण्या आणि नौदलामधील औपचारिक समावेश:

वागीर या प्रकल्प-75 मधील पाचव्या पाणबुडीच्या सागरी चाचण्या सुरु आहेत. ही पाणबुडी 2023 मध्ये भारतीय नौदलात दाखल करण्याचे नियोजन आहे.   

नौदलाचे आधुनिकीकरण  

नौदलाचे आधुनिकीकरणाच्या मार्गावरील एका महत्वाच्या टप्प्यावर आहे. भारतीय नौदलाचे भविष्यातील एक सक्षम, व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आणि कार्यरत वायुदल सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

 

विमानाचा औपचारिक समावेश

 

· समीक्षाधीन वर्षात, खालील विमानांचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला:

1.   16 एएलएच एमके III हेलिकॉप्टर

2.   04 पी8आय विमाने

3.   24 मल्टी-रोल हेलिकॉप्टरपैकी 03 ची पहिली तुकडी (एमएच 60आर). उर्वरित हेलिकॉप्टर 2025 च्या मध्यापर्यंत युएसए (अमेरिका) येथून भारतीय नौदलात सामील केली जातील. (इतर तीन हेलिकॉप्टर भारतीय नौदलाने स्वीकारली असून नौदलाच्या कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी युएसए मध्ये ठेवण्यात आली आहेत).

4.   एअर स्टेशन्स (वायुदलाचे तळ)/ एअर स्क्वाड्रन्सचे (वायुदलाची पथके) कमिशनिंग (वायुदलामध्ये समावेश). भारतीय नौदलाने गेल्या एका वर्षात वायुदलाची तीन नवीन पथके नियुक्त केली आहेत. दुसरे पी8आय स्क्वॉड्रन आयएनएस 316 चा 29 मार्च 22 रोजी आयएनएस हंसा, गोवा येथे नौदलात समावेश झाला.

 

नवोन्मेष आणि स्वदेशीकरण

निश तंत्रज्ञानाचा समावेश: लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्याची क्षमता वाढविण्यासाठी निश  तंत्रज्ञानाची विस्तृत श्रेणी समाविष्ट केली जात आहे. लक्ष्यीकरण क्षमता वाढवण्यासाठी  जमीन आणि सागरी युद्धासाठीच्या आवृत्त्यांमध्ये टेहळणी युद्धसामग्री समाविष्ट केली जात आहे.

भारतीय नौदलासाठी एकात्मिक मानवरहित पथदर्शक आराखडा: जागतिक स्तरावर विकसित होत असलेल्या तंत्रज्ञान परिवर्तनाच्या अनुषंगाने, भारतीय नौदलासाठी संरक्षण मंत्र्यांनी, ऑक्टोबरमध्ये कमांडर परिषदे दरम्यान एकात्मिक मानवरहित युद्धाचा पथदर्शक आराखडा जारी केला होता. 

कल्याण आणि सक्षमीकरण

भारतीय नौदलात महिला: भारतीय नौदलात अधिकारी आणि खलाशी म्हणून आता महिलांची नियुक्ती होऊ शकते. अधिकारी अथवा नाविक पदाच्या प्रवेशासाठी, महिला उमेदवारांसाठीचे पात्रता निकष, कार्यपद्धती आणि इंडक्शन (समावेश) प्रक्रिया पुरुषांसाठी लागू असलेल्या प्रक्रीये प्रमाणेच आहे. भारतीय नौदलामधील महिलांसाठी प्रवेशाच्या संधी आणि नौदलात समाविष्ट होणार्‍या महिलांची संख्या, यात सातत्त्याने वाढ होत आहे.

लढाऊ भूमिकेत महिला: पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने महिला अधिकाऱ्यांची युद्धनौकांवर नियुक्ती केली जात आहे. सध्या जहाजांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढवली जात आहे. त्यानुसार, अतिरिक्त महिला अधिकाऱ्यांना सामावून घेण्यासाठी जहाजावरील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. याशिवाय, महिलांना नेव्हल एव्हिएशनमध्ये (नौदल वायुदल) वैमानिक आणि नेव्हल एअर ऑपरेटर्स, MARCOS (मरीन कमांडो), आरपीए वैमानिक, प्रोव्होस्ट ऑफिसर आणि राजनैतिक कामगिरी अंतर्गत पदावर समाविष्ट केले जात आहे.

 भारतीय वायुदल  

आत्मनिर्भर भारत’: 2022 मध्ये, भारतीय वायुदलाने (IAF) ने, मेसर्स टाटा एडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) या प्रमुख भारतीय कंपनीसह वायुदलाच्या तळाच्या पायाभूत सुविधांचे (MAFI)  आधुनिकीकरण सुरू ठेवले. या प्रकल्पांतर्गत दिशादर्शक सुविधा आणि पायाभूत सुविधांची श्रेणी सुधारणा प्रतिकूल  हवामानातही लष्करी आणि नागरी विमानांचे हवाई कार्यान्वयन सुलभ करून कार्यक्षमता वाढवत आहे.

 

राफेल: फ्रान्सने सर्व 36 राफेल विमानांची पूर्तता केल्यामुळे भारतीय वायुदलाची क्षमता आणखी मजबूत झाली आहे. या करारामधील अंतीम लढाऊ विमान डिसेंबरमध्ये भारतात आले. दोन्ही राफेल पथकेही पूर्णपणे कार्यरत आहेत.   

 

प्रशिक्षण आणि सराव: भारतीय वायुदलाने एकत्र काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी या वर्षी केवळ देशाच्या अन्य सेवांबरोबर सराव केला नाही, तर मित्र देशांकडून त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आणि चांगला सराव करण्यासाठी त्या देशांच्या वायुदलाबरोबर देखील सराव केला.    

मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण:  

भारतीय वायुदलाची हेलिकॉप्टर, हवाई देखभाल, आपत्ती निवारण, अपघातग्रस्तांची सुटका करणे, नक्षलवाद विरोधी कारवाया आणि विविध संस्थांसाठी दळणवळण ही कर्तव्ये नियमितपणे बजावत आहेत. पूर, जंगलातील आग किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हेलिकॉप्टर सर्वप्रथम प्रतिसाद देतात.

देवघर रोपवेवरून यात्रेकरूंची सुटका: झारखंडमधील देवघर रोपवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या ठिकाणी अडकलेल्या 35 यात्रेकरूंची सुटका करण्यासाठी एप्रिलमध्ये तीन MLH, एक ALH ध्रुवंद एक चीता हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. एनडीआरएफ, लष्कर आणि राज्य संस्थांच्या मदतीने हे बचावकार्य करण्यात आले.

कुनो नॅशनल पार्क मधील चित्त्यांचे हवाई मार्गाने स्थलांतर: कुनो नॅशनल पार्कमधील आठ चित्ते सप्टेंबरमध्ये नामिबियाहून चार्टर्ड कार्गो विमानाने ग्वाल्हेरमधील एअरफोर्स स्टेशन येथे नेण्यात आले. आयएएफ ने 2 एमआय-17 चा वापर चित्त्यांच्या एअरलिफ्टसाठी केला आणि जवान आणि त्यांच्या अतिरिक्त सामानासाठी एका चिनूक विमानाचा वापर केला.    

अपघातग्रस्तांची सुटका: विविध राज्य प्राधिकरणांच्या मागणीनुसार आयएएफ ने नियमित अपघातग्रस्तांची सुटका केली. वर्षभरात अपघातग्रस्तांच्या सुटकेसाठी एकूण 220 उड्डाणे झाली. यामध्ये परदेशी नागरिकांच्या सुटकेचाही सामावेश आहे.   

भारतीय तटरक्षक दल

 तस्करीची दंड वसुली:

जानेवारीमध्ये, आयसीजी च्या जहाजाने गस्तीदरम्यान पाकिस्तानी मासेमारी बोट ‘यासीन’ ला भारतीय सागरी क्षेत्रातील जाखाऊ येथे 2,000 किलो मासळीसह पकडले होते.

ऑक्टोबरमध्ये, ICGS C-429 ने गस्ती मोहिमेदरम्यान 'अल-साकर' नावाची एक पाकिस्तानी बोट, त्यावरील सहा कर्मचार्‍यांसह पकडली आणि अंदाजे 350 कोटी रुपये किमतीचे 50 किलो हेरॉइन जप्त केले.

 

बचाव मोहिमा:

जूनमध्ये, भारतीय तटरक्षक दलाने मुंबई हाय भागात ओएनजीसी साठी कार्यरत असलेल्या हेलिकॉप्टरची सुटका केली. हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिक आणि 7 कर्मचारी होते. तेल विहिरीच्या  प्लॅटफॉर्मवर आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करत असताना ते समुद्रात बुडाले होते. 

जुलैमध्ये, आपत्कालीन इशारा मिळाल्यावर, आयसीजी ने पोरबंदर किनाऱ्यापासून 185 किमी अंतरावर अरबी समुद्रात 22 जीव वाचवले.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था

नवीन पिढीचे आकाश क्षेपणास्त्र (आकाश-एनजी): जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या नवीन पिढीच्या आकाश-एनजी क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी जमिनीवर आधारित प्लॅटफॉर्मवरून यशस्वीपणे घेण्यात आली होती. यामध्ये  मल्टीफंक्शन रडार, कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन सिस्टम आणि तैनाती कॉन्फिगरेशनमध्ये भाग घेणारे लाँचर, हे सर्व शस्त्र प्रणाली घटक समाविष्ट होते. क्षेपणास्त्राने जलद आणि चपळ हवाई धोक्यांना निष्फळ करण्यासाठी आवश्यक असलेली सर्वोच्च स्तराची कुशलता यशस्वीरित्या प्रदर्शित केली.

 आकाश प्राइम मिसाइल: आकाश क्षेपणास्त्राची नवीन आवृत्ती, ‘आकाश प्राइम’ची आयटीआर, चांदीपूर येथून यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र, अधिक अचूकतेसाठी सक्रीय रेडिओ लहरी प्रणालीने सुसज्ज आहे.

 उद्योगांना सक्षम करणे: डीआरडीओ ला सहाय्य करणार्‍या सध्याच्या औद्योगिक आस्थापनांमध्ये डीपीएसयु आणि मोठ्या उद्योगांसह 1,800 एमएसएमई आहेत. डीआरडीओ ने विविध धोरणांद्वारे भारतीय उद्योगांना विकास आणि उत्पादन भागीदार म्हणून सामील करून मोठे उपक्रम हाती घेतले आहेत, त्यांचे तंत्रज्ञान नाममात्र किमतीत उद्योगांना पुरवण्यात आले आहे आणि त्याच्या पेटंटसाठी विनामूल्य प्रवेश प्रदान केला आहे. भारतीय उद्योगांना डीआरडीओ पेटंट मोफत मिळवता यावे, यासाठी धोरण जाहीर करण्यात आले आहे. तंत्रज्ञान विकास निधी (टीडीएफ) योजना उद्योगांना, विशेषत: स्टार्ट-अप आणि एमएसएमईंना संरक्षण आणि एरोस्पेस (हवाई) क्षेत्रातील नावीन्यपूर्ण, संशोधन आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांपर्यंत निधी देते. आतापर्यंत, 64 प्रकल्प टीडीएफ योजने अंतर्गत विविध एमएसएमई, स्टार्ट-अप आणि मोठ्या उद्योगांना देण्यात आले आहेत, ज्यांची एकूण प्रकल्प किंमत अंदाजे 280 कोटी रुपये आहे. डीआरडीओ च्या, एआय मधील प्रयोग केंद्रित संशोधनासाठी, सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स (CAIR), बेंगळुरू आणि डीआरडीओ यंग सायंटिस्ट लॅबोरेटरी (DYSL)-AI या  दोन समर्पित प्रयोगशाळा आहेत.                   

 माजी सैनिक कल्याण विभाग

जानेवारी 2022 मध्ये आरई टप्प्यात सशस्त्र सेना ध्वज दिन निधी (AFFDF) साठी 320 कोटी रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली. यामुळे मे 2018 पासून प्रलंबित असलेल्या 284 कोटी रुपयांच्या शिक्षण अनुदानाचे 1.58 लाख अर्ज आणि फेब्रुवारी 2020 पासून प्रलंबित असलेल्या 36 कोटी रुपयांच्या विवाह अनुदानाच्या 7,583 अर्जांचा सर्व अनुशेष दूर झाला. अशा प्रकारे, या उपक्रमाद्वारे एकूण 1.66 लाख माजी सैनिकांना लाभ मिळाला.

संरक्षण मंत्र्यांनी नोव्हेंबरमध्ये, 7 डिसेंबर रोजी असलेल्या सशस्त्र सेना ध्वज दिनापूर्वी एएफएफडीएफ (www.affdf.gov.in) साठी एक नवीन वेबसाइट सुरू केली. हे पोर्टल, युजर  फ्रेंडली आणि वापरकर्ता-अनुकूल पोर्टल असून, ते या निधीमध्ये ऑनलाइन योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

 सीमा रस्ते संघटना  

सीमा विकास: 2022 च्या ऑक्टोबर मध्ये संरक्षण मंत्र्यांनी  सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) 75 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण केले होते. लडाखमधील श्योक गावात आयोजित एका कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी 45 पूल, 27 रस्ते, दोन हेलिपॅड आणि एका कार्बन न्यूट्रल हॅबिटॅटचे उद्घाटन केले होते.

पुलांच्या  कामाला गती देण्यात आली: अरुणाचल प्रदेशातील अलॉन्ग-यिंकिओंग मार्गावरील सियोम नदीच्या उपनदीवर बीआरओ ने 30 मीटर लांबीचा पीएससी  बॉक्स गर्डर लाई ब्रिज यशस्वीरित्या बांधला आहे. हे काम आठ महिन्यांच्या कालावधीत संपूर्णपणे एकात्मिक मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीच्या मदतीने पूर्ण करण्यात आले.

बोगदे आणि धावपट्टीची कामे: 2.535 किमी लांबीच्या सेला आणि 0.5 किमी लांबीच्या नेचिफु बोगद्याच्या बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर, सेला दुहेरी बोगदा हा 13000 फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक असेल. अरुणाचलमधील सेला-चाब्रेला मार्गावर 105 मीटर लांबीचा बोगदा बांधण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

संरक्षण क्षेत्राची जमीन

 संरक्षण जमीन सर्वेक्षण: संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची, अंदाजे 18 लाख एकर जमीन असून, त्यापैकी छावण्यांच्या आत (1.62 लाख एकर), तर छावण्यांच्या बाहेर (16.38 लाख एकर) जमीन आहे. या संरक्षण जमिनीच्या सर्वेक्षणाचे संपूर्ण काम  विविध राज्य सरकारांच्या महसूल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान, अंदाजे 585 एकर संरक्षण जमीन जी पूर्वी निश्चित करता आली  नव्हती ती ओळखण्यात आली आणि त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन, डिफरेंशियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ड्रोन आणि सॅटेलाइट इमेजरी आधारित सर्वेक्षण यासारख्या आधुनिक सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा या अभ्यासासाठी उपयोग करण्यात आला. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) सहयोगाने डिजीटल एलिव्हेशन मॉडेलचा वापर करून डोंगराळ भागातील संरक्षण जमीन चांगल्या प्रकारे निश्चित करता यावी (व्हिज्युअलायझेशन), यासाठी 3D मॉडेलिंग तंत्र देखील वापरण्यात आले.

 एआय अनधिकृत बांधकामे शोधणार: एनआयडीईएम येथे डीजीडीई द्वारे स्थापित सॅटेलाइट आणि मानवरहित रिमोट व्हेईकल इनिशिएटिव्ह (CoE-SURVEI) वरील सेंटर ऑफ एक्सलन्सने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केले आहे, जे उपग्रह इमेजरी वापरून अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांसह जमिनीवरील बदल स्वयंचलित पद्धतीने शोधू शकतात.

 संरक्षण खाते पुस्तिका विभाग

 स्पर्श: संरक्षण लेखा विभागाने सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, MeitY अंतर्गत स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) सोबत एक सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत देशभरातील चार लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) मध्ये पेन्शन प्रशासनासाठी रक्षा (SPARSH) या डिजिटल व्यासपीठ प्रणाली  उपक्रमाच्या माध्यमातून निवृत्ती वेतन सेवा पुरवली जाते. निवृत्ती वेतन धारकांचे राहणीमान सुलभ होण्यासाठी आणि निवृत्ती  वेतनाशी संबंधित समस्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी, या सामंजस्य करारावर कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स (CDA) निवृत्ती वेतन आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे सीईओ यांनी फेब्रुवारीमध्ये स्वाक्षरी केली होती. सप्टेंबरमध्ये, बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँकेबरोबर  एक सामंजस्य करार करण्यात आला. या द्वारे, देशभरातल्या 14,000 हून अधिक शाखांमध्ये स्पर्श अंतर्गत सेवा केंद्रे सुरु करण्यात आली. संरक्षण क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांना निवृत्ती वेतन वितरीत करण्यासाठी वेब-आधारित डिजिटल प्रणाली झपाट्याने वाढली असून, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या प्रणाली द्वारे 11,600 कोटी पेक्षा जास्त निवृत्ती वेतन वितरीत  करण्यात आले. स्पर्श च्या लाभार्थ्यांची संख्या 11 लाखावर पोहोचली असून, यामध्ये 33% वाटा स्पर्श मध्ये नोंदणी केलेल्या संरक्षण क्षेत्रातील निवृत्ती वेतन धारकांचा आहे. निवृत्ती वेतन वितरीत करण्याच्या प्रक्रियेचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन 16 दिवसांवर आला आहे.   

सैनिक शाळा

100 नवीन सैनिक शाळांची स्थापना: सरकारने स्वयंसेवी संस्थांच्या/खासगी/राज्य सरकारांच्या भागीदारीत इयत्ता 6 वी पासूनच्या वर्गांच्या 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या उपक्रमाला मान्यता दिली आहे. या उपक्रमा अंतर्गत, सैनिक शाळा सोसायटीने 18 शाळांबरोबर सामंजस्य करार (एमओयु) केला आहे. आतापर्यंत या 18 शाळांपैकी 17 शाळांमध्ये एकूण 1,048 (912 मुले आणि 136 मुली) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे आणि या 17 शाळांमधील शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये सुरू झाले आहे.   

****

S.Thakur/N. Mathure/R.Agashe/CYadav 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1885665) Visitor Counter : 643


Read this release in: Malayalam , English , Hindi , Tamil