गृह मंत्रालय
वाराणसी येथे काशी-तमिळ संगमम कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
काशी तमिळ संगममचे आयोजन करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेच्या पुनरुज्जीवनासाठी उत्तम प्रयत्न केला आहे
भारत हा भू -सांस्कृतिक देश आहे आणि आपल्या एकात्मतेचा आधार ही आपली संस्कृती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगममच्या माध्यमातून अनेक शतकानंतर या संस्कृतींना जोडण्याचे कार्य केले आहे
Posted On:
16 DEC 2022 10:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज वाराणसी येथे काशी-तमिळ संगमम कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या काशी-तमिळ संगममचा आज एक प्रकारे समारोप होत आहे, पण ही इतिश्री नसून ही भारतीय संस्कृतीच्या दोन शिखरांच्या, म्हणजे, जगभरात ओळखले जाणारे काशी शहर आणि तमिळनाडूची संस्कृती, तत्त्वज्ञान, भाषा, ज्ञान यांच्या सांस्कृतिक मिलनाची सुरुवात आहे , असे अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हे प्रयत्न स्वातंत्र्यानंतर लगेचच व्हायला हवे होते; कारण गुलामगिरीच्या प्रदीर्घ काळाने आपली सांस्कृतिक एकता, वारशाची विविधता आणि संस्कृतींमधील भारतीयत्वाचे सत्व डागाळले गेले होते. त्यामुळे त्याचे पुनरूज्जीवन होणे आवश्यक होते. शहा पुढे म्हणाले की,काशी तमिळ संगममचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, भारत हा अनेक संस्कृती, भाषा, बोली आणि कला असलेला देश आहे, परंतु त्याचा आत्मा एक आहे. ते म्हणाले की, जगातील सर्व देश भू-राजकीय कारणांच्या आधारे निर्माण झाले आहेत, परंतु भू-संस्कृती, वारसा आणि संस्कृतीच्या आधारावर वसलेले भारत हे एकमेव राष्ट्र आहे. मंत्री अमित शहा म्हणाले की, वैविध्यपूर्ण संस्कृती हा आपल्या देशाच्या एकतेचा पाया आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी-तमिळ संगमच्या माध्यमातून आपल्या देशातील संस्कृतींना जोडण्याचा प्रयत्न केला आहे, हे कार्य सदैव सुरू राहील.
अमित शहा म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर एक काळ असा आला जेव्हा भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेमध्ये विष कालवले जात होते आणि एकाच देशातील दोन समाजांमध्ये भिन्न विचारांच्या माध्यमातून फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. असे सांगून शहा म्हणाले की, आता ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ निर्माण करण्याची वेळ आली आहे आणि ते भारताच्या सांस्कृतिक एकतेतूनच साध्य होऊ शकते. ते म्हणाले की, या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृतीच्या दोन शिखरांमध्ये एक सेतू निर्माण होण्यास मदत झाली आहे. आता अंतरे मिटली आहेत आणि इथूनच भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची सुरुवात होणार आहे.
S.Kakade/Sonal C/Suvarna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884332)
Visitor Counter : 168