इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

सेमीकंडक्टर चीप्सचे उत्पादन

Posted On: 09 DEC 2022 5:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2022

समग्र सेमीकंडक्टर परिसंस्थेची उभारणी करणे तसेच या उभारणीमुळे भारताच्या वेगाने विस्तारत जाणाऱ्या उत्पादन आणि नवोन्मेष परिसंस्थेच्या विकासाला चालना मिळेल हे सुनिश्चित करणे या महत्त्वाच्या उद्दिष्टांवर केंद्र सरकारने संपूर्ण लक्ष केंद्रित केलेले आहे. सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादनसंबंधित पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारने एकंदर 76,000 कोटी रुपये खर्चाच्या सेमीकॉन भारत कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे.ज्या देशांमध्ये आधीपासूनच सेमीकंडक्टर उत्पादनासाठी पूरक व्यवस्था विकसित झालेली आहे अशा देशांनी अतिशय प्रभावी पद्धतीने दिलेले आकर्षक लाभ तसेच आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या कंपन्यांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन सरकारने या कार्यक्रमात आणखी  सुधारणा केल्या आहेत. सेमीकंडक्टर्स निर्मिती, डिस्प्ले स्क्रीनचे उत्पादन आणि डिझाईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना अर्थसहाय्य पुरविणे हा सुधारित कार्यक्रमाचा उद्देश आहे.जागतिक पातळीवरील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मूल्य साखळ्यांमध्ये भारताचा सहभाग वाढता ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल.

उपरोल्लेखित कार्यक्रमाअंतर्गत खालील चार योजना सुरु करण्यात आल्या आहेत:

  1. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी उत्पादन पूरक व्यवस्था सशक्त करणे आणि विश्वसनीय मूल्य साखळी स्थापन करण्यास मदत करणे या दृष्टीने सेमीकंडक्टर वेफर फॅब्रीकेशन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘भारतातील सेमी कंडक्टर फॅब उभारणीसाठी सुधारित योजना’
  2. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी उत्पादन पूरक व्यवस्था सशक्त करण्यासाठी, देशात टीएफटी एलसीडी किंवा एएमओएलईडी यांच्यावर आधारित डिस्प्ले पॅनेलच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी  ‘भारतातील सेमी कंडक्टर फॅब उभारणीसाठी सुधारित योजना’
  3. भारतात संयुक्त सेमीकंडक्टर/ सिलिकॉन फोटॉनिक्स/ सेन्सर्स फॅब/ डिस्क्रीट सेमीकंडक्टर्स फॅब आणि सेमीकंडक्टर जुळवणी, चाचणी, उत्पादन आणि पॅकेजिंग (एटीएमपी)/ओसॅट सुविधा उभारण्यासाठी सुधारित योजना.
  4. आयसीज, चिपसेट्स, चीपवरील यंत्रणा (एसओसीएस), यंत्रणा आणि आयपी कोअर्स तसेच सेमीकंडक्टरशी निगडीत डिझाईन यांच्यासाठी ‘सेमीकॉन इंडिया फ्युचर डिझाईन: डिझाईनशी जोडलेली अनुदान योजना’ विविध टप्प्यांवर आर्थिक अनुदान तसेच डिझाईनविषयक पायाभूत सुविधा पुरविते.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही  माहिती दिली.

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 



(Release ID: 1882165) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Tamil