ऊर्जा मंत्रालय
2030 पर्यंत बिगर जीवाश्म इंधनावर आधारित 500 गिगावॅट स्थापित वीज क्षमता गाठण्याच्या दिशेने भारताने टाकले आणखी एक मोठे पाऊल
Posted On:
07 DEC 2022 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2022
- ऊर्जा मंत्रालयाने 2030 पर्यंत नियोजित अक्षय ऊर्जा प्रकल्पातून विजेसाठी सर्वसमावेशक योजना तयार केली.
- अतिरिक्त पारेषण प्रणाली (ट्रान्समिशन सिस्टीम) आणि बॅटरी ऊर्जा साठवण क्षमता निर्मिती याचा योजनेमध्ये समावेश आहे
- 2030 पर्यंत 500 गिगावॉट जीवाश्मेतर इंधनावर आधारित स्थापित क्षमता असलेल्या ट्रान्समिशन प्रणाली योजनेसाठी ऊर्जा मंत्रालयाने उच्च-स्तरीय समिती स्थापन केली.
- "2030 पर्यंत 500 गिगाव़ॉट पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा क्षमतेच्या एकत्रिकरणासाठी पारेषण प्रणाली " या शीर्षकाखाली समितीने तपशीलवार आराखडा तयार केला आहे.
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी आज नवी दिल्लीत "2030 पर्यंत 500 गिगाव़ॉट पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा क्षमतेच्या एकात्मतेसाठी पारेषण प्रणाली" योजनेचा आराखडा जारी केला.
ऊर्जा मंत्रालयाने केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली भारतीय सौर ऊर्जा महामंडळ, सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडिया लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड यांच्या प्रतिनिधींसह एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. 2030 पर्यंत 500 गिगावॉट गैर-जीवाश्म इंधन आधारित स्थापित क्षमता असलेल्या पारेषण प्रणालीच्या नियोजनासाठी या समितीची स्थापना करण्यात आली.
समितीने राज्ये आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत करून "2030 पर्यंत 500 गिगावॉट पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा क्षमतेच्या एकात्मतेसाठी पारेषण प्रणाली " नावाची विस्तृत योजना तयार केली. ही योजना 500 गिगावॉट जीवाश्मेतर इंधनावर आधारित एकत्रित उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. 2030 पर्यंत 537 गिगावॉट नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता असलेल्या आवश्यक पारेषण प्रणालीची विस्तृत योजना आहे.
दिवसभरात मर्यादित कालावधीसाठी अक्षय ऊर्जा निर्मितीची उपलब्धता लक्षात घेऊन, 2030 पर्यंत 51.5 गिगावॉट बॅटरी ऊर्जा साठवण क्षमतेद्वारे ग्राहकांना चोवीस तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे.
जगातील सर्वात जलद नवीकरणीय ऊर्जा क्षमतांच्या वाढीसह ऊर्जा संक्रमणामध्ये भारत जागतिक पातळीवर आघाडीचा देश म्हणून उदयास आला आहे. ऊर्जा संक्रमण क्षेत्रात भारताची महत्त्वाकांक्षा मोठी आहे आणि 2030 पर्यंत 500 गिगावॉट गैर-जीवाश्म इंधनावर आधारित वीज तयार करण्याची योजना आहे. देशात सध्या स्थापित वीजनिर्मिती क्षमता 409 गिगावॉट आहे. त्यात 173 गिगावॉट गैर-जीवाश्म इंधन स्रोत आहेत. ते एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेच्या सुमारे 42% आहेत.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881572)
Visitor Counter : 242