रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्ते अपघात आणि दुखापती

Posted On: 07 DEC 2022 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 डिसेंबर 2022

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या रस्ते सुरक्षा 2018 च्या जागतिक स्थिती अहवाला नुसार, रस्ते अपघातामधील दुखापती (आरटीआय) हे सर्व वयोगटांमधील मृत्यूसाठीचे आठवे प्रमुख कारण आहे आणि अपघाती मृत्यूंपैकी जवळजवळ 11% मृत्यू हे भारतामधील आहेत. स्टॉकहोम करारानुसार, भारत 2030 पर्यंत रस्ते अपघातामधील मृत्यू आणि जखमींची संख्या 50% पर्यंत कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्ही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन काळजी यावर आधारित रस्ते सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयाने बहु-आयामी धोरण तयार केले आहे. त्या अनुषंगाने, मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचे तपशील पुढील प्रमाणे:-

1. शिक्षण:

  • रस्ता सुरक्षेबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी मंत्रालय समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि छापील माध्यमांद्वारे रस्ते सुरक्षेबाबत प्रसिद्धी करण्यासाठी विविध उपाय आणि जनजागृती मोहिमा राबवते.  
  • रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी दर वर्षी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना/सप्ताह साजरा केला जातो.
  • सध्याच्या  आणि संभाव्य वाहन चालकांना वाहन चालवण्याचे सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष  प्रशिक्षण देण्यासाठी, वाहन चालवण्याची मानके ठरवण्यासाठी आणि प्रशिक्षणाचे निरीक्षण करण्यासाठी आणि चाचणी कौशल्याच्या वैज्ञानिक प्रक्रियेवर आधारित वाहन चालक परवाना देण्यासाठी, मंत्रालय देशभरात राज्य/जिल्हा स्तरावर वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (IDTRs), प्रादेशिक वाहन चालक प्रशिक्षण केंद्र (RDTCs) आणि वाहन चालक प्रशिक्षण केंद्र (DTCs) स्थापन करण्यासाठी योजना राबवत आहे.

2. अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने)

रस्ते अभियांत्रिकी:

नियोजनाच्या टप्प्यावर रस्ते सुरक्षा हा रस्त्याच्या आराखड्याचा अविभाज्य भाग बनवण्यात आला आहे. आराखडा, बांधकाम, वापर आणि देखभाल या सर्व टप्प्यांवर सर्व महामार्ग प्रकल्पांचे रस्ते सुरक्षा लेखा परीक्षण, अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅक स्पॉट्स (अपघात प्रवण क्षेत्र) निश्चित करणे आणि त्याची दुरुस्ती करणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध रस्ते सुरक्षा उपाय राबवणे.

वाहन अभियांत्रिकी:

  • वाहनाच्या पुढील आसनावर, चालका शेजारी बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅगची अनिवार्य तरतूद करण्याबाबत मंत्रालयाने अधिसूचित केले आहे.
  • मंत्रालयाने, दुचाकी, तीन चाकी, क्वाड्रिसायकल, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि पोलिस वाहने वगळता इतर सर्व प्रवासी वाहनांमध्ये वेग नियंत्रण प्रणाली/वेग नियंत्रण उपकरण बसवणे अनिवार्य केले आहे.
  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांच्या पूर्ण झालेल्या क्षेत्रातील टोल प्लाझावर निमवैद्यकीय  कर्मचारी/आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ/परिचारिका यांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी विशेष तरतूद केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1881559) अभ्यागत कक्ष : 355
Read this releasein: English , Urdu