संसदीय कामकाज मंत्रालय

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

Posted On: 06 DEC 2022 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022

संसदेच्या 2022 च्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (06.12.2022), संसद भवन परिसरात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती.   

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री आणि राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल, संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन देखील उपस्थित होते.  

आपल्या सुरुवातीच्या भाषणात केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की संसदेचे 2022 चे हिवाळी अधिवेशन, उड्या म्हणजेच बुधवार, 7 डिसेंबर, 2022 रोजी सुरू होईल आणि सरकारी कामकाजाच्या प्राधान्यानुसार, गुरुवार, 29 डिसेंबर, 2022 रोजी अधिवेशनाचा समारोप होईल. 

अधिवेशनाच्या 23 दिवसांच्या कालावधीत एकूण 17 सत्रे आयोजित केली जातील. अधिवेशना दरम्यान मांडण्यासाठी 25 विधेयके सध्या निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री म्हणाले की, संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीच्या नियमां अंतर्गत परवानगी दिलेल्या कोणत्याही मुद्द्यावर सभागृहात चर्चा करायला सरकार नेहमीच तयार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सक्रीय सहकार्य आणि पाठींबा द्यावा अशी त्यांनी विनंती केली. 

भाजपा व्यतिरिक्त आयएनसी, एआयटीसी, डीएमके, वायएसआरसीपी, टीएमसी (एम), बाळासाहेबांची शिवसेना, जद(यु), बीजेडी, टीआरएस, एलजेएसपी, एनसीपी, जे एंड के, एनसी, सीपीआय (एम), आययुएमएल, टीडीपी, सीपीआय, एपीएफ, एसएडी, आप, एआयएडीएमके, केसी(एम), एनडीपीपी, आरएसपी, व्हीसीके, राजद, एजीपी आणि आरएलपी या सत्तावीस पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. आगामी अधिवेशनात सरकारी विधेयके आणि इतर कामकाजा व्यतिरिक्त कोणते अन्य मुद्दे हाती घेता येतील, यावर या पक्षांच्या नेत्यांनी सूचना दिल्या.

सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित मुद्दे ऐकल्यावर शेवटी, बैठकीला संबोधित करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीतल्या सक्रीय आणि प्रभावी सहभागाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले. बैठकीतील अत्यंत निकोप चर्चा आणि महत्वाचे मुद्दे मांडल्याबद्दल त्यांची सर्व उपस्थितांची प्रशंसा केली. संसदेत नेहमीच्या विधिमंडळ कामकाजाव्यतिरिक्त सार्वजनिक महत्त्वाच्या, तातडीच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.   

          

 

 

 

 

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881274) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu , Hindi