परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

उदयपूर येथे पहिल्या शेर्पा बैठकीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या जी 20 प्राधान्यांवरील महत्त्वपूर्ण चर्चेचा समारोप

Posted On: 06 DEC 2022 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022

सर्वसमावेशक वाढ, बहुपक्षीयता आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, तसेच 3 एफ (अन्न, इंधन आणि खते), पर्यटन आणि संस्कृती या प्रमुख जागतिक मुद्द्यांवर मौलिक संभाषण हे भारत जी-20 अध्यक्षपदी आल्यानंतरच्या पहिल्या शेर्पा बैठकीच्या तिसऱ्या दिवसाचे ठळक मुद्दे होते. राजस्थानमधील उदयपूर येथे शेर्पा बैठकीच्या पाचही महत्त्वपूर्ण सत्रांचा आज समारोप झाला.

जी 20 शेर्पा अमिताभ कांत यांनी चर्चेची सुरुवात केली. कृषी, व्यापार आणि गुंतवणूक, रोजगार, भ्रष्टाचार-प्रतिबंध, पर्यटन आणि संस्कृती यावरील सहा वेगवेगळ्या कार्यगटांमध्ये भारताच्या जी 20 प्राधान्यक्रमांचा आढावा घेतला. ‘सहकारी प्रयत्नांना बळकटी’ या मुद्द्याचाही या आढाव्यात समावेश होता. त्यांनी कृषी, व्यापार, रोजगार तसेच भ्रष्टाचार आणि आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी परिवर्तनाच्या प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला. आर्थिक वाढीतील जागतिक अडथळ्यांवरील चर्चेदरम्यान, त्यांनी दीर्घकालीन उपाय आणि अर्थपूर्ण भागीदारीद्वारे लवचिक वाढ साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताने निश्चित केलेल्या विस्तृत प्राधान्यक्रमांवर शिष्टमंडळांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल अमिताभ कांत यांनी प्रशंसा केली.

चौथ्या सत्रात बहुपक्षीय सुधारणांच्या गरजेवर भर देण्यात आला. जगभरातील सर्व प्रदेश आणि देशांच्या प्राधान्यक्रमांना प्रतिबिंबित करणे तसेच गरजा आणि महत्त्वाकांक्षांना सामावून घेणे, आजच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेल्या संस्था निर्माण करणे यावर या सत्रात लक्ष केंद्रित करण्यात आले.  अन्न, इंधन आणि खतांच्या पुरवठ्याच्या सुरक्षेला प्रोत्साहन देणे आणि अडथळे दूर करणे या मुद्द्यांवरही या सत्रात चर्चा करण्यात आली.

महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि विकासात महिला आघाडीवर असण्याची गरज हे मुद्दे पाचव्या सत्रातील चर्चेच्या केंद्रस्थानी होते. लैंगिक तफावत कमी करणे, शिक्षण आणि कौशल्याद्वारे महिलांची क्षमता वाढवणे, नेतृत्वाच्या भूमिकेत महिलांना प्रोत्साहन देणे आणि महिला श्रमशक्तीचा सहभाग वाढवणे यासारख्या महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांकडे या चर्चेने लक्ष वेधले. शाश्वत विकासाची लक्ष्ये (एसडीजी) साध्य करण्याच्या दिशेने प्रगतीला गती देण्यासाठी पर्यटन क्षेत्राचा फायदा घेणे तसेच संस्कृतीला संरक्षण, चालना देणे आणि तिचे करणे तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्यांची पुनर्स्थापना या इतर क्षेत्रांचा समावेशही या सत्रातील चर्चेत केला होता.

शेर्पा बैठकीच्या पाच महत्त्वपूर्ण सत्रांचा समारोप आज झाला. गेल्या तीन दिवसांच्या फलदायी चर्चेचा आढावा घेताना कांत यांनी चर्चेचे सार उलगडून सांगितले. जी-20 राष्ट्रांच्या सामूहिक कृतीला बळकटी देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. भारताच्या अध्यक्षपदाची व्यापक संकल्पना- वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य – अशी आहे. बैठकीच्या संपूर्ण कार्यवाहीमध्ये ही संकल्पना प्रतिध्वनित झाली.

 

 

R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1881273) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi