अंतराळ विभाग
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह 5 डिसेंबर 2022 रोजी संयुक्त अरब अमिराती मध्ये होणाऱ्या "अबू धाबी स्पेस डिबेट" साठी भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करतील
Posted On:
04 DEC 2022 5:26PM by PIB Mumbai
केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)डॉ जितेंद्र सिंह हे उद्यापासून सुरू होणाऱ्या “अबू धाबी स्पेस डिबेट” या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी संयुक्त अरब अमिराती येथे जाणाऱ्या अधिकृत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करतील.
इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झॉग यांच्यासह भारताच्या वतीने डॉ जितेंद्र सिंह उद्घाटन समारंभाला संबोधित करतील.
युएईचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, बहारीनचे परराष्ट्र मंत्री आणि इस्रायलचे प्रगत तंत्रज्ञान मंत्री यांच्यासमवेत डॉ जितेंद्र सिंह ‘अंतराळ संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य सक्षम करण्यात परराष्ट्र धोरणाची भूमिका’ या विषयावरील मंत्रिस्तरीय बैठकीलाही उपस्थित राहतील.
द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी विविध मार्ग आणि साधनांबाबत चर्चा करण्यासाठी युएईचे प्रगत तंत्रज्ञान राज्यमंत्री तसेच यूएई अंतराळ संस्थेच्या अध्यक्ष सारा अल अमिरी यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत.
अबू धाबीला रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारत आणि युएई संयुक्त अंतराळ सहकार्य अरबी द्वीपकल्पात मोठी झेप घेण्यास सज्ज असून दोन्ही देशांनी द्विपक्षीय अंतराळ सहकार्य वाढवण्यास प्राधान्य दिले आहे. ते म्हणाले, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि युएई स्पेस एजन्सी यांनी 2016 मध्ये बाह्य अवकाशाचा शांततापूर्ण उद्देशांसाठी शोध आणि वापर यामध्ये सहकार्य करण्याबाबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.
युएईचे प्रगत तंत्रज्ञान राज्यमंत्री तसेच यूएई अंतराळ संस्थेच्या अध्यक्ष सारा अल अमिरी यांच्याबरोबर प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान डॉ जितेंद्र सिंह हे भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील प्रगत आणि उदयोन्मुख अंतराळ तंत्रज्ञानामध्ये संयुक्त स्टार्ट-अप उपक्रमांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. अंतराळ क्षेत्रात दोन्ही देशांकडे असलेली अफाट क्षमता लक्षात घेता, या क्षेत्रातील सहकार्य उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याचा एक नवा आयाम असेल.
***
N.Chtale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880814)
Visitor Counter : 207