वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

‘मिलेट्स-स्मार्ट न्यूट्रिटिव्ह फूड’ परिषदेला पीयूष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार


आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष - 2023 च्या निमित्ताने ही प्रारंभ-पूर्व परिषद आहे

भरड धान्य परिषदेमुळे पोषक तृणधान्यांच्या निर्यातीला चालना मिळण्यास मदत होईल

Posted On: 04 DEC 2022 9:50AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली येथे उद्या (5 डिसेंबर 2022, सोमवार) होणाऱ्या मिलेट-स्मार्ट न्यूट्रिटिव्ह फूड परिषदेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कृषी आणि प्रक्रिया-युक्त खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) या त्यांच्या सर्वोच्च कृषी निर्यात संवर्धन संस्थेच्या माध्यमातून या परिषदेचे आयोजन केले आहेआंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष - 2023 च्या निमित्ताने ही प्रारंभ-पूर्व परिषद आहे

मिलेट्स स्मार्ट न्यूट्रिटिव्ह परिषदेत प्रामुख्याने शेतकरी उत्पादक संघटना, स्टार्ट-अप, निर्यातदार, भरड धान्य -आधारित मूल्यवर्धित उत्पादनांचे उत्पादक यासारख्या पुरवठा साखळीतील भागधारक सहभागी होणार आहेत. परिषदेत , भारतीय भरड धान्ये आणि त्या संबंधी उत्पादनांची ओळख करून देण्यासाठी प्रदर्शन आणि B2B बैठक देखील आयोजित केली जाणार आहे .

वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या परिषदेच्या सन्माननीय अतिथी असतीलकेंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल, कृषी सचिव मनोज आहुजा, एपीईडीएचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू आणि वाणिज्य विभागाचे सहसचिव डॉ. एम. बालाजी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

भरड धान्य निर्यात प्रोत्साहन कार्यक्रमासंबंधी भारताच्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दर्शविला होता, त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत 5 मार्च 2021 रोजी 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष  म्हणून घोषित करण्यात आले होते. केंद्र सरकार सध्या भारतीय भरड धान्ये तसेच त्याची मूल्यवर्धित उत्पादने जगभरात लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याला लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष-2023 चे आयोजन करत आहे.

अशा प्रकारच्या पहिल्या भरड धान्य परिषदेत, केंद्र सरकार 30 संभाव्य आयातदार देश आणि भारतातील 21 भरड धान्य उत्पादक राज्ये यांच्यावरील -कॅटलॉग प्रसिद्ध करेल. तसेच, नॉलेज पार्टनर 'येस बँक'च्या सहकार्याने तयार केलेल्या  ज्ञान-पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 16 आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने आणि ग्राहक - विक्रेता बैठकांमध्ये निर्यातदार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सहभागी करून घेण्याची योजना आखली आहे.

भरड धान्याला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या मजबूत धोरणानुसार, परदेशातील भारतीय दूतावासांना भारतीय भरड धान्यांचे ब्रँडिंग आणि प्रसिद्धी, तसेच B2B आणि थेट सहकार्य यासाठी आंतरराष्ट्रीय शेफ तसेच डिपार्टमेंटल स्टोअर्स, सुपरमार्केट आणि हायपरमार्केट यांसारख्या संभाव्य खरेदीदारांबरोबर बैठका आयोजित केल्या जातील.

याव्यतिरिक्त, संभाव्य आयातदार देशांच्या भारतातील दूतावासातील राजदूतांना रेडी टू ईट भरड धान्य -आधारित उत्पादनांचे प्रदर्शन  तसेच B2B बैठकांचे आयोजन करण्यासाठी आमंत्रित केले  आहे.

केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिका, दुबई, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, सिडनी, बेल्जियम, जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिका येथे महत्त्वपूर्ण फूड शो, खरेदीदार विक्रेता बैठका आणि रोड शो मध्ये भारतातील विविध भागधारकांच्या सहभागातून भरड धान्य विषयक प्रचार उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले  आहे.

भारतीय भरड धान्यांना प्रोत्साहन देण्याचा एक भाग म्हणून, अपेडाने भरड धान्य  आणि त्याची  मूल्यवर्धित उत्पादने  Gulfood 2023, Foodex, Seoul Food & Hotel Show, सौदी अॅग्रो फूड, सिडनी (ऑस्ट्रेलिया) मधील फाईन फूड शो , बेल्जियमचा फूड अँड बेव्हरेजेस शो, जर्मनीचा बायोफॅच आणि अनुगा फूड फेअर, सॅन फ्रान्सिस्कोचा विंटर फॅन्सी फूड शो सारख्या विविध जागतिक मंचावर प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे.

जागतिक उत्पादनात अंदाजे 41 टक्के वाटा असलेला भारत हा भरड धान्यांच्या उत्पादनात जगातील आघाडीचा देश आहे. अन्न आणि कृषी संघटनेनुसार, 2020 मध्ये भरड धान्याचे जागतिक उत्पादन 30.464 दशलक्ष मेट्रिक टन होते आणि त्यात भारताचा वाटा 12.49 दशलक्ष मेट्रिक टन होता, जो एकूण  उत्पादनाच्या 41 टक्के आहे. भारताने 2021-22 मध्ये भरड धान्य उत्पादनात 27 टक्के वाढ नोंदवली असून मागील वर्षी उत्पादन 15.92 दशलक्ष मेट्रिक टन होते.

राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश ही भारतातील पाच भरड धान्य उत्पादक राज्ये आहेतनिर्यातीत भरड धान्याचा वाटा एकूण उत्पादनाच्या जवळपास 1% आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीत प्रामुख्याने अख्या धान्याचा समावेश होतो आणि भारतातून भरड धान्याच्या मूल्यवर्धित उत्पादनांची निर्यात अगदी नगण्य आहे.

मात्र अंदाज वर्तवण्यात येत आहे की भरड धान्याची बाजारपेठ 2025 पर्यंत सध्याच्या 9 अब्ज डॉलर्स वरून 12 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढेल.

संभाव्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आणि पोषक तृणधान्यांच्या पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पोषक तृणधान्ये निर्यात प्रोत्साहन मंच स्थपन केला आहे.

तांदूळ आणि गहू यांसारख्या जास्त प्रमाणात वापरल्या जाणार्या तृणधान्यांच्या तुलनेत भरड धान्यांमध्ये  उत्तम पौष्टिक मूल्ये आहेत. त्यात  कॅल्शियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात जे मुलांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक पोषक घटक पुरवण्यास  मदत करतात. तसेच, नवजात बालकांचा आहार  आणि पोषण उत्पादनांमध्ये भरड धान्याचा  वापर वाढत आहे.

डीजीसिआयएस आकडेवारीनुसार, भारताने 2021-22 या आर्थिक वर्षात भरड धान्य निर्यातीत 8.02% ची वाढ नोंदवली. भारतातील भरड धान्य युएई, नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांना निर्यात केले जाते. बाजरी, नाचणी, कॅनरी, ज्वारी आणि कुट्टू यांचा यात समावेश आहे. जगातील प्रमुख आयातदार देश इंडोनेशिया, बेल्जीयम, जपान, जर्मनी, मेक्सिको, इटली, अमेरिका, ब्राझील ब्रिटन आहेत.

***

A.Chavan/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880790) Visitor Counter : 302