संरक्षण मंत्रालय
देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदल आणि तटरक्षक दल अत्याधुनिक जहाजे आणि शस्त्रांनी सुसज्ज - मुंबईत झालेल्या संरक्षण सल्लागार समितीच्या बैठकीत संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य- राजनाथ सिंह
Posted On:
02 DEC 2022 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022
देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक जहाजे आणि शस्त्रांनी भारतीय नौदल आणि तटरक्षक दल सुसज्ज केले जात आहे असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते आज मुंबईत संरक्षण मंत्रालयाच्या ‘संरक्षण दलाचे जहाजबांधणी तळ’ विषयक सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला अनेक खासदार उपस्थित होते. राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याने भारतीय नौदल आणि तटरक्षक दल बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. संरक्षण जहाजबांधणी तळांनी या दिशेने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांची प्रशंसा करताना संरक्षणमंत्री म्हणाले की त्यांनी उत्पादनाचा वेळेवर पुरवठा करण्याची आणि उत्पादनांचा दर्जा चांगला राखण्याची काळजी घेतली जी बाब एका भक्कम संरक्षण दलासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा दृष्टीकोन साकार करण्यासाठी महत्त्वाची आहे. शस्त्रे/उत्पादने यांचे स्वदेशी उत्पादन करण्यासाठी आणि संरक्षणविषयक सार्वजनिक उपक्रमांकडून होणारी आयात कमी करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
“14 ऑगस्ट 2020 रोजी स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सृजन पोर्टल सुरू करण्यात आले. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या पोर्टलवर जहाजबांधणी तळांची 783 उत्पादने आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली. यापूर्वी या उत्पादनांची आयात केली जात होती आणि त्यांची निर्मिती करणारे स्वदेशातील उत्पादक उपलब्ध नव्हते असे त्यांनी सांगितले. या यादीमधील 73 उत्पादनांचे यशस्वीरित्या स्वदेशीकरण करण्यात आले आहे आणि इतर उत्पादनांचे या उद्योगातील भागीदारांच्या सहकार्याने स्वदेशीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यामध्ये संरक्षण जहाजबांधणी तळांची त्यांनी प्रशंसा केली. 2021-22 मध्ये या जहाजबांधणी तळांवरील उत्पादनांचे मूल्य 8925 कोटी रुपये होते आणि कराच्या भरण्यानंतर होणारा नफा 928 कोटी रुपये होता. सध्या या तळांच्या मागणी पुस्तिकेतील स्थितीनुसार उत्पादनांचे मूल्य 81,777 कोटी रुपये आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जीईएम)च्या माध्यमातून या जहाजबांधणी तळामध्ये होणाऱ्या खरेदीत वाढ होत असल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. यामुळे स्थानिक उत्पादनांना चालना मिळण्याबरोबरच खरेदी प्रक्रियेतही पारदर्शकता आली आहे, असे ते म्हणाले.
लवकरच या जहाजबांधणी तळांकडून देशाच्या गरजांची पूर्तता तर होईलच त्याचबरोबर स्पर्धात्मक आधारावर निर्यातीच्या मागण्या देखील स्वीकारल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880521)
Visitor Counter : 282