राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आंतरराष्ट्रीय गीता परिषदेला उपस्थिती, राष्ट्रपतींच्या हस्ते हरियाणा सरकारच्या आरोग्य, रस्ते वाहतूक आणि शैक्षणिक अशा विविध प्रकल्पांची पायाभरणी/ उद्‌घाटन

Posted On: 29 NOV 2022 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (29 नोव्हेंबर, 2022) हरियाणा मधील कुरुक्षेत्र येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गीता परिषदेला उपस्थित राहिल्या. ‘मुख्यमंत्री स्वास्थ्य सर्वेक्षण’ योजनेचा तसेच सार्वजनिक रस्ते वाहतूक सुविधांसाठी असलेल्या हरियाणा ई तिकीटिंग प्रकल्पाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. याशिवाय सिरसा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची  पायाभरणीही त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.

श्रीमद्भगवद्गीता हा खऱ्या अर्थाने एक वैश्विक ग्रंथ आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. या ग्रंथाचा कित्येक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. हा  भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ग्रंथ आहे. गीतेवर जितकी भाष्ये लिहिली गेली आहेत तितकी क्वचितच इतर कोणत्याही ग्रंथावर लिहिली गेली असतील. योगाभ्यासाप्रमाणेच हा ग्रंथ म्हणजे भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. गीता ही संपूर्ण मानवजातीला भारताची आध्यात्मिक देणगी आहे. गीता ही मानवतेसाठी एक जीवन संहिता आणि आध्यात्मिक  दीपस्तंभ आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

गीता आपल्याला निरपेक्ष भावनेने कठोर परिश्रम करण्याची शिकवण देते.  फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणे हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे. कर्म करतानाच जीवनाला अर्थ प्राप्त होतो, निष्क्रियता आणि इच्छा या दोन्हींचा त्याग करून काम केल्याने जीवन अर्थपूर्ण बनते. सुख आणि दुःखात मन विचलित न करता स्थिर राहणे, नुकसान आणि लाभ यांचा सारख्याच भावनेने स्वीकार करणे, सन्मान किंवा अपमान यांचा आपल्या मनावर प्रभाव पाडून न घेणे, आणि  सर्व परिस्थितीत संतुलन कायम ठेवणे  हा गीतेचा अतिशय उपयुक्त संदेश आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ प्रतिकूल परिस्थितीत देखील मनाला उभारी देतो आणि अत्यंत निराशेच्या क्षणी आशेचा किरण दाखवतो, हा जीवन घडवणारा ग्रंथ आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. गीतेच्या संदेशाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या आयोजकांनी  सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. गीतेतील शिकवण आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 1879793) Visitor Counter : 244