माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्यात झालेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार-इफ्फीची शानदार सोहळ्याने सांगता
कोस्टारिकाच्या व्हॅलेंटीना मॉरेल दिग्दर्शित 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या स्पॅनिश चित्रपटाला 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर पुरस्कार
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांचा ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर -2022’ या पुरस्काराने सन्मान
भारतात चित्रपट निर्मितीसाठी एक समृद्ध व्यवस्था निर्माण करणे आणि भविष्यासाठी सज्ज असा चित्रपट उद्योग उभारणे हे आमचे उद्दिष्ट: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर
ज्येष्ठ स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांचा इफ्फीमध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
गोवा/मुंबई, 28 नोव्हेंबर 2022
“जेव्हा भारतात एक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडला गेला, तेव्हा, एकच प्रश्न वारंवार विचारला गेला, तो म्हणजे, अशा महोत्सवाचा उद्देश काय असेल? यातून काय साध्य होईल? आणि त्याला दोन उत्तरे आहेत: पहिले, ज्या देशांत आंतरराष्ट्रीय चित्रपट आयोजित केला जातो, त्या देशातील चित्रपट रसिकांना अनेक दर्जेदार, सर्वोत्तम चित्रपट बघण्याची संधी मिळते. आणि दुसरे म्हणजे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट निर्मिती उद्योगाशी संबंधित सगळ्यांना ही संधी देतो, की त्यांच्यासमोर असलेले प्रश्न, चिंतेचे विषय याबद्दल चर्चा करावी, एका सामाईक मंचावर हे प्रश्न मांडले जावेत आणि या कलेची प्रगती सगळीकडे कशी होत आहे, याची तुलना करुन, त्यातून भविष्याच्या वाटचालीसाठी आवश्यक त्या सुधारणा करता याव्यात.”
53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार-इफ्फीची आज सांगता होता असतांना, आपल्याला, भारतातल्या पहिल्या इफफीच्या आयोजन समितीचे अध्यक्ष, सी. एम. आगरवाला यांचे हे वरील शब्द आठवत आहेत . 1952 साली, तेव्हाच्या बॉम्बे इथे हा महोत्सव पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आपल्या स्वागतपर भाषणात, 24 जानेवारी 1952 रोजी आगरवाला यांनी हे मत व्यक्त केलं होतं.
गेले नऊ दिवस देशविदेशातील चित्रपट रसिकांना अनेक दर्जेदार आणि विविधांगी चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार-इफ्फीची आज, 28 नोव्हेंबर 2022 रोजी गोव्यात पणजी इथे, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियमवर झालेल्या शानदार सोहळ्याने सांगता झाली.
सर्वोत्तमातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव:
''आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या स्पॅनिश चित्रपटाला 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर पुरस्कार
यंदाच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात / इफ्फीमध्ये टेंगो सुएनोस इलेक्ट्रिकोस /'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या स्पॅनिश चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित सूवर्ण मयुर पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटातून सिने जगताच्या वर्तमान आणि भविष्याचं प्रतिबिंब पडद्यावर उमटलेलं दिसतं असं मत परीक्षकांनी व्यक्त केलं आहे. या सिनेमातून दिग्दर्शकानं इव्हा या 13 वर्षांच्या मुलीच्या प्रौढावस्थेत जाण्याचा प्रवास मांडला आहे. पडद्यावर मांडलेला हा प्रवास म्हणजे निव्वळ वय वाढण्याची प्रक्रिया नाही, तर तो बदलांच्यादृष्टीनं अत्यंत तपशीलवार मांडला असल्यानं, चित्रपटातली अनेक दृश्य पाहतांना प्रेक्षकांच्या मनालाही चटका लावून जातात असंही परीक्षकांनी म्हटलं आहे. या चित्रपटातून मानवी जीवनातली गुंतागुंत अत्यंत प्रामाणिकपणे साकारली असून, हिंसा आणि चैतन्य, भिती आणि जवळीक या भावना एकसमान वाटू लागतात, या सिनेमातूेन मानवी जीवनाचे पैलू इतक्या तरलतेनं मांडले आहेत, की त्यामुळे हा सिनेमा पाहताना आम्हाला स्वतःलाही अनेकदा कंप फुटल्याचा अनुभव आल्याचंही परीक्षकांनी म्हटलं आहे.
इराणमधल्या प्रतिगामी सामाजिक-राजकीय व्यवस्थेचं जादुई आणि मार्मिक चित्रण असलेल्या 'नो एंड' या चित्रपटासाठी इराणचे प्रख्यात लेखक दिग्दर्शक इराणी लेखक आणि दिग्दर्शक नादेर साईवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार
नो एंड / बाई पायन हा तुर्कीश सिनेमा असून यात इराणच्या गुप्त पोलिसांकडून केली जाणारी हेराफेरी आणि कारस्थानांचं दिग्दर्शक नादेर सैवर यांनी प्रभावी चित्रण केलं आहे. या सर्जनशीलतेनंच त्यांना 53व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार मिळवून दिला आहे. नादेर यांनी या चित्रपटातून अयाज या शांत संयमी आणि प्रामाणिक व्यक्तीची कथा मांडली आहे. काही एका कारणामुळे आपलं घर सुरक्षित राखण्याच्या आर्जवी प्रयत्नातून गुप्त पोलीसांसमोर खोटी कथा रचतो. मात्र प्रत्यक्षात जेव्हा या सगळ्या प्रकरणात खऱ्या गुप्त पोलीसांचा प्रवेश होतो, तेव्हा कथेतली गुंतागुंत अधिक वाढत जाते. या चित्रपटासाठी नादेर यांना पुरस्कार जाहीर करताना सर्व परीक्षकांचं एकमत होतं ही बाब परीक्षकांनी आवर्जून नमूद केली. इराणमधल्या घटनाचं संदर्भानं मांडलेल्या या कथानकातून प्रतिगामी सामाजिक-राजकीय व्यवस्थेचं दिग्दर्शक नादेर यांनी अंत्यत जादुई आणि मार्मिक चित्रण केलं आहे, हा सिनेमा तसा संथ असला तरी डोळ्यात अंजन घालणारा आणि संवेदनशील असल्याचं मतही परीक्षकांनी व्यक्त केलं आहे.
नो एंड या चित्रपटातील मुख्य अभिनेता वाहिद मोबस्सेरी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार तर, 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची मुख्य अभिनेत्री डॅनिएला मारिन नवारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर
भावनांच्या गुंतागुंतीतून यातनांच्या गर्तेत सापडलेल्या नायकाचं पात्र जिवंत करणाऱ्या नो एंड या चित्रपटातील मुख्य अभिनेता वाहिद मोबस्सेरी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार देऊन अभिनयाचा गौरव करण्यात आला तर, 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची मुख्य अभिनेत्री डॅनिएला मारिन नवारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर (सिल्व्हर पिकॉक) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांना व्हेन द वेव्हज आर गॉन / (Kapag wala nang mga alon) साठी विशेष ज्युरी पुरस्कार
53 व्या इफ्फीमध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार, “व्हेन द वेव्हज गॉन” या फिलिपिनो चित्रपटाचे निर्माते लव्ह डियाझ यांना मिळाला आहे. त्यांच्या प्रशस्तीपत्रावर, चित्रपटाचे वैशिष्ट्य लिहितांना ज्यूरी सदस्यांनी म्हटलं आहे- “हा चित्रपट, केवळ दृश्य माध्यमातून प्रत्यक्ष कथा सांगण्याच्या ताकदीची प्रभावी प्रचिती देतो. यात कमीतकमी शब्द आहेत, तरीही, क्रोधासारखी भावनाही अत्यंत परिणामकारक रित्या अभिव्यक्त झाली आहे.” हा चित्रपट फिलीपिन्समधील एका शोधकर्त्याची कथा आहे, जो स्वतःच नैतिक-अनैतिकच्या खोल विवरात अडकला आहे. हा शोधकर्ता, स्वतःची अस्वस्थता आणि अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्या गडद भूतकाळाची सावली त्याच्यावर पडली आहे, जी त्याला त्रास देत आहे. लव्ह डायझ हे ‘सिनेमॅटिक टाइम’चे स्वतःचे स्वरूप विकसित करण्यासाठी ओळखले जातात.
बिहाइंड द हेस्टॅक्स’ साठी असिमिना प्रोड्रू यांना सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार
इफ्फीने अथेन्सच्या दिग्दर्शक असिमिना प्रोड्रू यांना ‘बिहाइंड द हेस्टॅक्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या महोत्सवात या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रिमियर झाला होता. हा चित्रपट म्हणजे अनावश्यक नैतिकतेच्या तीव्र मानसशास्त्रीय दृष्टीकोनावरील एक शोधनिबंध आहे, वांशिक निर्वासितांच्या समस्येविषयी असलेला तिटकारा आणि पौगंडावस्थेतील सजगता याकडे लक्ष वेधणारा आहे, असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. एक माणूस, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी यांना पहिल्यांदाच एका समस्येला तोंड द्यावे लागत आहे आणि त्या दरम्यान त्यांच्या प्रत्येक कृतीची किंमत त्यांना मोजावी लागत आहे. त्यांच्या या प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधणारे कथानक या चित्रपटात आहे.
प्रवीण कांड्रेगुला यांना ‘'सिनेमाबंदी' ‘ या तेलुगु चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार
दिग्दर्शक, लेखक आणि सिनेमॅटोग्राफर प्रवीण कांड्रेगुला यांना बंदी या चित्रपटासाठी परीक्षकांच्या विशेष उल्लेखनीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ज्यामध्ये एका अतिशय गरीब आणि जगण्याचा संघर्ष करणाऱ्या रिक्षा चालकाची कथा आहे. ज्या रिक्षा चालकाला एक अतिशय महागडा कॅमेरा बेवारस स्थितीत सापडतो, जो त्याला रिक्षा चालकापासून चित्रपट निर्माता बनण्याच्या प्रवासाकडे घेऊन जातो. भारतामध्ये चित्रपटाविषयी असलेलं कमालीचं वेड आणि आकांक्षांची कहाणी हा चित्रपट सांगत असल्याचं मत, परीक्षकांनी व्यक्त केलं आहे.
‘नर्गिसी’या डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीच्या संघर्षावरील चित्रपटाने 53 व्या इफ्फीमध्ये जिंकला आयसीएफटी -युनेस्कोचा गांधी पदक पुरस्कार
दिग्दर्शक पायम एस्कंदरी यांचा इराणी चित्रपट नर्गिसीने 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयसीएफटी -यूनेस्कोचे गांधी पदक जिंकले आहे, महात्मा गांधींच्या शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या या चित्रपटाची यासाठी निवड करण्यात आली आहे.डाऊन सिंड्रोम असलेल्या एका व्यक्तीची आणि त्यामुळे त्याच्या जीवनात निर्माण झालेले ओझे आणि त्याचे परिणाम याची कथा या चित्रपटात आहे. करुणा आणि मार्दव हे दोन गुण या पुरस्कार विजेत्या चित्रपटात दाखवले आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक पायम एस्कंदरी यांनी, एका आभासी संदेशाद्वारे, इफ्फीच्या ज्यूरी सदस्यांचे आभार मानले. “हा पुरस्कार मिळणे म्हणजे मोठा सन्मान आहे. हा चित्रपट मी निर्माण करुन शकेन, असा विश्वास ज्यांनी माझ्यावर ठेवला, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. विशेषतः माझे कुटुंब- माझी प्रिय पत्नी आणि ‘नर्गिसी’या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना धन्यवाद!”डाऊन सिंड्रोम हा आजार असलेले लोक, देवदूत असतात, असा मला विश्वास आहे. त्यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक कथा आहेत, त्या कथा आपण ऐकल्या पाहिजेत, असे ते पुढे म्हणाले.
अभिनेते चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान
अभिनेते चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.
काही सन्मान माझ्यासाठी विशेष मौल्यवान आहेत, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल इफ्फी आणि भारत सरकारचे आभार मानतो असे चिरंजीवी यांनी सांगितले.चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझं नाव, कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद असं होतं, चित्रपट सृष्टीत, ‘चिरंजीवी’ म्हणून माझा पुनर्जन्म झाला. आणि आता माझी कीर्ती, माझे नाव, करिश्मा, सर्व माझ्या चाहत्यांचे अनमोल प्रेम आणि आपुलकी हे सगळं मला तुमच्याकडून मिळालं. कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद म्हणून मला जन्म देणार्या माझ्या आई-वडिलांचा आणि चिरंजीवी म्हणून मला जन्म देणार्या चित्रपटसृष्टीचा मी आयुष्यभर ऋणी आहे असे चिरंजीवी यांनी सांगितले.
महोत्सवात दाखवण्यात आलेली विविधता ही ‘वसुधैव कुटुंबकम’ चे जिवंत स्वरूप: केंद्रीय मंत्री माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर
इफ्फी महोत्सव हा वसुधैव कुटुंबकम अर्थात हे विश्वची माझे घर या तत्वावर आधारलेला असून यावर्षीच्या आवृत्तीत दिव्यांगजनांसाठी चित्रपट प्रदर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आणि सर्वसमावेशक चित्रपट विभागाचा एक भाग समाविष्ट करून आपण या तत्वाशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले आहे, असे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ( एन एफ डी सी ) चे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर यांनी आभारदर्शक भाषणात सांगितले. या महोत्सवात नारी शक्तीचे प्राबल्य स्पष्टपणे दिसून आले. '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' अर्थात “उद्याचे 75 सृजनशील कलावंत” या स्पर्धेत 40 टक्क्यांहून अधिक महिला चित्रपट निर्मात्यांनी भाग घेतला होता, स्पर्धा विभागातील 66 टक्के चित्रपट हे महिला चित्रपट निर्मात्यांचे होते आणि हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी काम करणारी कर्मचाऱ्यांमध्ये देखील महिलांचे प्रमाण लक्षणीय होते, असे त्यांनी सांगितले.
“गेल्या नऊ दिवसांत, इफफीमध्ये 35,000 मिनिटांच्या पाहण्याचा कालावधी असलेल्या 282 चित्रपट दाखवण्यात आले. महोत्सवात जगभरातील 78 देशांतील 65 आंतरराष्ट्रीय आणि 15 भारतीय भाषांमधील 183 आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि 97 भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. 20 हून अधिक मास्टरक्लासेस, संभाषण सत्रे आणि सेलिब्रिटी इव्हेंट्स या महोत्सवात झाल्या. त्यापैकी अनेक कार्यक्रम केवळ प्रत्यक्षच नव्हे तर आभासी डिजिटल स्वरूपातही उपलब्ध होते,” असे अनुराग ठाकूर म्हणाले. महोत्सवात दाखवण्यात आलेली विविधता ही ‘वसुधैव कुटुंबकम’ चे जिवंत स्वरूप आहे असं सांगत, या महोत्सवाने जगभरातील सर्जनशील विचारवंत, चित्रपट निर्माते, सिनेप्रेमी आणि सांस्कृतिक रसिकांना एकाच छताखाली एकत्र आणले, अशी भावना ठाकूर यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, गोवा विधानसभेचे सदस्य, इफ्फी सुकाणू समितीचे सदस्य आणि ज्युरी सदस्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि अभिनेत्री खुशबू सुंदर हेही उपस्थित होते.
प्रादेशिक चित्रपट आता केवळ प्रादेशिक राहिलेला नाही केंद्रीय मंत्री माहिती आणि प्रसारण मंत्री
प्रादेशिक सिनेमांवर भर देण्याच्या आणि त्याच्या वाढीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. प्रादेशिक सिनेमा आता प्रादेशिक राहिलेला नाही, तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे, असेही ते म्हणाले. “या वर्षी आम्ही आरआरआर, केजीएफ आणि इतर सारख्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतांना पाहिले आहे. अलीकडेच, आमच्याकडे बांगलादेश आणि मध्य आशियातील 80 हून अधिक तरुणांचा समावेश असलेले शिष्टमंडळ आले होते. त्यांना फक्त हिंदी चित्रपट गाणी आणि प्रादेशिक चित्रपट गाणी ऐकायची होती. त्यांनी मिधुन चक्रवर्तीपासून ते अक्षय कुमार आणि चिरंजीवीपर्यंतच्या चित्रपटांबद्दल चर्चा केली, या सगळ्या कलाकारांनी आता प्रदेश, देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. . चित्रपटांमध्ये सशक्त आशय असेल तर, ते सहजपणे सर्वदूर पोहचतात आणि त्यांचं भरपूर कौतुकही होतं,” असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.
इफ्फी महोत्सव हा भारताचा महान राजदूत : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
इफ्फी महोत्सव हा भारताचा महान राजदूत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. ब्रँड गोवा आणि ब्रँड इफ्फी यांना एकरूप करणाऱ्या या महोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
निसर्गरम्य वातावरण, अलौकिक निसर्ग सौन्दर्य आणि आदरातिथ्य करणारे नागरिक यामुळे संपूर्ण गोवा राज्य हे एक चित्रनगरी बनलेले आहे, गोव्यातील माणसे कला, संस्कृती आणि संगीतावर प्रेम करतात, गोवा हे एक अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्यामुळे गोवा राज्याने पाककृती, भाषा आणि जीवनशैलीतील विविधतेसह एक वैश्विक दृष्टीकोन प्राप्त केला आहे, असे ते म्हणाले.
या महोत्सवात दिव्यांगजनांसाठी चित्रपट प्रदर्शन करण्याच्या हेतूने विशेष सोय करता आली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या वर्षी महोत्सवात 12,000 हून अधिक नोंदणीकृत सदस्य सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा आता सभा, संमेलने , परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठीचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून देखील नावारूपाला येत आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात गोव्यात होणाऱ्या G20 शिखर परिषद, जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि पर्पल फेस्ट यासारख्या जागतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी त्यांनी सर्वांना आमंत्रण दिले.
इफ्फी महोत्सवाच्या समारोप समारंभात उपस्थित असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आशा पारेख, अक्षय कुमार, प्रसेनजीत चॅटर्जी, आयुष्मान खुराना, ईशा गुप्ता, मानुषी छिल्लर आणि शर्मन जोशी यांचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
'फाऊदा'
या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली नेटफ्लिक्स या मंचावरील इस्रायली दूरचित्रवाणी मालिका 'फाऊदा' मधील कलाकारांचा माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मालिकेचे निर्माते लिओर रॅझ आणि कार्यकारी निर्माते अवि इस्साचारोफ यांनी इस्त्राईलच्या संरक्षण दलातील त्यांच्या अनुभवांवर आधारित ही मालिका तयार केली आहे.
'फाऊदा' मालिकेच्या चौथ्या आवृत्तीचा प्रीमियर शो रविवारी इफ्फी महोत्सवात झळकणं हा एक मोठा सन्मान आहे असे अवि इस्साचारोफ यांनी सांगितले. भारतातील प्रेक्षक ही मालिका बघतात आणि ती त्यांना आवडते हे पाहून अतिशय आनंद होत आहे तसेच त्यायोगे भारतीयांशी आपले ऋणानुबंध जोडले गेले आहेत, असे लिओर रॅझ म्हणाले.
"आम्ही इस्रायली लोक भारतीय चित्रपट उद्योगाच्या प्रेरणेनेच मोठे झाले आहोत".असे इस्रायलचे भारतातील राजदूत नॉर गिलॉन म्हणाले, भारताच्या तुलनेत इस्रायलचा चित्रपट उद्योग खूपच लहान आहे. 'फाऊदा' सारख्या इस्रायली मालिका भारतीय लोक आवडीने बघतात हे पाहून आम्हाला अतिशय कृतज्ञ वाटत असून , इस्रायली लोक देखील भारतीय चित्रपटांमधील वैविध्यतेचा आनंद घेतात, असेही ते म्हणाले.
‘द वन अँड ओन्ली रे’ ऑनलाइन पोस्टर डिझाइन स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा
या समारंभात , प्रतिभावंत चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यावरील ‘द वन अँड ओन्ली रे’ नावाच्या ऑनलाइन पोस्टर डिझाइन स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आणि विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला, ज्युरींना 635 प्रवेशिका मिळाल्या आणि त्यापैकी 75 पोस्टर्स आणि तीन विजेते निवडण्यात आले. शायक दास याने प्रथम पारितोषिक पटकावले. दुसरा आणि तिसरा क्रमांक वरद गोडबोले आणि अनिरुद्ध चॅटर्जी यांना मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे एक लाख, पंचाहत्तर हजार आणि पन्नास हजार रुपयांची रोख पारितोषिके मिळाली.
गोव्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सहसचिव (चित्रपट विभाग) प्रितुल कुमार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ( एन एफ डी सी ) चे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर यांनी तांत्रिक भागीदार क्युब सिनेमाज , सिनिओनिक , पुल्ज इलेक्ट्रॉनिक्स आणि सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनिअर्स यांचा सत्कार केला.
इफ्फी 53 महोत्सवाचे ठळक वैशिष्टे
सुप्रसिद्ध स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक, कार्लोस सौरा यांचा 53 व्या इफ्फीमध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
सुप्रसिद्ध स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक, कार्लोस सौरा यांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सध्या आपण अस्थम्याच्या आजारातून बरे होत असल्याने या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही असे त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले. त्यांची कन्या अॅना सौरा यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या सन्मानासाठी निवड केल्याबद्दल महोत्सवाच्या आयोजकांप्रती त्यांनी अपार कृतज्ञता आणि स्नेह व्यक्त केला.
कार्लोस सौरा याना बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘डेप्रिसा डेप्रिसा’चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी गोल्डन बेअर पुरस्कार मिळाला आहे. ‘ला काझा’ आणि ‘पेपरमिंट फ्रॅपे’साठी दोन सिल्व्हर बेअर, ‘कारमेन’साठी बाफ्टा आणि कानमधील तीन पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
‘53 व्या इफ्फी मध्ये '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' अर्थात “उद्याचे 75 सृजनशील कलावंत” या स्पर्धेत 53 तासांचे आव्हान पूर्ण
18 – 35 वयोगटातील 75 युवायुवतींनी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीच्या 53 व्या आवृत्तीत केंद्र सरकारच्या '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' अर्थात “उद्याचे 75 सृजनशील कलावंत” या स्पर्धेत विशेष अतिथी म्हणून भाग घेतला, देशातील उद्याचे कल्पक आणि सर्जनशील सिनेमॅटिक प्रतिभावंत भारतातील 19 वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले आहेत. निवडलेल्या विजेत्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे, त्यानंतर तामिळनाडू आणि दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.
या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेते हरियाणातील 18 वर्षीय नितीश वर्मा आणि महाराष्ट्रातील 18 वर्षीय तौफिक मंडल आहेत, संगीत रचनामधील त्यांच्या कौशल्यामुळे या दोघांची निवड झाली आहे.
या 75 तरुणांनी इफ्फी 53 मध्ये 53-तासांच्या आव्हानातही भाग घेतला. स्पर्धेअंतर्गत त्यांना त्यांच्या कल्पनेनुसार 53 तासांत भारत@100 या लघुपटाची निर्मिती करण्याचे आव्हान देण्यात आले. इफ्फी 53 चा हा विभाग शॉर्ट्स टीव्हीच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला.
एफटीआयआय द्वारा आयोजित चित्रपट तंत्रज्ञान प्रदर्शनात चित्रपट उद्योगातील नव्या संधींचा शोध घेणारे तंत्रज्ञान
इफ्फी 2022 चा एक भाग म्हणून भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेद्वारे तंत्रज्ञान आणि चित्रपट कला/सिनेमा आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित विविध घटकांची ओळख करून देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 53 व्या इफ्फी मधील या प्रदर्शनात मनोरंजन तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या घडामोडींची माहिती देण्यात आली होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या चित्रपट रसिकांना चित्रपट कला आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित तंत्रज्ञानाचा परस्पर संबंध उलगडून दाखवण्यात आला तसेच हे विविध घटक एकत्र येऊन प्रेक्षकांचा अनुभव कसा समृद्ध करतात याची माहिती देण्यात आली. सोनी, कॅनन, रेड, लेईका , अल्टास, डीझेडओ, एप्युचर लाइट्स, हंसा सिने इक्विपमेंट यासारखे सिनेमा उपकरणांचे प्रमुख उत्पादक या प्रदर्शनात सहभागी झाले होते. या प्रदर्शनात अत्याधुनिक उपकरणे देखील मांडण्यात आली होती , ज्यांचा वापर येथील तज्ञ समकालीन सिनेमा निर्मितीमध्ये करत आहेत.
केंद्रीय संचार ब्युरोच्या इफ्फी मधील प्रदर्शनात चित्रपटांमधील स्वातंत्र्य चळवळीचे घडवले दर्शन
केंद्रीय संचार ब्युरो ने " स्वातंत्र्य चळवळ आणि चित्रपट" या संकल्पनेवर आधारित मल्टी-मीडिया डिजिटल प्रदर्शनाचे आयोजन केले होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ' या संकल्पनेच्या धर्तीवर कॅमेरा लेन्सच्या रूपात एक पैलू उलगडून दाखवला आहे. एका मोठ्या 12 x 10 फूट एलईडी स्क्रीनवर लोकप्रिय दूरदर्शन मालिका 'स्वराज' ची झलक दाखवली गेली , ज्यामध्ये वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या विविध स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन आणि योगदान यांचे चित्रण केले आहे.1857 चा उठाव , राजा राम मोहन रॉय, नेताजी सुभाषचंद्र बोस, कालापानी, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दुर्मिळ फुटेज दाखवण्यात आले.
मणिपुरी सिनेमाची 50 गौरवशाली वर्षे इफ्फी 53 मध्ये साजरी
ईशान्य भारतातील आठ भगिनींपैकी एक ‘भारताचे मौल्यवान राज्य ’ असलेल्या मणिपूरने 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ईशान्य भारतातील चित्रपटांच्या प्रचाराचे नेतृत्व केलं. मणिपुरी सिनेमाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी इफ्फी 53 मध्ये इंडियन पॅनोरमा विभागामध्ये मणिपूर राज्य चित्रपट विकास सोसायटीतर्फे पाच फिचर आणि पाच नॉन-फिचर चित्रपट सादर प्रदर्शित करण्यात आले.
चित्रपटांचा भव्य प्रीमियर
इफ्फीने प्रथमच, भारतीय चित्रपट, परदेशी चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मूळ मालिकांच्या भव्य प्रीमियरचे आयोजन केले होते, यावेळी सिनेमा स्टार्स आपापल्या चित्रपटांना विशेष समर्थन देण्यासाठी गोव्यात जमले होते. इफ्फीमध्ये परेश रावलचा 'द स्टोरीटेलर', अजय देवगण आणि तब्बूचा 'दृश्यम 2', वरुण धवन आणि क्रिती सेनॉनचा ‘भेडिया’ आणि यामी गौतमचा ‘लॉस्ट’, तेलुगु चित्रपट ‘रेमो’, दीप्ती नवल आणि कल्की कोचलिनचा ‘गोल्डफिश’ आणि रणदीप हुडा आणि इलियाना डी'क्रूझचा ‘तेरा क्या होगा लव्हली’ यांचा प्रीमिअर झाला. तसेच ‘वधंधी’, ‘खाकी’ आणि ‘फाउदा’ सीझन 4 सारख्या ओटीटी शोचा भाग दाखवण्यात आला.
कान , बर्लिन, टोरंटो आणि व्हेनिस यांसारख्या जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार जिंकलेले चित्रपट प्रमुख आकर्षण होते.
यातले काही ऑस्कर विजेत्यांनी दिग्दर्शित किंवा अभिनित चित्रपट होते. या चित्रपटांमध्ये पार्क-चान वूक यांचा ‘डिसीजन टू लीव’ आणि रुबेन ओस्टलुंड यांचा ‘ट्राएंगल ऑफ सैडनेस’, डैरेन ओरोनोफ्स्कीचा ‘द व्हेल’ आणि गिलर्मो डेल टोरो चा ‘पिनोकियो’, क्लेयर डेनिसचा ‘बोद साइड्स ऑफ द ब्लेड’ आणि गाय डेविडी यांचा ‘इनोसेंस’, एलिस डिओपचा ‘सेंट ओमर’ आणि मरियम तौज़ानी चा ‘द ब्लू काफ्तान’ यांचा समावेश होता.
'कंट्री ऑफ फोकस'
यावर्षी इफ्फिचा केंद्रबिंदू देश अर्थात 'कंट्री ऑफ फोकस' फ्रान्स हा होता. त्यानिमित्ताने या पॅकेज अंतर्गत फ्रान्समधील आठ चित्रपट प्रदर्शित करण्यात आले , यात इमॅन्युएल केयरे यांचा बिटवीन टू वर्ल्ड्स’ (ऑस्ट्रेहैम) प्रदर्शित करण्यात आला.
आदरांजली विभाग: गतकाळातील महान व्यक्तींचा सन्मान
इफ्फी 53 च्या ‘होमेज’ विभागात पंधरा भारतीय आणि पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश होता. भारतरत्न लता मंगेशकर, गायक-संगीतकार बप्पी लाहिरी, कथ्थक वादक पं. बिरजू महाराज, अभिनेते रमेश देव आणि महेश्वरी अम्मा, गायक केके, दिग्दर्शक तरुण, आसामी अभिनेता निपोन दास आणि नाट्य कलाकार मजुमदार आणि गायक भूपिंदर सिंग. यांना आदरांजली वाहण्यात आली. तर आंतरराष्ट्रीय विभागात, बॉब राफेल्सन, इव्हान रीटमन, पीटर बोगदानोविच, डग्लस ट्रंबेल आणि मोनिका विट्टी यांना आदरांजली वाहण्यात आली.
फिल्म बाजार
‘फिल्म बाजार’ अंतर्गत विविध विभागांमध्ये काही उत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपट निर्माते यांना प्रदर्शित करण्यात आले. इफ्फी मध्ये प्रथमच ‘मार्शे डु कान’ सारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारांच्या धर्तीवर पॅव्हेलियन तयार करण्यात आले. यावर्षी एकूण 42 पॅव्हेलियन तयार करण्यात आले, ज्यामध्ये विविध राज्य सरकारे, सहभागी देश, उद्योग क्षेत्रातील लोक आणि मंत्रालयाच्या माध्यम युनिट्सची चित्रपट कार्यालये होती.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) द्वारा निर्मित आणि आयोजित फिल्म बाजार 2007 मधील छोटेखानी सुरुवातीनंतर आता दक्षिण आशियाची जागतिक चित्रपट बाजारपेठ बनला आहे. दरवर्षी यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहभाग वाढला आहे.
पाच दिवसांच्या कालावधीत, फिल्म बाजार जगभरातील चित्रपट खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी एकत्र येण्याचे ठिकाण बनला आहे. चित्रपट निर्मिती आणि वितरणामध्ये दक्षिण आशियाई आशय आणि प्रतिभेचा शोध, सहाय्य आणि प्रदर्शन यावर यामध्ये लक्ष केंद्रित आहे. फिल्म बझार दक्षिण आशियाई प्रदेशात जागतिक सिनेमांची विक्री देखील सुलभ करतो.
'बुक्स टू बॉक्स ऑफिस'
एक नवीन पुस्तक रूपांतर उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पुस्तकांमध्ये छापून आलेल्या उत्तम कथा आणि पुस्तकांचे रुपांतर करून त्यावर आधारित चांगले चित्रपट निर्माण करून चांगल्या चित्रपटांची उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने 'बुक्स टू बॉक्स ऑफिस' सुरू करण्यात आला आहे. स्क्रीन कंटेंटमध्ये रुपांतरीत होऊ शकणाऱ्या पुस्तकांचे हक्क विकण्यासाठी काही आघाडीचे प्रकाशक देखील उपस्थित होते.
मास्टरक्लासेस' आणि 'इन कन्व्हर्सेशन ' सत्रे
इफ्फी 53 मध्ये 20 हून अधिक 'मास्टरक्लास' आणि 'इन कॉन्व्हर्सेशन' सत्रे झाली, ज्यात आशा पारेख, व्ही. विजयेंद्र प्रसाद, ए आर रहमान, ए. श्रीकर प्रसाद, अनुपम खेर, प्रसून जोशी, आनंद एल राय, आर बाल्की, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
इफ्फी 53 मध्ये दिव्यांगांसाठी (दिव्यांगजन) उत्तम सुविधा
इफ्फी 53 मध्ये दिव्यांग (दिव्यांगजन) चित्रपट रसिकांसाठी महोत्सव अधिक समावेशक आणि सुगम्य बनवण्यासाठी दिव्यांगजनांसाठी विशेष विभाग आणि विशेष शैक्षणिक सत्रे आयोजित केली होती. या विभागात, दिव्यांग प्रेक्षकांसाठी चित्रपट प्रदर्शन आणि या ठिकाणच्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत सुगम्यता संबंधित त्यांच्या गरजा लक्षात घेऊन समर्पित स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.
या विभागातील चित्रपटांमध्ये सबटायटल्स, तसेच ऑडिओ वर्णन समाविष्ट केले होते. ऑडिओ वर्णन साठी खास ऑडिओ ट्रॅक तयार केले गेले , ज्यातून त्यांना चित्रपटातील दृश्यांची माहिती सांगता येईल. तसेच रिचर्ड अॅटनबरोचा ऑस्कर विजेता गांधी आणि अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित द स्टोरीटेलर सारख्या चित्रपटांचा प्रीमियर इफ्फी मध्ये ‘दिव्यांगजन’ विभागात झाला.
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/Radhika/Sushama/Bhakti/Preeti/Darshana
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879747)
Visitor Counter : 742