माहिती आणि प्रसारण मंत्रालय
53 व्या इफ्फी मध्ये ‘इन-कन्वर्सेशन' या सत्रात दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या आशा पारेख सहभागी
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2022
वर्ष 2020 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झाल्याचा अनुभव सांगताना ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख म्हणाल्या की, प्रदीर्घ काळानंतर एका महिलेला हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्चर्य आणि आनंद व्यक्त करत त्या म्हणाल्या , “हा पुरस्कार मिळवणारी मी पहिली गुजराती देखील आहे. ही माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट होती, मात्र 2 दिवस माझे मन ते मानायला तयार नव्हते. मी सर्वप्रथम देवाचे आभार मानले कारण माझ्यासाठी हा खूप मोठा सुखद धक्का होता”. गोव्यात 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इन-कन्वर्सेशन' या सत्रात आशा पारेख आज बोलत होत्या.
आशा पारेख यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2020 वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतातील चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
गोव्यात 53 व्या इफ्फीमध्ये "इन-कन्वर्सेशन' या सत्रात चित्रपट अभिनेत्री आशा पारेख बोलत आहेत
या सत्रामध्ये , आशा पारेख यांनी 'कटि पतंग', 'तीसरी मंझिल', 'दो बदन', 'मैं तुलसी तेरे आंगन की', 'बहारों के सपने' यासारख्या विविध चित्रपटांमध्ये काम करतानाचा अनुभव सांगितला.
अभिनयाव्यतिरिक्त, टीव्ही मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मितीमधील कारकीर्द याबद्दल देखील त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की ज्योती ही गुजराती मालिका यशस्वी ठरल्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला. यातूनच त्यांना आणखी टीव्ही मालिका करायला प्रेरणा मिळाली. कोरा कागज या लोकप्रिय मालिकेव्यतिरिक्त आशा पारेख यांनी निर्मिती केलेल्या छोट्या पडद्यावरील अन्य मालिकांमध्ये 'बाजे पायल', 'दाल में काला' आणि 'कुछ पल' साथ तुम्हारा यांचा समावेश आहे.
गोव्यात 53 व्या इफ्फीमध्ये "इन-कन्वर्सेशन' या सत्रात अभिनेत्री आशा पारेख आणि सूत्रसंचालक भावना सोमय्या
आशा पारेख यांनी चित्रपट उद्योगाशी संबंधित विविध संस्था आणि संघटनांशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल सांगितले. 1994 ते 2000 या काळात त्या सिने आर्टिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. 1998-2001 या काळात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड) च्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, त्यांनी सिने आणि टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) च्या खजिनदार म्हणून देखील काम केले आहे.
आशा पारेख एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती आणि एक कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्यांनी 'दिल देके देखो' चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून पदार्पण केले आणि 95 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 'कटी पतंग', 'तीसरी मंझिल', 'लव्ह इन टोकियो', 'आया सावन झूम के', 'आन मिलो सजना', 'मेरा गाव मेरा देश' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879398)
Visitor Counter : 281