माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘छू मेद ना यूल मेद’ (नो वॉटर, नो व्हिलेज) हा मुनमुन धलारिया यांचा चित्रपट, हवामान बदलाचे हिमालयातील अतिउंचावरच्या गावांवर झालेले परिणाम दाखवतो
गोवा/मुंबई, 26 नोव्हेंबर 2022
‘छू मेद ना यूल मेद’ हा चित्रपट म्हणजे ‘व्हॉईसेस फ्रॉम द रुफ ऑफ द वर्ल्ड’ या दहा भागांच्या चित्रपटांच्या मालिकेतील भारतावर आधारित भाग आहे. गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागामध्ये या चित्रपटाचा प्रीमियर सादर झाला. 53 व्या इफ्फीमध्ये पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या संभाषणात्मक कार्यक्रमात प्रसार माध्यमे तसेच महोत्सव आयोजकांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना चित्रपटाच्या दिग्दर्शक मुनमुन धलारिया यांनी या चित्रपटाबाबत त्यांची संकल्पना आणि निर्मितीमागील अभियानाची विस्तृत माहिती दिली. हवामान बदलाची समस्या जगातील प्रत्येकावर कसा प्रभाव टाकते आहे हे चित्रपटात आपल्याला दिसते.
या चित्रपटाच्या ‘छू मेद ना यूल मेद’ या लडाखी भाषेतील शीर्षकाचा इंग्रजीत ‘नो वॉटर, नो व्हिलेज’ असा अर्थ आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून, दिग्दर्शक हिमाचल प्रदेशातील ‘स्पिती’ आणि लडाखमधील ‘झंस्कार’ या कृषीप्रधान गावांसमोर उभ्या ठाकलेल्या पाण्याच्या समस्येचा शोध घेते.
या चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणेबाबत अधिक माहिती देताना दिग्दर्शक मुनमुन धलारिया म्हणाल्या की त्या वन्यजीवांवर आधारित चित्रपट तयार करतात आणि हिमालयातील अतिउंचीवरील भागात आढळणाऱ्या वन्यजीवांचे त्यांना आकर्षण आहे. “मी मूळची हिमाचल प्रदेशातील रहिवासी आहे आणि गेल्या 7 वर्षांपासून स्पिती व्हॅलीला भेट देत आहे. तेथे उण्या 20 डिग्री सेल्सियसमध्ये राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यावरून मला या चित्रपटाची कल्पना सुचली. “जसजशी मी स्पितीला जाऊ लागले आणि तेथील समुदायात राहू लागले तसतशी मला हवामान बदल ही किती खरी गोष्ट आहे याची कल्पना येत गेली,” त्या म्हणाल्या. त्यांनी तेथील अनियमित बर्फवृष्टी आणि वितळणाऱ्या हिमकड्यांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांचा हिमालयातील अतिउंचीवरील गावांतल्या शेतकरी समुदायांवर कसा दुष्परिणाम होतो आहे याची नोंद ठेवत आहेत.
त्यांच्या कार्याविषयी विस्ताराने सांगताना दिग्दर्शक म्हणाल्या, “युरोपमध्ये राहणारा आणि ‘व्हॉईसेस फ्रॉम द रुफ ऑफ द वर्ल्ड’ या दहा भागांच्या चित्रपटांच्या मालिकेसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम करणारा अँड्रयू माझ्याकडे आला आणि या मालिकेतील भारतावर आधारित भागाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. या मालिकेचे निर्माते येथे येऊ शकत नाहीत करण ते या मालिकेच्या दुसऱ्या भागाच्या निर्मितीकार्यात गढलेले आहेत.आम्ही इतर देशांमध्ये देखील या चित्रपटाचे राष्ट्रीय प्रसारण करणार आहोत कारण हवामान बदल देशांच्या सीमा पाहून दुष्परिणाम घडवत नाही.आम्ही रशिया किरगीझस्तान,पाकिस्तान येथे देखील चित्रपट दाखवणार आहोत. मला सर्व भारतीय प्रेक्षकांनी, विशेषतः हिमाचल,उत्तराखंड आणि दिल्लीच्या वरच्या भागातील लोकांनी हा चित्रपट पाहावा अशी तीव्र इच्छा आहे कारण हे लोक हवामान बदलाच्या समस्येमुळे थेट प्रभावित झाले आहेत."
आपल्या पुढील योजनेबाबत सांगताना, दिग्दर्शक मुनमुन धलारिया म्हणाल्या, “आम्हांला या मालिकेचा तिसरा मोसम संपूर्णपणे भारतावर आधारित अशा प्रकारचा करायचा आहे कारण आपल्याकडे सांगण्यासारख्या खूप कथा आहेत आणि इतर अनेक कथाकार आहेत.” मुनमुन धलारिया या विविध पुरस्कार प्राप्त चित्रपट निर्मात्या असून वन्यजीव संवर्धन, लिंगाधारित आणि मानवी हक्क या विषयांवरील त्यांचे चित्रपट सुप्रसिद्ध आहेत. त्यांचे चित्रपट नॅशनल जिओग्राफिक,हॉटस्टारआणि व्हाइस वर्ल्ड न्यूज यांच्या माध्यमातून देखील प्रदर्शित झाल्या आहेत.
हा चित्रपट, मध्य आशिया ते काराकोरम या भागातील पामीर आणि दक्षिण आशियातील हिमालयाच्या जगाचे छत म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि पृथ्वीची ध्रुवप्रदेशाखेरीज सर्वात मोठे बर्फाचे कोठार समजल्या जाणाऱ्या पर्वतरांगांवरील बर्फ हवामान बदलामुळे कशा प्रकारे वाढत्या वेगाने वितळत आहे हे दाखवतो. या अतिउंचीवरील प्रदेशात सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्यामुळे तेथील लाखो लोकांचे जीवन कशा प्रकारे धोक्यात आले आहे ते दाखवतो. मानवजातीचा मोठा भाग या पर्वतांवर अवलंबून आहे आणि आशियातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी काही नद्या या पर्वतांमध्ये उगम पावतात.
The season 1 episode links: https://www.aku.edu/vrw/Pages/season-one.aspx
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
Follow us on social media:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879221)
Visitor Counter : 180