माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

‘सोल्स जर्नी’ हा चित्रपट मूल गमावलेल्या मातेच्या वेदना आणि आघात यांचे दर्शन घडवतो


माणसे म्हणजे केवळ एक संख्या नव्हे तर सन्माननीय जिवंत व्यक्ती असतात: दिग्दर्शक क्लॉडिया सायंते-लूस

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2022

 

माणसे म्हणजे केवळ एक संख्या नव्हे तर सन्माननीय जिवंत व्यक्ती असतात. पैसे कमावण्याच्या नादात समाजातील एक घटक हे सत्य विसरतो आणि अपहरण तसेच मानवी तस्करीसारखे जघन्य गुन्हे करतो. गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय पॅनोरमा विभागात सादर होणाऱ्या ‘सोल्स जर्नी’ या मेक्सिकन चित्रपटातून मेक्सिको देशातील मानवी तस्करीसारख्या अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला आहे.

‘इफ्फी टेबल टॉक्स’ कार्यक्रमाच्या आजच्या सत्राला संबोधित करताना, या चित्रपटाच्या दिग्दर्शक दिग्दर्शक क्लॉडिया सायंते-लूस म्हणाल्या की हा चित्रपट मानवी तस्करीसारख्या सर्रास घडणाऱ्या गुन्ह्यांवर आणि त्याच्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकतो.

“मेक्सिकोमध्ये, समाजातील एक वर्ग जिवंत माणसांची खरोखरीच किंमत करत नाही. ही समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की तेथे पाळीव प्राण्यांची किंमत देखील माणसांपेक्षा अधिक आहे. तेथील बहुतांश लोक त्यांच्या हरवलेल्या पाळीव प्राण्यांविषयी फार चिंतीत असतात आणि या प्राण्यांच्या पोस्टरच्या वाढत्या संख्येवरून ते दिसून येते.पण, गायब झालेल्या लोकांविषयी विशेषतः लहान मुलांविषयी कोणी काहीही चिंता करत नाही,"  त्या पुढे म्हणाल्या.

क्लॉडिया पुढे म्हणाल्या की हा चित्रपट ‘ख्रिस्तियन’ नावाच्या सात वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्यानंतर त्याच्या आईच्या मनावर झालेला मानसिक आघात आणि तिला झालेल्या वेदना दाखवतो. “हा चित्रपट समाजाची मानसिकता आणि न्याय व्यवस्थेतील कमतरता यांचे देखील दर्शन घडवतो,” त्यांनी अधिक माहिती देत सांगितले.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना, दिग्दर्शक म्हणाल्या की हा चित्रपट मूल गमावलेल्या मातेच्या असह्य नुकसानाची मानवी आणि व्यक्तिगत प्रतिमा उभी करतो.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना निर्माता ख्रिस्तियन क्रेगेल म्हणाले की आमच्या सहकाऱ्यांनी लहान मुलांच्या तस्करीच्या संवेदनशील समस्येचे दर्शन घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. “या चित्रपटामुळे समाजात काही बदल घडावा आणि संस्कृतीवर त्याचा उत्तम प्रभाव पडावा यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत,”  ते पुढे म्हणाले.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1879205) Visitor Counter : 189


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil