संरक्षण मंत्रालय
सर्वेक्षण जहाज(विशाल) प्रकल्पाच्या ‘इक्षक’ या तिसऱ्या जहाजाचे एल अँड टी कट्टुपल्ली येथे आज झाले जलावतरण
Posted On:
26 NOV 2022 5:28PM by PIB Mumbai
सर्वेक्षण जहाज प्रकल्प (विशाल) (एसव्हीएल) या जीआरएसई/एल अँड टी यांच्याकडून बांधणी होत असलेल्या चार सर्वेक्षण जहाज(विशाल) प्रकल्पाच्या ‘इक्षक’ या तिसऱ्या जहाजाचे आज चेन्नईमध्ये कट्टुपल्ली येथे जलावतरण झाले. या जहाजाने सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी झालेल्या जलावरण कार्यक्रमात पहिल्यांदा बंगालच्या उपसागराच्या पाण्यात प्रवेश केला. यावेळी दक्षिण नौदल कमांडचे प्रमुख ध्वजअधिकारी वाईस ऍडमिरल एमए हंफीहोली उपस्थित होते आणि नौदलाच्या परंपरेनुसार त्यांच्या पत्नी मधुमती हंफीहोली यांनी अथर्ववेदामधील मंत्रोच्चारांच्या घोषामध्ये या जहाजाचे जलावतरण केले. या जहाजाला इक्षक म्हणजे मार्गदर्शक असे नाव देण्यात आले आहे. सध्या सेवेत असलेल्या संधायक श्रेणीतील सर्वेक्षण जहाजांच्या जागी एसव्हीएल जहाजे तैनात करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये सागरशास्त्रीय माहिती गोळा करण्यासाठी अत्याधुनिक हायड्रोग्राफिक उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. हे सर्वेक्षण जहाज 110 मीटर लांब, 16 मीटर रुंद आणि 3400 टन वजनाचे असून त्यावर 231 कर्मचारी तैनात करण्याची क्षमता आहे.
चार सर्वेक्षण मोटर बोटी आणि एक एकात्मिक हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या जहाजाची बंदरांच्या आणि दिशादर्शक मार्गांजवळच्या संपूर्ण किनारपट्टीचे आणि खोल पाण्यातील सागरशास्त्रीय सर्वेक्षणाचे काम करण्याची प्राथमिक भूमिका आहे. त्याचबरोबर हे जहाज संरक्षण त्याचबरोबर नागरी उपयोजनासाठी सागरशास्त्रीय आणि भूभौतिक माहिती देखील गोळा करेल. आकस्मिक काळात रुग्णालय जहाज म्हणून काम करण्याबरोबरच मर्यादित स्वरुपात संरक्षणविषयक मोहिमांसाठी देखील काम करण्याची द्वितीयक भूमिका हे जहाज बजावू शकते.
तिसऱ्या सर्वेक्षण जहाजाच्या जलावतरणामुळे आपल्या पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया या दृष्टीकोनाचा भाग असलेल्या स्वदेशी बनावटीच्या जहाजबांधणीच्या संकल्पाला बळकटी मिळत आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाला चालना मिळत आहे. या सर्वेक्षण जहाजात स्वदेशी बनावटीच्या 80% सामग्रीचा वापर करण्यात आलेला आहे. या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामग्रीचे उत्पादन भारतीय उत्पादक उद्योगांकडून करण्याचा उद्देश साध्य होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि भारतामध्येच जहाजबांधणी करण्याच्या क्षमतेत वाढ होईल.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879118)
Visitor Counter : 365