पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

नवी दिल्ली येथे लचित बोरफुकन यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त वर्षभर चाललेल्या कार्यक्रमांच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 25 NOV 2022 11:23PM by PIB Mumbai

 

मोहान नायोक, लासिट बो्डफुकोनोर जी, सारि खो बोसोरिया, जोयोंती उपोलोख्ये, देखोर राजधानीलोई ओहा, आरू इयात, होमोबेतो हुवा, आपुनालूक होकोलुके, मूर आंतोरिक ऑभिबादोन, आरू, हेवा जोनाइसु.

आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, विधानसभेचे अध्यक्ष बिस्वजित, निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई, तपन कुमार गोगोई, आसाम सरकारचे मंत्री पिजूष हजारिका, संसद सदस्य आणि या कार्यक्रमात सहभागी असलेले आणि देश-विदेशातील आसामी संस्कृतीशी संबंधित सर्व मान्यवर.

सर्वप्रथम मी आसामच्या महान भूमीला वंदन  करतो, जिने भारत मातेला लचित बोरफुकन सारखे शूर वीर दिले. काल देशभरात वीर लचित बोरफुकन यांची 400 वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दिल्लीत 3 दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य आहे. मला सांगण्यात आले आहे की या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आसाममधूनही मोठ्या संख्येने लोक दिल्लीत आले आहेत. मी तुम्हा सर्वांचे, आसामच्या जनतेचे आणि 130 कोटी देशवासियांचे या निमित्ताने अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे, या काळात वीर लचित यांची 400 वी जयंती साजरी करण्याचे सौभाग्य आपणांस मिळाले आहे. हा ऐतिहासिक प्रसंग आसामच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे. भारताची अमर संस्कृती, अमर शौर्य आणि अमर अस्तित्व असलेल्या या महान परंपरेला मी प्रणाम करतो. गुलामगिरीच्या मानसिकतेचा त्याग करून आज आपला देश आपल्या वारशाचा अभिमान बाळगत आहे. आज भारत केवळ आपली सांस्कृतिक विविधता साजरी करत नाही, तर आपल्या संस्कृतीतील ऐतिहासिक नायक आणि नायिकांचेही अभिमानाने स्मरण करत आहे. लचित बोरफुकन सारखी महान व्यक्तिमत्वं, भारतमातेची अमर लेकरं, या अमृतकाळातील संकल्प पूर्ण करण्यासाठी आपली अखंड प्रेरणा, निरंतर प्रेरणा आहेत. त्यांच्या जीवनातून आपल्याला आपल्या अस्मितेची, आपल्या स्वाभिमानाची जाणीव होते आणि या राष्ट्रासाठी स्वतःला झोकून देण्याची ऊर्जाही मिळते. या शुभ प्रसंगी मी लचित बोरफुकन यांच्या महान शौर्याला व पराक्रमाला नमन करतो.

 

मित्रांनो,

मानवाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात जगातील कितीतरी संस्कृतींचा जन्म झाला. त्यांनी यशाच्या उत्तुंग शिखरांना स्पर्श केला. अशा संस्कृती देखील उदयाला आल्या, ज्यांना पाहून असे वाटले की त्या अमर आहेत, अजिंक्य आहेत. मात्र, काळाच्या कसोटीने अनेक संस्कृतीं नष्ट झाल्या, त्या लुप्त पावल्या. आज जग त्यांच्या अवशेषांवरून त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत आहे. पण, दुसरीकडे हा आपला महान भारत आहे. भूतकाळातील त्या अनपेक्षित वादळांचा आपण सामना केला. आपल्या पूर्वजांनी परदेशातून आलेल्या आक्रमकांच्या पाशवी क्रौर्याचा सामना केला आणि सहन केला. मात्र, भारत अजूनही त्याच चेतनेने, त्याच उर्जेसह आणि त्याच सांस्कृतिक अभिमानासह जिवंत आहे, अमरत्वासह जिवंत आहे. याचे कारण असे की, जेव्हा जेव्हा भारतावर कुठलेही संकट आले , कोणतेही आव्हान उभे राहिले, तेव्हा त्याला तोंड देण्यासाठी कोणत्या ना कोणत्या महान व्यक्तींनी अवतार घेतला आहे. आपली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी प्रत्येक कालखंडात संत आले, ऋषी-मुनी आले. भारत मातेच्या उदरातून जन्मलेल्या वीरांनी तलवारीच्या बळावर भारत चिरडून टाकू पाहणाऱ्या आक्रमकांशी जोरदार लढा दिला. लचित बोरफुकन हे देखील या देशाचे असेच शूर योद्धा होते. कट्टरता आणि दहशतीच्या परिसीमेचा अंत अटळ असतो आणि भारताची अमरज्योती, जीवन-ज्योती अमर आहे, हे त्यांनी दाखवून दिले.

 

मित्रांनो,

आसामचा इतिहास हा भारताच्या प्रवासाचा आणि संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. आपण वेगवेगळे  विचार-विचारप्रवाह, समाज-संस्कृती, श्रद्धा-परंपरा यांची एकमेकांशी सांगड घालतो. अहोम राजवटीत सर्वांना बरोबर घेऊन निर्माण केलेली शिवसागर शिव मंदिर, देवी  मंदिर आणि विष्णू मंदिर ही आजही त्याची उदाहरणे आहेत. परंतु, जर कोणी तलवारीच्या बळावर आपल्याला झुकवण्याचा प्रयत्न करत असेल, आपली शाश्वत ओळख बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे हे देखील आपल्याला माहित आहे. आसाम आणि ईशान्येची भूमी याची साक्षीदार आहे.

आसामच्या लोकांनी अनेक वेळा तुर्क, अफगाण, मुघल यांच्या आक्रमणांचा सामना केला आणि आक्रमण कर्त्यांना माघारी धाडले. सर्व शक्ती पणाला लावून मुघलांनी गुवाहाटी काबीज केले होते. मात्र, पुन्हा एकदा लचित बोरफुकन यांच्यासारखे योद्धे आले आणि त्यांनी गुवाहाटीला जुलमी मोगल राजवटीच्या जोखडातून मुक्त केले. औरंगजेबाने पराभवाचा तो कलंक पुसून टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तो नेहमीच  अपयशीच ठरला. वीर लचित  बोरफुकन यांनी दाखवलेले शौर्य, सराईघाटावर त्यांनी दाखवलेला पराक्रम हा मातृभूमीवरील अपार प्रेमाचा सर्वोच्च बिंदू होता. जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा आसामने आपल्या साम्राज्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तयार केले. त्यांचा प्रत्येक तरुण हा त्या भूमीचा सैनिक होता. लचित बोरफुकन यांच्यासारखे धाडस, त्यांच्यासारखा निर्भयपणा, हीच तर आसामची ओळख आहे. आणि म्हणूनच आपण आजही म्हणतो- हुनिसाने लोराहोत, लासितोर कोथा मुगोल बिजोयी बीर, इतिहाखे लिखा, म्हणजे मुलांनो, तुम्ही लचित यांची गोष्ट ऐकली आहे का? मुघलांवर विजय मिळवलेल्या या वीराचे नाव इतिहासात नोंदले आहे.

 

मित्रहो,

आपले हजारो वर्षांचे चैतन्य, आपल्या पराक्रमाचे सातत्य, हाच भारताचा इतिहास आहे. मात्र आपण लुटणारे -मारहाण करणारे लोक आहोत, हरणारे लोकं आहोत हेच आपल्याला सांगण्याचा वर्षानुवर्षे प्रयत्न करण्यात आला. भारताचा इतिहास हा केवळ गुलामगिरीचा इतिहास नाही. भारताचा इतिहास शूर वीरांचा इतिहास आहे, विजयाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास हा अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अतुलनीय शौर्य आणि पराक्रम दर्शवणारा इतिहास आहे.

भारताचा इतिहास विजयाचा आहे, भारताचा इतिहास युद्धाचा आहे, भारताचा इतिहास त्यागाचा आहे, तपाचा आहे, भारताचा इतिहास वीरतेचा आहे, बलिदानाचा आहे, महान परंपरांचा आहे. पण दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर आपल्याला तोच इतिहास शिकवण्यात आला जो गुलामीच्या कालखंडात, कारस्थानांसाठी तयार करण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर गरज होती ती आपल्याला गुलाम बनवून ठेवणाऱ्या परकीयांच्या धोरणांमध्ये बदल करण्याची. पण असे करण्यात आले नाही. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात भारतमातेचे वीर पुत्र-कन्यांनी कशा प्रकारे आतताई प्रवृत्तींचा मुकाबला केला, आपले जीवन समर्पित केले, त्या इतिहासाला जाणीवपूर्वक दाबून ठेवण्यात आले.

लचित बोरफूकन यांचे शौर्य महत्त्वाचे नव्हते कादेशाच्या संस्कृतीसाठी, देशाची ओळख टिकवण्यासाठी, मोगलांविरोधात युद्धात लढणाऱ्या आसामच्या हजारो लोकांच्या बलिदानाला काहीच अर्थ नव्हता का? आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की अत्याचारांनी भरलेल्या प्रदीर्घ कालखंडात अत्याचारांवरील विजयाच्या देखील हजारो गाथा आहेत, जय मिळवण्याच्या गाथा आहेत, त्यागाच्या गाथा आहेत, तर्पणाच्या गाथा आहेत. त्यांना इतिहासाच्या मुख्य प्रवाहात स्थान न देता पूर्वी ज्या चुका झाल्या होत्या, त्यामध्ये आता देश सुधारणा करत आहे. इथे दिल्लीत होत असलेले हे आयोजन त्याचेच प्रतिबिंब आहे. आणि मी हिमंता जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, या कार्यक्रमाचे दिल्लीमध्ये आयोजन केल्याबद्दल. वीर लचित बोरफुकन यांची शौर्य गाथा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आसाम सरकारने काही दिवसांपूर्वीच एक संग्रहालय बनवण्याची घोषणा केली आहे. मला असे सांगण्यात आले आहे की हिमंता जींच्या सरकारने आसामच्या ऐतिहासिक नायकांचा सन्मान करण्यासाठी एक स्मारक उभारण्याची देखील योजना तयार केली आहे. निश्चितच अशा प्रयत्नांनी आपली युवा पिढी आणि भावी पिढ्यांना भारताच्या महान संस्कृतीचे जास्त सखोल पद्धतीने आकलन करण्याची संधी मिळेल. आसाम सरकारने आपल्या दृष्टीकोनामध्ये प्रत्येक नागरिकाला सामावून घेण्यासाठी एका संकल्पना-गीताचा देखील शुभारंभ केला आहे. याचे बोल देखील अद्भुत आहेत. ओखोमोर आकाखोर, ओखोमोर आकाखोर, भूटातोरा तुमि, हाहाहोर होकोटि, पोरिभाखा तुमि, म्हणजे आसामच्या आकाशातील तुम्ही ध्रुवतारा आहात. साहसाची, शक्तीची तुम्ही व्याख्या आहात. खरोखरच, वीर लचित बोरफुकन यांचे जीवन आपल्याला देशासमोर निर्माण झालेल्या अनेक वर्तमान आव्हानांना निर्धाराने तोंड देण्याची प्रेरणा देते. त्यांचे जीवन आपल्याला, आपण व्यक्तिगत स्वार्थांना नव्हे तर देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, याची प्रेरणा देते. आपल्यासाठी घराणेशाही, भाऊबंदकी नव्हे तर देश सर्वात मोठा असला पाहिजे, याची प्रेरणा आपल्याला त्यांचे जीवन देत आहे. असे सांगितले जाते की राष्ट्र रक्षा करण्याची आपली जबाबदारी योग्य प्रकारे न सांभाळल्याबद्दल वीर लचित यांनी मौमाई यांना देखील शिक्षा केली होती. ते म्हणाले होते- देखोत कोई, मोमाई डांगोर नोहोय म्हणजे, मौमाई देशापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणजे असे म्हणू शकतो की कोणतीही व्यक्ती, कोणतेही नाते देशापेक्षा मोठे नसते. तुम्ही फक्त कल्पना करा की ज्यावेळी वीर लचित यांच्या सैन्याला हे कळले असेल की त्यांचा सेनापती देशाला किती प्राधान्य देतो, त्यावेळी त्या लहान सैनिकाचे मनोधैर्य देखील किती वाढले असेल. आणि मित्रहो हेच मनोधैर्य विजयाचा पाया ठरते. आज हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे की आजचा नवाभारत, राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्टच्या आदर्शावर पुढे वाटचाल करत आहे.

 

मित्रहो,

जेव्हा एखाद्या देशाला आपला भूतकाळ योग्य पद्धतीने माहीत असतो, योग्य इतिहासाची माहिती असते तेव्हाच तो आपल्या अनुभवातून देखील शिकतो. त्याला भविष्यासाठी योग्य दिशा मिळते. आपल्या इतिहासाच्या दृष्टीला केवळ काही दशके किंवा काही शतकांपर्यंत मर्यादित न ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मी आज आसामच्या प्रसिद्ध गीतकारांनी रचलेल्या आणि भारतरत्न भूपेन हजारिका यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताच्या दोन ओळी तुम्हाला ऐकवतो. यामध्ये असे म्हटले आहे- मोई लासिटे कोइसु, मोई लासिटे कोइसु, मुर होहोनाई नाम लुवा, लुइत पोरिया डेका डॉल। म्हणजे, मी लचित बोलत आहे, ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावरील युवांनो, माझे नाव पुन्हा पुन्हा घ्या. सातत्याने स्मरण करूनच आपण भावी पिढीला योग्य इतिहासाबद्दल परिचित करू शकतो. आता काही वेळापूर्वीच मी लचित बोरफुकन जींच्या जीवनावर आधारित एक प्रदर्शन पाहिले. खूपच प्रभावित करणारे होते, शिकवण देणारे होते. त्यासोबतच त्यांच्या शौर्यगाथेवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे भाग्य देखील मला लाभले. अशाच प्रकारच्या आयोजनांच्या माध्यमातून देशाचा खरा इतिहास आणि ऐतिहासिक घटनांशी देशातील प्रत्येक नागरिकाला परिचित करता येऊ शकेल.

 

मित्रहो,

ज्यावेळी मी हे पाहात होतो त्यावेळी माझ्या मनात एक विचार आला, आसामच्या आणि देशातील कलाकारांना एकत्र आणून आपण यावर विचार करू शकतो, जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित जाणता राजा नाट्यप्रयोग आहे. 250-300 कलाकार, हत्ती, घोडे सर्व काही या कार्यक्रमात असतात आणि अतिशय प्रभावी कार्यक्रम आहे. अशाच प्रकारचा नाट्य प्रयोग आपण लचित बोरफुकन यांच्यावर तयार केला पाहिजे आणि भारताच्या कानाकोपऱ्यात त्याचे प्रयोग केले पाहिजेत. एक भारत, श्रेष्ठ भारतचा जो संकल्प आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर बळ देतात. आपल्याला भारताला विकसित भारत बनवायचे आहे, ईशान्य भागाला भारताच्या सामर्थ्याचा केंद्रबिंदू बनवायचे आहे. वीर लचित बोरफुकन यांची 400वी जयंती आपल्या या सर्व संकल्पांना बळकट करेल आणि देश आपली लक्ष्ये साध्य करेल. याच भावनेसह मी पुन्हा एकदा आसाम सरकारचे, हिमंता जींचे, आसामच्या लोकांचे मनापासून आभार मानतो. या पवित्र समारंभात मला देखील पुण्य कमवण्याची संधी मिळाली. मी तुमचा खूप-खूप आभारी आहे.

धन्यवाद!

***

S.Tupe/S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879052) Visitor Counter : 152