माहिती आणि प्रसारण मंत्रालय
53 व्या इफ्फीमध्ये ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ श्रेणीत झेक चित्रपट ‘ऑर्डिनरी फेल्युअर्स’ प्रदर्शित
तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर, खरोखरच तुम्ही अयशस्वी होऊ शकत नाही: दिग्दर्शक क्रिस्टिना ग्रोसन
गोवा/मुंबई, 25 नोव्हेंबर 2022
“ऑर्डिनरी फेल्युअर्स’ (झेक चित्रपटाचे इंग्रजी नाव) बनवण्याची कल्पना कोविड 19 साथीच्या काळात फलित झाली. साथीच्या रोगाने लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे आम्हाला वास्तविकता आणि आमची पटकथा सोबतीने पाहण्यास मदत झाली”,असे मत चित्रपटाच्या दिग्दर्शिका क्रिस्टीना ग्रोसन यांनी व्यक्त केले.

पत्र सूचना कार्यालय तर्फे आज, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी गोव्यात चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘टेबल टॉक्स’ सत्रांपैकी एका सत्रात त्या प्रसारमाध्यमांशी आणि महोत्सवाच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होत्या. 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात काल ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ श्रेणीत ऑर्डिनरी फेल्युअर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
या चित्रपटाची कथा तीन स्त्रियांच्या अपूर्ण अस्तित्वाशी झुंज देणाऱ्या तीन स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत आहे. या स्त्रियांच्या दैनंदिन जीवनात एक विचित्र, नैसर्गिक घटना उद्भवते आणि त्यांना त्यांचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडते, अशी माहिती क्रिस्टिना ग्रोसन यांनी दिली.
आपण कलात्मक चित्रपट म्हणून ‘ऑर्डिनरी फेल्युअर्स’ वर्गीकरण करत असल्याचे चित्रपटाचे निर्माते मारेक नोवाक यांनी सांगितले. झेक प्रजासत्ताक तसेच युरोपमधील सध्याच्या चित्रपट सृष्टीची परिस्थिती अशा चित्रपटांना समर्थन देणारी असून जनता देखील त्याचे समर्थन करत आहे, असेही ते म्हणाले. हा चित्रपट झेक प्रजासत्ताक, हंगेरी, इटली आणि स्लोव्हाकिया या देशातून मिळालेल्या लोकनिधीद्वारे सह-निर्मित आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
स्त्री-पुरुष समानता आणि ओटीटीच्या काळात महिलांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांबद्दल विचारले असता, परिस्थिती हळूहळू सुधारत आहे असून महिलांना अधिक संधी मिळत आहेत असे क्रिस्टिना यांनी सांगितले. आपण चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात काम करुन आनंदी असून अधिकाधिक महिलांना चित्रपट सृष्टीत येण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
चित्रपटात केवळ महिलांना लक्ष्य केले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात क्रिस्टीना ग्रोसन म्हणाल्या की समाजाच्या एका विशिष्ट वर्गापेक्षा संपूर्ण समाजावर लक्ष्य केंद्रित करण्यावर मी भर दिला आहे. चेक प्रजासत्ताकामध्ये चित्रपट पाहणाऱ्या आणि उपभोक्ता संस्कृतीच्या पाईक या बहुसंख्य महिला असल्याचे चित्रपटाचे निर्माते नोवाक यांनी सांगितले.
युवा आणि प्रौढ प्रेक्षकांनी आपला चित्रपट योग्य प्रकारे स्विकारल्याबद्दल क्रिस्टीना ग्रोसन यांनी समाधान व्यक्त केले. 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात चित्रपट पाहणाऱ्या ज्येष्ठ प्रेक्षकांकडून अधिकाधिक प्रश्न आणि प्रतिक्रिया मिळाल्याबद्दल त्यांनी तिला आनंदयुक्त आश्चर्य व्यक्त केले.
ऑर्डिनरी फेल्युअर्स हे निकटच्या भविष्यात रचलेले एक आकर्षक नाट्य आहे. चित्रपटात असे दिसते की या पृथ्वीवरील वेळ संपणार आहे. त्यामुळे ही कथा तीन नायक व्यक्तीरेखांना थांबण्यास आणि स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहण्यास भाग पडते. या अशा तीन कथा आहेत ज्या एकमेकांना समांतर चालतात, पात्र त्यांच्या नशिबाला सापेक्ष शांततेने सामोरे जाताना दिसतात. पण या विचित्र, नैसर्गिक घटनांमधील संधी अनुभवत या व्यक्तीरेखा, जे जसे असायला हवे त्याप्रमाणे परत मिळवण्याची आणि आशा हरपत चाललेल्या जगात एक नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात.

चित्रपटाबद्दल विशेष माहिती
दिग्दर्शक: क्रिस्टीना ग्रोसन
निर्माता: मारेक नोवाक
पटकथा: क्लारा व्लास्कोव्हा
छायाचित्रण: मार्क ग्योरी
संपादक: ॲना मेलर
कलाकार: तात्जाना मेदवेका, बीटा कानोकोवा, नोरा क्लिमेसोवा, विका केरेकेस, ॲडम बेर्का, रोस्टिस्लाव नोवाक जूनियर, जना स्ट्रायकोवा, लुबोस वेसेली
सारांश
एक किशोरवयीन बाला, एक चिंताग्रस्त आई आणि नुकतीच विधवा झालेली एक स्त्री यांच्या दैनंदिन आयुष्यात एके दिवशी एका रहस्यमय नैसर्गिक घटनेमुळे मोठा व्यत्यय येतो. त्यांचे जग अनागोंदीने भरलेले असताना, या तिन्ही स्त्रिया जीवनात त्यांचे स्थान शोधण्यासाठी संघर्ष करतात.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878987)
Visitor Counter : 233