माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अखिल भारतीय चित्रपट या संकल्पनेवर माझा विश्वास नाही : 'सांस्कृतिक विविधतेचं प्रतिनिधीत्व आणि नव्या बाजारपेठांचा शोध' (रिप्रेझेंटींग कल्चरल डायव्हरसिटी अँड आयडेंटीफाईंग न्यू मार्केट्स) या विषयावरच्या मास्टर क्लासमध्ये दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी व्यक्त केलं मत


भारत हा कृषीप्रधान देश : आपल्या रुढी-पंरपरा, श्रद्धा आणि जिवनपद्धती ही कृषी क्षेत्रावर आधारलेली

सध्याच्या जगात मानव आणि निसर्गात सुरू असलेलं द्वंद्व कांतारा सिनेमात प्रतिबिंबीत

एखादा चित्रपट अधिक स्थानिकतेशी जोडलेला आणि तिथल्या मातीशी नाळ सांगणार असेल तर, असा सिनेमा जागतिक पातळीवरही स्विकारला जाण्याची सर्वाधिक संधी असते यावर आपला ठाम विश्वास असल्याचं केलं प्रतिपादन

Posted On: 24 NOV 2022 11:15PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2022

 

“भारत हा कृषीप्रधान देश आहे; आपल्या रुढी परंपरा, श्रद्धा आणि जीवनपद्धती ही शेतीवर आधारित आहेत, त्यामुळेच भारतातील प्रत्येक गावाची स्वतःची एक रुढी परंपरा आहे, आणि या सगळ्यातून आपल्या उपजीविकेचं रक्षण करणार्‍या नैसर्गिक देवतेवरचा विश्वास व्यक्त होत असतो”, दिग्दर्शक, अभिनेते, चित्रपट निर्माते ऋषभ शेट्टी यांनी म्हटलं आहे. ऋषभ शेट्टी आज गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात 'सांस्कृतिक विविधतेचं प्रतिनिधीत्व आणि नव्या बाजारपेठांचा शोध' (रिप्रेझेंटींग कल्चरल डायव्हरसिटी अँड आयडेंटीफाईंग न्यू मार्केट्स) या विषयावर टी त्यागराजन यांच्यासोबतच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते.

ऋषभ शेट्टी हे कन्नड सिने जगतातले अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. उलीदावरू कंदंथे, किरिक पार्टी, कथा संगम, रिकी असे अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या ‘सरकारी ही. प्र. शाले, कासारगोडू, कोडुगे: रामण्णा राय’ या चित्रपटाला ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला कांतारा या त्यांच्या नव्या सिनेमाला समीक्षकांकडूनही प्रचंड दाद मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडणाऱ्या, व्यावसायिक पातळीवरच्या या प्रचंड यशस्वी सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिकाही साकारली आहे.

चित्रपटांमधल्या सांस्कृतिक विविधतेच्या प्रतिनिधीत्वावरही शेट्टी यांनी आपली मतं मांडली. कांतारा या चित्रपटातून मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्षाच्या गाभ्याचं दर्शन होतं. हा चित्रपट निसर्ग, संस्कृती आणि कल्पनारम्यतेचं मिश्रण आहे, असं त्यांनी सांगितलं. आपल्या संस्कृती आणि रुढी परंपरा व्यवस्थेची मूळं आपल्या प्रत्येकामध्ये रुजलेली आहेत. कांतारा हा चित्रपट त्यांनी ऐकलेल्या लोककथा आणि तुलुनाडू संस्कृतीत बालपण जगताना आलेल्या अनुभवांतून सूचल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळेच त्यांना या चित्रपटाचं पार्श्वसंगीत संस्कृतीचं नैसर्गिक प्रतिबिंब उमटवणारं असायला हवं, असं वाटत होतं असं ते म्हणाले.

बालपणापासूनच्या आपल्या आवडीनिवडींबद्दल ऋषभ शेट्टी यांनी मनमोकळा संवाद साधला. लहानपणापासूनच ते यक्षगान कलाकार म्हणून काम करत होते, सिनेमा जगतात आल्यापासूनच कंबाळा, दैवराधने, भूत कोला या संस्कृतींचं चित्रपटांमधून दर्शन घडवावं अशी आपली तीव्र इच्छा होती असं त्यांनी सांगितलं. “तुलुनाडूमधल्या  दैवराधनेच्या काळात , आपण सर्व जाती एकसमान आहेत, या तत्वावर विश्वास व्यक्त करतो, ही प्रथा म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्यातला दूवा आहे”, असं मत त्यांनी व्यक्त केले.

कांतारा चित्रपटातल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आपण दररोज कंबालाचा सराव करत होतो, असा अनुभव त्यांनी सांगितला. प्रत्येकण आपल्या श्रद्धांना हृदयात स्थान देत असतो, त्यामुळे कोणत्याही सांस्कृतिक प्रथांची थट्टा करू नये, कारण असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

कांतारा या सिनेमात त्यांनी साकारलेल्या शिवा या भूमिकेबद्दलही त्यांनी आपले अनुभव आणि मतं मांडली. अशाप्रकारची भूमिका साकारायला मिळावी अशी लहानपणापासूनच इच्छा होती. कोविड महामारीत दुसऱ्यांदा लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्याला कांतारा सिनेमाची कल्पना सुचली. कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड या जिल्ह्यातल्या कुंदापुरा या आपल्या मूळ गावी हा संपूर्ण सिनेमा चित्रित केल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. या चित्रपटातले बहुतांश कलाकार हे नवे तसंच बंगळुरू आणि मंगलोर इथं नाटकांमधून काम करणारे कलाकार होते अशी माहिती त्यांनी दिली.

कांतारा सिनेमाच्या अखेरच्या दृश्यांमध्ये त्यांनी केलेल्या दमदार अभिनायाबद्दलही त्यांनी चर्चा केली. सिनेमाचा शेवट कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो, त्यामुळेच तो महत्वाचा असतो असं मत त्यांनी व्यक्त केलं.  निसर्ग, माणूस आणि आपला अंतरात्मा यांचं एकजीनसी सहअस्तित्व ही काळाची गरज आहे, हा संदेश कांतारा सिनेमा देतो असं ते म्हणाले.

नव्या बाजारपेठांच्या संधींबद्दलह शेट्टी यांनी मतं मांडली. अलिकडे तयार होणारे सिनेमे भाषेचा अडथळा ओलांडत आहेत, विविध भाषांमध्ये भारतीय चित्रपट येत आहेत आणि जर का चित्रपटाच्या आशयाला प्रेक्षकांशी जोडून घेता आलं, तर असे चित्रपट संपूर्ण भारतीय चित्रपट म्हणून स्वीकारले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर एखादा चित्रपट अधिक स्थानिकतेशी जोडलेला आणि तिथल्या मातीशी नाळ सांगणार असेल तर, असा सिनेमा जागतिक पातळीवरही स्विकारला जाण्याची सर्वाधिक संधी असते, सिने जगताच्या या मंत्रावर आपला विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.

90 च्या दशकाच्या उत्तरार्धातील प्रादेशिक चित्रपटांवर पाश्चात्य सिनेमांचा प्रभाव होता. पण आता चित्रपटकर्मी आपल्या सिनेमात स्थानिक संस्कृतीचा अंतर्भाव करू लागले आहेत, त्यामुळे सिनेमातलं वैविध्य, बहुरंगतता, चैतन्य आणि ज्वलंतताही वाढू लागली आहे, महत्वाचं म्हणजे या बदलाला प्रेक्षकांनीही स्विकारलं आहे असं ते म्हणाले. कांतारा सिनेमाच्या बाबतीतही असंच घडलं, हा सिनेमा आपल्या भाषेत नसतानाही, या चित्रपटातल्या आशयाशी प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे जोडून घेता आलं, म्हणूनच तो संपूर्ण भारतभरात  स्वीकारला गेला असं त्यांनी सांगितलं.

याआधी जगभरातले सिनेमे पाहण्यासाठी लोकांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची प्रतीक्षा करावी लागत होती, मात्र आज ओटीटी व्यासपीठांममुळे लोकांना त्यांना पाहायचा असलेला आशय कुठूनही आणि कोणत्याही वेळेला पाहण्याची सोय उपलब्ध झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ओटीटी व्यासपीठांमुळे आशयघन सीनेमांची उपलब्धता आणि त्याची पोहोच अनेक पटींनी वाढली आहे, यामुळे प्रेक्षकांसमोर त्यांच्या आवडीचे सिनेमे निवडण्यासाठी खूपच पर्यायही उपलब्ध झाले आहेत असं त्यांनी सांगितलं.

अभिनय आणि दिग्दर्शनातल्या त्यांच्या प्राधान्याविषयीदेखील त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अभिनयापेक्षा आपलं प्राधान्या दिग्दर्शनाला असल्याचं ते म्हणाले. आपण समाजाशी खोलवर जोडलेलो आहोत, आणि तिथूनच चित्रपटासाठीच्या कल्पना सूचत असतात असं ते म्हणाले.

निर्माता म्हणून चित्रपटासाठीच्या खर्चाची गरज ठरवताना आपण ती संहितेच्या आधारे ठरवतो असं त्यांनी सांगितलं. चित्रपटाची निर्मिती करत असताना सेट्स, चित्रिकरणाची ठिकाणं आणि इतर अनावश्यक बाबींवर खर्च करण्यापेक्षा चित्रपटाचा आशय जागतिक पातळीवर स्विकारला जाणारा असावा यावर आपला भर असल्याचं ते म्हणाले.

यंदाच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाअंतर्गतचे मास्टरक्लास आणि संभाषण सत्रांचं आयोजन सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) आणि गोवा मनोरंजन सोसायटी (ENTERTAINMENT SOCIETY OF GOA- ESG) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली गेली आहेत. याअंतर्गत यंदाच्या इफ्फीमध्ये मास्टरक्लास आणि संभाषण सत्रांची 23 सत्रे होत आहेत. विद्यार्थी आणि चित्रपट रसिकांना सिने जगताच्या विविध पैलुंशी जोडून घेण्यासाठी चालना देणं हा या आयोजनामागचा उद्देश आहे.

 

* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878890) Visitor Counter : 166