पंतप्रधान कार्यालय

शूरवीर लचित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त गेले वर्षभर साजऱ्या होत असलेल्या कार्यक्रमांचा पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे समारोप


पंतप्रधानांनी ‘लचित बोरफुकन – मुघलांना रोखणारे आसामचे शूरवीर’ या पुस्तकाचे प्रकाशन केले

“लचित बोरफुकन यांचे जीवन आपल्याला ‘राष्ट्र प्रथम’ या मंत्रानुसार जगण्याची प्रेरणा देते”

“लचित बोरफुकन यांचे जीवन आपल्याला शिकवते की, देश हा घराणेशाही आणि राजवंशापेक्षा देश सर्वोच्च स्थानी असला पाहिजे”

“संत आणि द्रष्टे यांनी अनंत काळापासून आपल्या देशाला मार्गदर्शन केले आहे”

“लचित बोरफुकन यांच्यासारख्या धाडसी वीरांनी आपल्याला दाखवून दिले आहे की, धर्मांधता आणि दहशतवाद या गोष्टी लयाला जातात आणि भारतीय जीवनधारणेचा अमर्त्य प्रकाश अनादि काळापर्यंत तेजाळतो”

“भारताचा इतिहास उदयोन्मुख विजयाचा इतिहास आहे, असंख्य महान वीरांच्या शौर्याचा इतिहास आहे”

“दुर्दैवाने, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील गुलामगिरीच्या काळातील कारस्थान म्हणून लिहिण्यात आलेला इतिहासच आपल्याला शिकवण्यात आला”

“जेव्हा देशाला त्याचा खरा भूतकाळ समजतो तेव्हाच तो त्या अनुभवापासून शिकू शकतो आणि भविष्यकाळ घडविण्यासाठी योग्य दिशा निवडतो. आपली इतिहासाची जाण केवळ काही दशके आणि शतके यांच्यापर्यंत सीमित न ठेवणे ही आपली जबाबदारी आहे”

Posted On: 25 NOV 2022 1:34PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त गेले वर्षभर सुरु असलेल्या सोहळ्याचा आज नवी दिल्ली येथे समारोप केला. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात लचित बोरफुकन मुघलांना रोखणारे आसामचे शूरवीरया पुस्तकाचे प्रकाशन देखील केले.

देशातील अनाम वीरांचा यथोचित पद्धतीने सन्मान करण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेला अनुसरून, लचित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त त्यांचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात आला. आसामच्या अहोम राजवंशातील रॉयल आर्मीमध्ये लोकप्रिय जनरल असलेले लचित बोरफुकन यांनी मुघलांचा पराभव करून, औरंगजेबाच्या अधिपत्याखालील मुघलांच्या राज्य विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेला लगाम घातला.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी लचित यांच्यासारख्या धाडसी सुपुत्रांना जन्म देणाऱ्या आसामच्या भूमिप्रती आदर व्यक्त करून भाषण सुरु केले. शूरवीर लचित बोरफुकन यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना वंदन करतो. आसामच्या संस्कृतीचे रक्षण करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, देश स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, याच काळात आपण लचित बोरफुकन यांची 400 वी जयंती साजरी करत आहोत. शूरवीर लचित यांच्या धैर्याला आसामच्या इतिहासातील वैभवशाली अध्याय संबोधत, पंतप्रधान म्हणाले, भारताची अनादि संस्कृती, शाश्वत धैर्य आणि अनंत काळापर्यंतच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करत असताना मी या थोर परंपरेला सलाम करतो. गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती मिळवण्याच्या तसेच भारतीय वारशाबाबत अभिमान बाळगण्याच्या भारताच्या निश्चयाचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत केवळ त्याच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करत नाही तर आपल्या इतिहासातील अनाम वीर आणि वीरांगनांच्या कार्याची आवर्जून दखल देखील घेत आहे. लचित बोरफुकन यांच्यासारखे भारतमातेचे अमर सुपुत्र म्हणजे अमृत काळातील निश्चय पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा आहेत. ते आपल्याला आपल्या इतिहासाची ओळख आणि वैभव यांच्याशी अवगत करतात आणि आपण देशाप्रती समर्पण करण्यासाठी दिशा देखील दाखवतात, पंतप्रधान पुढे म्हणाले.

हजारो वर्ष जुन्या मानवी अस्तित्वाच्या इतिहासात, या पृथ्वीवर असंख्य प्रकारच्या नागरी संस्कृती येऊन गेल्या, त्यापैकी अनेक कधीही नाहीशा होणार नाहीत असे वाटले होते मात्र तरीही कालचक्राच्या तडाख्याने त्यांना गुडघे टेकायला भाग पाडले, पंतप्रधानांनी सांगितले. इतर नागरी संस्कृती आणि भारत यांच्यातील फरकाकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की आज विश्व अशा नागरी संस्कृतींवर आधारित इतिहासाचे मूल्यमापन करते, पण भूतकाळात अनेक अनपेक्षित अडचणींना तोंड देऊन आणि परदेशी आक्रमकांच्या कल्पनातीत दहशतीतून मार्ग काढून भारत मात्र त्याच उर्जेसह आणि जाणीवेसह ताठ मानेने अजून उभा आहे. भारतावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा काही थोर व्यक्तिमत्त्वे त्यांना तोंड द्यायला उभी ठाकली, या सत्य परिस्थितीमुळे हे घडू शकले आहे. भारताची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी संत आणि विद्वान व्यक्ती पुढे आल्या. लचित बोरफुकन यांच्यासारख्या शूरवीरांनी आपल्याला दाखवून दिले की धर्मांधता आणि दहशतवाद या गोष्टी लयाला जातात आणि भारतीय जीवनधारणेचा अमर्त्य प्रकाश अनादि काळापर्यंत तेजाळतो, पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आसामच्या इतिहासावर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की हा इतिहास म्हणजे भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा मौल्यवान वारसा आहे. विचार आणि विचारधारा, समाज आणि संस्कृती तसेच विश्वास आणि परंपरा यांचा हा सुंदर मिलाफ आहे. आसाम आणि ईशान्येकडील भूमीतील अतुलनीय धाडसाबद्दल टिप्पणी करत पंतप्रधानांनी सांगितले की या भूमीने तुर्क, अफगाण आणि मुघल आक्रमकांना असंख्य वेळा पराभूत केले. मुघलांनी गुवाहाटीवर कब्जा केला असला तरी लचित बोरफुकन यांच्यासारख्या शुरांनी अत्याचारी मुघल शासकांच्या तावडीतून आपल्या भूमीला सोडवून स्वातंत्र्य मिळवून दिले. लचित बोरफुकन यांनी सराईघाट येथे गाजवलेले शौर्य म्हणजे केवळ मातृभूमीवर असलेल्या अतुलनीय प्रेमाचे उदाहरण नाही तर त्याचबरोबर गरज भासली तर प्रत्येक नागरिक मातृभूमीसाठी लढायला तयार होईल अशा पद्धतीने संपूर्ण आसाम प्रदेशाला एकत्र आणण्याचे त्यांचे सामर्थ्य देखील आहे. लचित बोरफुकन यांचे धाडस आणि निर्भयता ही आसामची ओळख आहे, पंतप्रधानांनी सांगितले.

भारताचा इतिहास हा केवळ गुलामगिरीचा इतिहास नाही तर भारताचा इतिहास हा विजयाचा इतिहास आहे, तो अगणित महापुरुषांच्या पराक्रमांचा इतिहास आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताचा इतिहास हा अभूतपूर्व शौर्य आणि धैर्याने जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचा आहे, दुर्दैवाने गुलामगिरीच्या काळात कटकारस्थानाने रचलेला इतिहास आपल्याला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील शिकवला गेलाआपल्याला गुलामगिरीच्या मानसिकतेत ढकलणाच्या उद्देशाने परकीयांनी  रचलेला इतिहास  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलणं आवश्यक होतं मात्र ते तसे घडले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देशाच्या प्रत्येक भागात जुलुमी राजवटीविरुद्ध पुकारलेल्या तीव्र लढ्याच्या कथा दडपल्या गेल्या. दडपशाहीच्या प्रदीर्घ कालावधीत जुलूमशाहीवर विजय मिळवण्याच्या अगणित कथा आहेत. या कथा समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न देण्याची चूक आता सुधारली जात आहे. आज दिल्लीत होत असलेला हा कार्यक्रम  देखील त्या बदलाचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या राज्यातील शूरवीरांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या आसाम सरकारचे, पंतप्रधानांनी अभिनंदन केले. आसाम मध्ये शूरवीरांच्या सन्मानार्थ   उभारलेले वस्तुसंग्रहालय आणि स्मारकाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रयत्नांमुळे भावी पिढीला त्याग आणि बलिदानाच्या इतिहासाची माहिती होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  लचित बोरफुकन यांचे जीवन आपल्याला 'राष्ट्र प्रथम' हा मंत्र जगण्याची प्रेरणा देते, असे पंतप्रधान म्हणाले, त्यांचे जीवन स्वतःपेक्षा राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची प्रेरणा देते, घराणेशाही, राजघराणे या सर्वांपेक्षा राष्ट्र सर्वश्रेष्ठ आहे, याची शिकवण त्यांच्या जीवनातून मिळते, असे पंतप्रधानांनी सांगितले. वीर लचित बोरफुकन यांच्या जीवनातील उदाहरणे घेऊन पंतप्रधान म्हणाले की, कोणतीही व्यक्ती किंवा नातेसंबंध राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ नाही.

जेव्हा राष्ट्राला आपल्या वास्तविक भूतकाळाचे ज्ञान असते, तेव्हाच ते येणाऱ्या अनुभवांवरून धडा घेऊन योग्य मार्गाने, भविष्याच्या दिशेने वाटचाल करते. "आपली इतिहासाबाबतची जाणीव काही दशके आणि शतकांपुरती मर्यादित न ठेवणे  ही आपली जबाबदारी आहे", असे ते म्हणाले. भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या काही ओळीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की वारंवार स्मरण करूनच आपण भावी  पिढीसमोर  इतिहासाचे अचूक चित्र सादर करू शकतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्य किंवा चित्रपटांच्या धर्तीवर वीर लाचित बोरफुकन यांच्यावर एक भव्य नाटक   तयार करून ते देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. याद्वारे "एक भारत, श्रेष्ठ भारत" या निर्धाराला मोठे बळ मिळेलं असे ते म्हणाले. आपल्याला भारताला एक विकसित राष्ट्र करायचे असून ईशान्येकडील राज्यांना भारताच्या विकासाचे केंद्र करायचे आहे, वीर लचित बोरफुकन यांच्या 400 व्या जयंतीच्या माध्यमातून आपल्या संकल्पाला बळ मिळेल  आणि राष्ट्र आपले ध्येय साध्य करेल, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमासाठी आगमन झाल्यावर, पंतप्रधानांनी विज्ञान भवनाच्या पश्चिम प्रांगणात उभारलेल्या आसाम मधील प्रतीकात्मक  ग्रामीण भागाची पाहणी केली आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून उभारलेल्या  प्रदर्शनालाही भेट दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी दीपप्रज्वलन करून लचित बोरफुकन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

आसामचे राज्यपाल प्रा. जगदीश मुखी, आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा शर्मा, केंद्रीय मंत्री  सर्बानंद सोनोवाल, संसद सदस्य, न्यायमूर्ती (निवृत्त) रंजन गोगोईटोपोन  कुमार गोगोई आणि आसाम सरकारचे सदस्य आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

विस्मृतीत गेलेल्या नायकांचा योग्य पद्धतीने सन्मान करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतत प्रयत्न असतो . याच अनुषंगाने, आपला देश 2022 या चालू वर्षात लचित बारफुकन यांचे 400 वे जयंती वर्ष  साजरे करत आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुवाहाटी येथे या उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते.

लचित बारफुकन यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1622 रोजी झाला आणि मृत्यू 25 एप्रिल 1672 ला झाला. बारफुकन हे अहोम राज्याच्या रॉयल आर्मीचे  जनरल होते ज्यांनी  मुघलांचा पराभव केला आणि औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या विस्तारत जाणाऱ्या महत्त्वाकांक्षा यशस्वीपणे रोखल्या. 1671  मध्ये झालेल्या सराईघाटच्या लढाईत लचित बारफुकन यांनी  आसामी सैनिकांना प्रेरीत करून मुघलांचा पराभव केला. लचित बारफुकन आणि त्याच्या सैन्याचा शौर्यपूर्ण लढा हा आपल्या देशाच्या इतिहासात प्रतिकारात्मक श्रेणीतल्या सर्वात प्रेरणादायी लष्करी पराक्रमांपैकी एक आहे.

***

S.Tupe/S.Kane/S.Chitnis/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878846) Visitor Counter : 154