माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ओटीटी मंच आणि त्यासोबतच पारंपारिक पद्धतीची सिनेमागृहे परस्परांसोबतचं सह-अस्तित्व राखत टिकून राहतील : दिग्दर्शक महेश नारायणन


अरियीप्पू – स्थलांतरीत कामगारवर्गाची व्यथा मांडणारा सिनेमा

Posted On: 24 NOV 2022 11:10PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2022

 

ऑनलाइन स्ट्रीमिंग व्यासपीठे / प्लॅटफॉर्म आणि त्यासोबतच पारंपारिक पद्धतीची सिनेमागृहे परस्परांसोबत सह-अस्तित्व राखत टिकून राहतील असा विश्वास प्रख्यात सिने दिग्दर्शक महेश नारायणन यांनी व्यक्त केला आहे. गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमा विभागात  नारायणन यांनी दिग्दर्शित केलेला अरियीप्पू हा चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यानिमीत्तानं नारायण यांनी पत्र सूचना कार्यालयानं आयोजित केलेल्या इफ्फी टेबल टॉक या कार्यक्रमात  माध्यमं आणि इतर प्रतिनिधी आणि सिनेप्रेमींशी संवाद साधला.

यावेळी महेश नारायणन यांनी या विषयावर अधिक सखोल चर्चा केली. पूर्वीच्या काळी स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट प्रसारित करण्यासाठी दूरदर्शनशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचा अनुभव त्यांनी मांडला. “पण आता अशा चित्रपट निर्मात्यांना पाठबळ ठरू शकतील  असे ओटीटी  मंच उपलब्ध झाले  आहेत, त्यामुळे अशा काही व्यासपीठांचा आधार घेऊन कोणत्या ना कोणत्या मार्गानं तरी चित्रपट निर्माते आपलं अस्तित्व टिकवून ठेऊ शकत असल्याचं ते म्हणाले.  असं असलं तरी अशी सर्वच व्यासपीठं प्रत्येक चित्रपट स्वीकारतात असं नाही, तर ते अभिनेते कलाकार कोण आहेत, चित्रपटाची व्यवहार्यता तपासण्यासाठी, चित्रपटातली गुंतवणूक आणि त्यासाठी मिळालेलं अर्थसहाय्य पुरेसं आहे की नाही असे अनेक निकष लावत असतात, आणि त्यावर चित्रपट स्विकारला जाईल की नाही हे अवलंबून असतं असं ते म्हणाले.

पण अशी व्यासपीठं उलब्ध झाली आहे, यामुळे एकत्र येऊन सिनेमा पाहण्याची सवय किंवा परंपरा संपून जाईल असं नाही, असंही नारायणन यांनी नमूद केलं. चित्रपट महोत्सवातलं सौंदर्य देखील एकत्र येत, सामूहिकपणे सिनेमा पाहणं, हेच असल्याचं ते म्हणाले. डिजिटल व्यासपीठांसाठी चित्रपटाची निर्मिती करणं हे कदाचित आपल्याला अवघड असेल असं वैयक्तिक मतही त्यांनी व्यक्त केलं. चित्रपटगृहांमध्ये सिनेमा पाहायला येणारे लोक आपल्याला पडद्यावर सिनेमा पाहता यावा यासाठी वेळेची गुंतवणूक करत असतात, पण डिजिटल व्यासपीठांकडे पाहीलं तर या व्यासपीठांवर सिनेमा पाहताना, तो वेगानं पुढे पळवणं, पुन्हा मागे जाऊन पाहणं, किंवा एखादा सिनेमा पाहता पाहताच मध्येच तो बदलून दुसरा सिनेमा पाहायला घेणं असे अनेक पर्याय उपलब्ध असतात.  त्यामुळेच ओटीटी व्यासपीठांसाठी चित्रपट बनवणं हे खरं तर चित्रपट निर्मात्यांसाठीचं आव्हानात्मक काम आहे असं ते म्हणाले. 

कोविड महामारीमुळे कारखान्यांमध्ये काम करत असलेल्या कुशल कामगारांवर काय परिस्थिती ओढवली तसंच, सतत गंभीर अडचणी निर्माण करणाऱ्या समस्यांमुळे परिस्थिती कशी पालटली हा विषय या चित्रपटात मांडला असल्याचं ते म्हणाले. या चित्रपटात आपल्या समकालीन सामजिक विषयांना स्पर्श केला आहे, शिवाय यात परस्पर संवाद आणि वैयक्तिक नातेसंबंधामधला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्याप्तीचंही दर्शन घडतं असं त्यांनी सांगितलं.  स्त्री पुरुषांमधल्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांवर आधारीत हा एक सशक्त सिनेमा असल्याचं ते म्हणाले.

कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या काळातच हा सिनेमा चित्रित केला. कोविडमुळे कमी संख्येनं चित्रपट कर्मचारी घेऊनच सिनेमा चित्रीत करावा लागला. याशिवायदेखील चित्रीकरणाच्या टप्प्यावर असंख्य अडचणी आल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. या चित्रपटात केरळमधील एका स्थलांतरित जोडप्यावर बेतलेलं कथानक मांडलं असलं, तरी या चित्रपटातली पात्र मल्याळम, हिंदी आणि तमिळ यांसारख्या अनेक भाषांमध्ये बोलतात, संवाद साधतात, असं सांगून हा चित्रपट संपूर्ण भारतीय अवकाशाशी संबंधीत असल्याचं ते म्हणाले.

चित्रपटाचे निर्माते शबिन बेकर, अभिनेत्री दिव्याप्रभा पी.जी. आणि छायाचित्रणकार सानू जॉन वर्गीस हे देखील या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते.


* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878839) Visitor Counter : 140


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil